तीळ आणि गुळाचा गोडवा

जानेवारीचा महिना म्हणजे संक्रांतीचा महिना. संक्रांत म्हटले की तीळ आले, गूळ आला. या दोन्हींचा समावेश आपल्या आयुष्यात केला की गोडवा येतो असे म्हटले जाते.
Makar Sankranti
Makar Sankrantisakal

- डॉ. मालविका तांबे

जानेवारीचा महिना म्हणजे संक्रांतीचा महिना. संक्रांत म्हटले की तीळ आले, गूळ आला. या दोन्हींचा समावेश आपल्या आयुष्यात केला की गोडवा येतो असे म्हटले जाते. निश्र्चितच तिळात असलेली शक्ती, गुळात असलेली शक्ती आपल्यामध्ये सामावली की आपले सामर्थ्य वाढते आणि सामर्थ्य वाढले की उत्साह वाढतो व कुठल्याही विपरीत परिस्थितीला सामोरे जाणे सोपे पडते, मग ती शारीरिक असो किंवा मानसिक असो. सामर्थ्य असले की कुणाबरोबरही वाईट वागण्याची गरज पडत नाही. समोरच्याने आपल्याबरोबर काही चुकीचे केले तरी त्याच्याशी भांडायची गरज पडत नाही, उलट आपण त्याला गोड शब्दांत समजावून सांगू शकतो. कित्येकदा आपण म्हणतो की ज्या व्यक्तीकडे ताकद असेल ती दुसऱ्यांशी वाईट वागते, पण खऱ्या अर्थाने सकारात्मक ताकद असली तर ती व्यक्ती सर्वांबरोबर चांगली वागते.

तीळ हे आयुर्वेदिक स्वयंपाकघरातील खूप महत्त्वाचे व अविभाज्य अंग आहे. सध्याच्या काळात तिळाचा वापर खूप कमी होत चाललेला दिसतो. म्हणून संक्रांतीच्या वेळी आठवण करून देता येते की तीळ आपल्याला नियमित वापरायला पाहिजे. या महिन्यात वातावरणात थंडी असते, त्यामुळे तिळाच्या उष्णतेचा त्रास या काळात होत नाही. तिळगुळाचे वेगवेगळे प्रकार असतात.

लाडू, चिक्की, गजक, वडी, रेवडी, पोळी वगैरे वेगवेगळ्या स्वरूपाचे तिळगूळ आपल्याला खायला मिळतात. या सगळ्या पदार्थांत केशर, वेलची, साखर, तूप, दाणे, खोबरे, गव्हाची कणिक वगैरेंचाही समावेश झालेला दिसतो. या सगळ्यांचे महत्त्व व वापरण्याची पद्धत आज आपण थोडक्यात बघू या.

तीळ –

  • तीळ हे सर्वांत महत्त्वाच्या वनस्पतीतील एक आहे. याचा उपयोग आपल्या शरीरात बऱ्याच प्रकारे करता येऊ शकतो. स्वयंपाकात, अभ्यंगासाठी, त्वचेवर, डोळ्यांत, नाकात वगैरे. तीळ पथ्य सांगितलेले आहेत. म्हणजे तीळ आहारात नियमितपणे ठेवता येऊ शकतात. तीळ पचनशक्ती वाढवितात, मेधा व बुद्धी वाढवितात.

  • तिळगुळाच्या स्वरूपात तर तीळ खाता येतात, पण फोडणी करत असताना, खिचडी करत असताना, ठेपला वगैरे करत असताना तीळ भाजून त्यात टाकता येतात.

  • सध्याच्या काळात सॅलडचे ड्रेसिंग करताना, गोड पदार्थ करत असताना त्यात तीळ घालण्याची पद्धत आहे. तिळाचे तेल स्वयंपाक करताना वापरणे चांगले असते. तीळ भिजवून त्याचा केलेला कल्क केसांना वा त्वचेला लावण्याची पद्धत आहे. हाच कल्क स्वयंपाकात वापरला तर ताहिनी म्हटले जाते. ज्या स्त्रियांना मासिक पाळीत व्यवस्थित रक्तस्राव होत नसेल अशांनी सकाळी पाव चमचा तिळाचा कल्क खायला हरकत नसते. मासिक पाळीत व्यवस्थित रक्तस्राव होत नसेल त्यांनी नियमितपणे तिळगूळ प्रमाणात खाणे चांगले ठरू शकते.

  • तीळ हे नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात, यांच्यात व्हिटॅमिन ए व व्हिटॅमिन के प्रचुर मात्रेत असते, तसेच तिळात मॅग्नेशियम, कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, लोह असते.

  • तीळ उष्ण असल्यामुळे पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी फार प्रमाणात वापरणे योग्य नाही.

गूळ -

सध्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारचा गूळ मिळायला लागला आहे. आपण ज्या गुळाची चर्चा करणार आहेत तो गूळ म्हणजे उसापासून तयार झालेला गूळ. गूळ शरीरासाठी अत्यंत उत्तम असतो. आयुर्वेदाच्या मतानुसार जुना गूळ व स्वच्छ गूळ शरीरासाठी चांगला असतो. गूळ नवीन असला किंवा व्यवस्थित तयार केलेला नसला तर मात्र शरीरात निरनिराळे दोष, विशेषतः कृमी, व कफाचे विकार उत्पन्न करतो.

