
- डॉ. मालविका तांबे
डोके गरगरणे, थकवा वाटणे, अस्थिर वाटणे, चालता चालता तोल जातो आहे असे वाटणे, किंवा आजच्या शब्दांत woozy वा dizzi वाटणे अशी अनेक नावे चक्कर येणे या प्रकाराला दिली जातात. त्याचबरोबरीने आपल्या भोवतालचे सर्व जग हलते आहे अशी भावना येणे हाही चक्कर येण्याचा एक प्रकार आहे, याला व्हर्टिगो म्हटले जाते. आयुर्वेदात या त्रासाला भ्रम असे म्हटले आहे. शरीरात वात-पित्ताचे असंतुलन होऊन जेव्हा रजोगुण प्रभावित होतो तेव्हा भ्रमासारखी परिस्थिती निर्माण होते.
रजपित्ताऽनिलात् भ्रमः ।.....योगरत्नाकर
चक्कर येते तेव्हा शरीरातील इंद्रिये, मुख्यत्वे कान व डोळे प्रभावित होतात. अर्थातच कान हा वातदोषाचा तसेच शरीराच्या संतुलनाचे मुख्य अंग असल्याने यात दोष येण्याने चक्कर येण्याची शक्यता उत्पन्न होते. डोळे हे पित्ताचे स्थान आहे. आपली उभी राहण्याच्या, बसण्याच्या स्थितीची संपूर्ण माहिती कानांबरोबर डोळे आपल्या मेंदूला पुरवत असतात. आपल्या त्वचेत असलेले स्पर्श्नेंद्रिय सुद्धा संतुलन ठेवायला मदत करते. या तिघांमधील एकात वा अनेकांत दोष आला तर चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो.
चक्कर हे एक लक्षण आहे त्यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात. कानात कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होणे, कानावर आघात होणे, शरीरात पित्तदोषाचे असंतुलन होणे, फार प्रमाणात ॲसिडिटी वाढणे, अपचन होणे, उलटीची भावना होणे ही चक्कर येण्याची मुख्य कारणे. रक्तदाब कमी झाला, शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण फार कमी झाले, पाणी कमी प्यायले गेले, जास्त वेळ उन्हात जाण्यात आले, व्यायामाचा अतिरेक झाला, डोक्याला-मानेला काही प्रकारची इजा झाली, काही कारणाने मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित झाला नाही, शरीरातील साखरेचे प्रमाण पार कमी वा फार जास्त झाला तरी चक्कर येऊ शकते.
मानसिक कारणांमुळेही चक्कर येऊ शकते. स्त्रियांमध्ये व टीन एजर्समध्ये पटकन घाबरून जाण्याची, नैराश्य येण्याची, फार ताण घेण्याची प्रवृत्ती दिसते, त्यामुळे त्यांच्यात चक्कर येण्यासाठी हेही कारण असू शकते. सध्याच्या काळात आढळून येणारे सर्वांत महत्त्वाचे कारण आहे फार प्रमाणात प्रवास करणे. गाडीत बसलेले असताना खराब रस्त्यामुळे वा अति श्रमांमुळे मान व पाठीच्या मणक्यांवर चुकीचा दाब आल्यानेही तिथल्या नसांना इजा होऊ अशा प्रकारे चक्कर येण्याचा त्रास लोकांमध्ये दिसतो.
गर्भावस्थेचे पहिले २-३ महिने व काही गर्भवतींमध्ये पूर्ण नऊ महिने सुद्धा हॉर्मोन्सच्या बदलामुळे किंवा इतर कारणांमुळे चक्कर येण्याचा त्रास होताना दिसतो. त्याचबरोबरीने रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये चक्कर येण्याचा त्रास दिसू शकतो.
गाडी लागल्यास, एखादा खूप तीक्ष्ण, विशेषकरून सिंथेटिक पर्फ्युम्सचा, वास आला तर चक्कर येण्याची शक्यता असते.
शरीरात जीवनसत्त्वांची, मुख्यत्वे बी जीवनसत्त्व, कमतरता असल्यास चक्कर येण्याचा त्रास होऊ शकतो.
अशा प्रकारे चक्कर येण्याचा कारणांचा विचार केल्यासही कोणाला तरी चक्कर येऊ शकेल.
चक्कर येण्याचा क्वचित त्रास झाला तर घाबरून न जाता आजूबाजूच्या कारणांचा विचार करावा. परंतु चक्कर येण्याचा त्रास वारंवार होऊ लागला तर मात्र तज्ज्ञांचा सल्ला घेऊन लगेच उपचार घेणे सुरू करणे उत्तम असते हे लक्षात ठेवायला हवे. वय, स्वतःचा व घराण्याचा इतिहास, चक्कर कशामुळे सुरू झाली या सगळ्यांचा विचार करून उपचारांची दिशा ठरवावी लागते.
चक्कर आलीच तर काय करावे याचाही आपण विचार करू.
चक्कर आल्यावर सर्वप्रथम एका ठिकाणी बसावे. कोणाला तरी मदतीसाठी हाक मारावी.
