घडण-मंत्र : कठीण समय येता... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घडण-मंत्र : कठीण समय येता...

घडण-मंत्र : कठीण समय येता...

- डॉ. भूषण शुक्ल

आखून दिलेल्या एका सरळ रस्त्यावर सतत चालू राहिल्यास ते आयुष्य कसले? अनपेक्षित रित्या वळणे आणि अडथळे उभे करणे आणि रस्ता अवघड किंवा अशक्य करून सोडणे हा तर आयुष्याचा आवडता उद्योग आहे. आपले वयात येणारे मूल मानसिक दृष्ट्या आजारी पडते आहे याचा खूपशा पालकांना लवकर अंदाज येत नाही आणि अगदी टोकाच्या खुणा दिसेपर्यंत मदत घेतली जात नाही. लवकर उपाय सापडणाऱ्या समस्याही अवघड होऊन चिघळेपर्यंत दुर्लक्षित राहतात. हे सर्व अवघड आणि अनोळखी प्रकरण कसे ओळखायचे? वयात येणाऱ्या मुलांचे बदललेले, पण नॉर्मल वागणे आणि मानसिक अस्वास्थ्य सूचक वागणे यात फरक काय?

1) एकटेपणा आणि संगत - या वयाची मुले कुटुंबापासून थोडी दूर जाणे साहजिक आहे, पण मित्र मंडळींपासून दूर जाणे, एकलकोंडी होणे हा लाल झेंडा आहे. नेहमीचे मित्र सोडून खूप मोठे किंवा एकदम लहान मित्रमंडळी पकडणे हे सुद्धा काळजीचे लक्षण असू शकते.

2) तब्येत - या वाढीच्या वयात वजन खूप वेगाने वाढून मूल बेढब होणे किंवा वजन खूप कमी होऊन अगदी कृश दिसणे या काळजीच्या गोष्टी आहेत. विशेषतः जर सर्वसाधारण तब्येतीचे मूल वजन कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करायला लागल्यास काहीतरी गडबड आहे.

3) मूड - मोठी मुले थोडी विचित्र वागतात आणि त्यांचा मूड सतत बदलत असतो, हे आपल्याला मान्य असते. मात्र, सतत दुःखी राहणे, उदास राहणे, स्वतःवर आणि इतरांवर नाराज राहणे, निराश असणे हा लाल झेंडा आहे. सततची चिंता आणि काही गोष्टींबद्दल टोकाची काळजी हे सुद्धा आजाराचे लक्षण असू शकते.

4) विचारांचे चक्र - डोक्यात न संपणारे विचार चक्र चालू राहणे आणि त्यामुळे बऱ्यापैकी अर्थहीन कृती पुनःपुन्हा करत राहणे उदा. वस्तू, कपडे विशिष्ट प्रकारे लावत बसणे, स्पर्श आणि स्वच्छता यांचा अतिरेक करणे अशा सवयी या मानसिक आजाराचे लक्षण असतात.

5) स्व-घात - स्वतःलाच इजा करून घेणे किंवा आत्महत्येचा विचार करणे हे निश्चित काळजीचे लक्षण आहे.

6) व्यसन - स्क्रीन आणि गेमिंगबद्दल आपण पूर्वी बोललो आहोतच. स्मोकिंग, दारू आणि इतर काही नशेचे पदार्थ उदा. गांजा ह्या धोक्याच्या घंटा आहेत. शहरी आणि ग्रामीण समाजात अशा प्रकारच्या नशांचे प्रमाण दरवर्षी वाढते आहे. यावर लक्ष ठेवायला पाहिजे.

आपल्याला ४० ते ५० टक्के मानसिक आजार हे अठरा वर्षाच्या आतच दिसायला लागतात. त्याचे निदान लवकर झाल्यास त्याचा मुलाला आणि कुटुंबाला फायदा होतो. अशी काही लक्षणे दिसल्यास आपल्या फॅमिली डॉक्टरांना जरूर भेटा. घरगुती उपाय करण्यात कृपया वेळ घालवू नका. चिंता, काळजी, उदासीनता यांसारखे अनेक प्रश्न योग्य प्रकारच्या सायकोथेरपी उपायांनी बरे करता येतात. औषधांचा उपयोग फक्त तीव्र आणि घातक आजारांमध्येच करावा लागतो. जनरल कौन्सिलिंग हा उपाय नव्हे. व्यवस्थित निदान करून योग्य प्रकारच्या सायकोथेरपी आणि उपचाराचाच खरा उपयोग होतो. आपल्या फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रशिक्षित तज्ज्ञांची मदत घ्या.

या वयात सुरू होणारे लहान मोठे मानसिक अस्वास्थ्य लवकर आणि योग्य उपचाराने बरे करता येते. न घाबरता आणि गैरसमजाला बळी न पडता मदत घेणे मात्र गरजेचे आहे.

टॅग्स :health