गूळ स्निग्ध व लघु असतो, पचनशक्ती वाढवतो, आमाशय, मूत्र व मलाचे शोधन करतो, जेवणात रुची वाढवतो, हृदयासाठी उत्तम असतो, पित्त व वाताचे शमन करतो, तसेच श्रम कमी करतो. गुळाचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे तो पांडुरोग अर्थात ॲनिमिया कमी करायला मदत करतो. प्रमेहामध्ये होणारी वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्ससुद्धा कमी करायला मदत करतो.

स्वयंपाकामध्ये साखरेपेक्षा गूळ वापरायची पद्धत जास्त आहे. साखर व गूळ हे दोन्ही तब्येतीसाठी चांगले समजले जातात. खडीसाखर अर्थात व्यवस्थित स्वच्छ केलेली साखर आरोग्यासाठी अत्यंत उत्तम समजली जाते. त्यामुळे गूळ वापरावा की साखर या वादात न पडता पाककृतीनुसार गूळ वा साखर वापरणे इष्ट ठरते. गजक ही गुळाची वा साखरेची खाता येते.

थंडीच्या दिवसात गूळ जास्त प्रमाणात शरीरात गेला तर चालतो कारण गूळ उष्ण असतो व साखर शीतल असते. त्यामुळे पित्तप्रकृतीच्या व्यक्तींना फार प्रमाणात गूळ खाणे चालत नाही. सध्या बाजारात मिळणारे गोड पदार्थ तयार करताना ग्लुकोजचा रासायनिक सिरप वापरले जाते. ग्लुकोज सिरप संपूर्णपणे टाळण्याची गरज आहे. घरी चांगल्या प्रतीचा गूळ वा साखर आणून तिळगूळ बनविणे अधिक इष्ट ठरेल.

केशर –

केशर हा भारतीय परंपरेतील महत्त्वाचा मसाला आहे. केशर चवीला कटू, तिक्त, स्निग्ध असते. केशर शरीरातील त्रिदोषांचे शमन करते. केशर शरीरात वीर्य, बल व बुद्धी वाढवण्यास मदत करते. केशर वर्ण्य म्हणजे वर्ण सुधरवणारे, कांती सुधरवणारे, व्रणशोधन करणारे व कृमी कमी करणारे असते असे सांगितलेले आहे. केशर सेवन करण्याने पचन सुधारायला मदत होते. आपल्याकडे दुधात केशर घालून घेण्याची पद्धत आहे.

यामुळे वीर्यवृद्धी व्हायला तर मदत मिळते तसेच अवसाद कमी होणे, पाळी व्यवस्थित राहणे याला मदत मिळते. त्यामुळे संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत प्रत्येकाने घ्यावे याबद्दल श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे आग्रही होते. भारतीय परंपरेत तसेच इतर देशांतही बऱ्याच गोड पदार्थांमध्ये केशर टाकण्याची पद्धत आहे.

केशर महाग असल्यामुळे सध्या केशराऐवजी पिवळा रंग टाकण्याची प्रथा सगळीकडे रूढ होत चाललेली आहे. रंग वापरणे त्वचेसाठी अहितकर असते तसेच नसांसाठीही चांगले नसते. त्यामुळे होता होईल तो, कमी प्रमाणात का होईना, केशरच वापरणे इष्ट ठरते.

शेंगदाणे (भुईमूग) –

शेंगदाणे शरीरात रूक्षता तयार करतात, पित्तदोषाचे असंतुलन कमी करतात, जेवणाची रुची वाढवितात, पण प्रत्येकाला शेंगदाणे सहन होतीलच असे नाही. यामुळे पोटदुखी होते किंवा शरीरात आम तयार होतो. शेंगदाण्यात व्हिटॅमिन इ, के तसेच फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशिमयही असते. यांच्यापासून प्रचुर प्रमाणात स्निग्ध पदार्थ, प्रोटिन वगैरे मिळतात. भुईमूग तीळ व तुपाबरोबर घेतले तर जास्त फायदा मिळू शकतो. फार जास्त प्रमाणात शेंगदाणे खाणे टाळावे. स्वयंपाकाकरता कोल्ड प्रेस्ड शेंगदाण्याचे तेल वापरणे उत्तम.

कोरडे खोबरे –

हे शरीरात ताकद वाढवायला तसेच वीर्यवृद्धीसाठी मदत करते, अन्नाची रुची वाढवायला मदत करते. कोरडे खोबरे पचायला जड असते व काही लोकांना मलबद्धतेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोरड्या खोबऱ्याचा अति वापर टाळावा. तिळाच्या वड्या करत असताना कोरड्या खोबऱ्याचा वापर केल्यास त्याच्या मधुर चवीमुळे व शीतल गुणामुळे पाककृती संतुलित व्हायला मदत मिळते.

गहू व तूप –

शरीरात वीर्य व ताकद वाढण्यासाठी तसेच पाककृतीकरता गहू व तूप अत्यंत उत्तम असतात. एकूणच ताकद भरण्याच्या दृष्टीने व थंडीत आरोग्य नीट ठेवण्यासाठी या उपरोक्त वस्तूचा वापर व्यवस्थितपणे केला तर शरीरात ताकद नीट राहून मानसिक उत्साह नीट राहील व त्यामुळे ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे वरवर म्हणावे लागणार नाही तर लोक आपसूक गोड बोलू लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com