जवळपास कुणी नसले व उठून जाण्याची गरज असली तर अगदी हळुवारपणे चालावे, चालताना भिंत व अन्य कशाचा तरी आधार नक्की घ्यावा.
डोक्याची, विशेषतः मानेची झटका देऊन हालचाल करू नये.
जिना चढणे-उतरणे, वाहन चालवणे पूर्णतः टाळावे.
चक्कर येत असल्यास उंच टाचेच्या चपला घालू नयेत.
पाणी, मीठ-साखर घालून केलेले सरबत घेणे उत्तम.
चक्कर येण्याचा त्रास असणाऱ्यांनी सात्त्विक व पचायला सोपा आहार घेणे योग्य ठरते.
फास्ट फूड व जंक फूड न घेतलेलेच बरे.
ज्यांना साध्या-सोप्या कारणांमुळे चक्कर येते आहे, त्यांना काही घरगुती उपाय करता येतात.
आले, गवती चहा व शोप टाकून बनविलेला चहा नियमितपणे घेणे सुरू करावे.
एक चमचा आवळ्याची पूड मधात मिसळून दिवसातून एकदा कधीही चाटावी.
एक चमचा अश्वगंधा चूर्ण व शतानंत कल्प दुधात मिसळून रात्री झोपताना घ्यावे.
प्रवाळपंचामृत, सूतशेखर रस वगैरे घेण्याने चक्कर येण्याचा त्रास कमी होताना दिसतो.
पित्त वाढल्यामुळे चक्कर येत असली तर आठ-दहा काळ्या मनुका ६-७ तास पाण्यात भिजवून, कुस्कराव्या व हे पाणी सकाळी अनाशेपोटी घ्यावे.
आवळ्याचा पाव वाटी रस खडीसाखर टाकून घेतल्यास बरे वाटते.
एक चमचा आल्याचा रस, एक चमचा मध मिसळून थोडे थोडे चाटल्यास चक्कर येणे कमी होते.
ऊन लागून चक्कर येत असल्यास धणे-जिऱ्याचे पाणी घेतल्याचा फायदा होऊ शकतो. तसेच नाकात दोन थेंब नस्यसॅन घृत टाकण्याचा व पादाभ्यंग करण्याचा फायदा होऊ शकतो.
भिजवलेले ८-१० बदाम दुधात वाटून खडीसाखर व शतानंत कल्प टाकून घेतल्यास चक्कर येण्याचा त्रास कमी होऊ शकतो.
खूप श्रमांमुळे थकवा येऊन चक्कर येत असल्यास नारळाचे पाणी, लिंबाचे सरबत, कोकम सरबत घेण्याचा फायदा होऊ शकतो.
गाडी लागत असल्यास तोंडात वेलची किंवा लवंग ठेवणे, थोड्या थोड्या वेळाने लाह्या खाणे, प्रवाळपंचामृतासारख्या गोळ्या घेण्याचा फायदा होऊ शकेल. दही व साखर मिसळून खाल्ल्यास गाडी लागण्याचा वा पित्ताचा त्रास कमी व्हायला मदत मिळते. त्यामुळेच आपल्याकडे प्रवासाला निघण्यापूर्वी हातावर दही, साखर देण्याची पद्धत असावी.
कानाचा त्रास असल्यामुळे चक्कर येत असली तर प्रवासाला जाताना वा लिफ्टमध्ये वर-खाली करताना कानात कापसाचे बोळे ठेवावे. शक्य असल्यास कापसाचे बोळे संतुलन श्रुती तेलात भिजवलेले असले तर अशा प्रकारचा त्रास कमी होतो असे दिसते.
नित्य स्नेहपान करणे, डोक्याला ब्रह्मलीन तेल लावणे, नाकात नस्य करणे, अंगाला क्षीरबला किंवा संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल लावणे वगैरे गोष्टी नियमित केल्यास चक्कर येण्याच्या त्रासात फायदा मिळू शकेल.
फार जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास शिरोपिचू, शिरोबस्ती, शिरोलेप, शिरोधारा करण्याचा उपयोग होऊ शकतो. कर्णपूरण, धूमपान, अंजन वगैरेंचाही चक्कर कमी व्हायला उपयोग होऊ शकतो.
भ्रम होणे हे मज्जाधातूच्या क्षयाचे लक्षण असू शकते, त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नये. यासाठी आयुर्वेदाच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, चक्कर येण्याची कारणे समजून घेऊन उपचार घेणे योग्य. यासाठी ब्राह्मी घृत, पंचगव्यघृत, कल्याणक घृत, संतुलन अश्र्वसारस्व, संतुलन पुनर्नवासव, अश्र्वगंधा रसायन वगैरे औषधे घेण्याचा फायदा दिसू शकतो.
रक्तधातूचा क्षय झाल्यामुळे त्रास होत असला तर धात्री रसायन, लोहित प्लस वगैरेंचा फायदा होऊ शकेल.
या सगळ्यांबरोबर योग्य व्यायाम करणे गरजेचे असते. एकूणच काय, चक्कर येण्याची प्रवृत्ती असली तर दुर्लक्ष न करता चक्कर येण्याचे मूळ कारण जाणून घेऊन त्वरित उपचार सुरू करावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.