मनाची शक्ती : मन ठेवा निर्मळ..!

जीवन म्हणजे केवळ आहे त्या स्थितीत आहे तसं राहणं नाही, तर आहे त्या परिस्थितीतून आपण काय निर्माण करतो, ते होय!
Power of Mind
Power of Mindsakal

- डॉ. हंसा योगेंद्र

जीवन म्हणजे केवळ आहे त्या स्थितीत आहे तसं राहणं नाही, तर आहे त्या परिस्थितीतून आपण काय निर्माण करतो, ते होय! अशी एक गोष्ट आहे, जी तुमचं आयुष्य अधिक सुंदरही करते, घडवते आणि ठरवलं तर उद्ध्वस्त करण्याचीही क्षमता ठेवते, ती म्हणजे मन. मात्र, आज आपलं मन ताण-तणाव, चिंता, नैराश्‍य आणि नकारात्मक भावनांनी व्यापलेलं आहे.

त्यामुळे असेच विचार व कल्पना आपल्या मनात, डोक्यात अधिकाधिक प्रमाणात येतात आणि त्यांचे थरावर थर चढतात. परिणामी, मनाची स्थिती ताणलेल्या रबरासारखी होते. ताण सहन करत करत एका क्षणाला ते तुटतं. मनाचं असं काही होण्यापूर्वी त्याला निर्मळ करणं आवश्‍यक आहे.

मन निर्मळ करण्यासाठीची पहिली आणि आवश्‍यक गोष्ट म्हणजे शांत करणे. त्यासाठी ‘विहार’ या योगतत्त्वापेक्षा चांगली संकल्पना असू शकत नाही. ही एक साधी, सोपी संकल्पना आहे. विहार म्हणजे शांतता, विश्रांती आणि मनात पुन्हा नवचेतना निर्माण करणं. यासाठी मेंदूला नव्याने ऊर्जा देऊ शकणाऱ्या गोष्टी, उपक्रम, छंद जोपासून त्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्‍यक आहे. त्यात गायन, नृत्य, बागकाम यांसारख्या गोष्टी असू शकतात.

या प्रक्रियेतील पुढच्या टप्पा म्हणजे ध्यान. ध्यानाबद्दल माहिती असते, परंतु त्याकडे दुर्लक्ष करतो. मनात आणलं तर, ध्यान अक्षरशः चमत्कारासारखं काम करू शकेल. तरीही आपण ते नियमित न करण्याची चूक करतो. तुम्ही ध्यान करता, तेव्हा मनाची पुन्हा एकदा बांधणी करता आणि संपूर्ण शरीराला नवी ऊर्जा देता.

तुमच्यापेक्षा कैक पटीने सामर्थ्यशाली असलेल्या सर्वोच्च शक्तीवर कायम विश्‍वास ठेवा. ती शक्ती कधीही तुम्हाला दुखवू किंवा त्रास देऊ इच्छित नाही. तुमच्यासाठी वाईट आहे, ते ती शक्ती कधीही करणार नाही. तुम्ही एखाद्या संकटातून जात असाल, तर त्याकडे त्या शक्तीने दिलेली भेट म्हणून पाहा. एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही, तर ती तुमच्यासाठी नव्हतीच किंवा त्यापासून तुमचं संरक्षण झालं, असं समजा.

आपण एका अत्यंत निर्दयी, बेफिकीर जगात वावरतो, या आपल्या समजातूनच अनेक चिंता जन्माला येतात व आपण त्या जोपासत राहतो. मात्र, प्रत्यक्षात तसं नाही. आपल्याला असं वाटतं कारण, आपल्या अवतीभवती सतत अशाच प्रकारचं बोललं जात असतं. लक्षात ठेवा, एक अशी अनामिक शक्ती नक्की आहे आणि ती सतत तुमच्या सोबत आहे. एकदा तुम्ही हे मनाशी पक्कं केलं की तुम्हाला ‘डिटॉक्स’ करण्याचीही गरज भासणार नाही.

तुमच्यात प्रचंड विश्‍वास निर्माण होईल आणि मन व हृदय आनंदानं भरून जाईल. तुमच्या मनाला घडवणं तुमच्या हातात आहे. यासाठी त्याची काळजी घ्या. तुम्ही त्याला घडवलं, तसं ते तुमचं जीवन घडवेल. सुख, शांतता निर्माण करणं आपल्या हातात असेल, तर दुःखी का राहायचं, याचा विचार नक्की करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com