आरोग्यमंत्र : दात काढणे आणि रूट कॅनॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

root canal

दात काढणे आणि रूट कॅनॉल ट्रीटमेंट भारतात इतके प्रसिद्ध का आहेत? आयुर्वेदाची जननी असलेल्या आपल्या भारतात, दंत आरोग्याबद्दल प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची संकल्पना खूप उशिरा उदयास येत आहे.

आरोग्यमंत्र : दात काढणे आणि रूट कॅनॉल

- डॉ. विधी भानुशाली

दात काढणे आणि रूट कॅनॉल ट्रीटमेंट भारतात इतके प्रसिद्ध का आहेत? आयुर्वेदाची जननी असलेल्या आपल्या भारतात, दंत आरोग्याबद्दल प्रतिबंधात्मक काळजी घेण्याची संकल्पना खूप उशिरा उदयास येत आहे. सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करताना, दंत आणि मौखिक आरोग्याची काळजी घेण्यास आपण खूप विलंब करतो.

दंतचिकित्साच्या उत्क्रांतीच्या इतिहासात मागे वळून पाहिल्यास, दात जतन करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी पूर्वी फारसे पर्याय नव्हते. दात भरण्यासाठी चांदी आणि सोन्यासारख्या धातूंचा शोध लागण्यापूर्वी, संपूर्ण तोंडात संसर्ग पसरण्यापासून वाचवण्याचा एकमेव मार्ग होता तो म्हणजे संसर्गजन्य दात काढून टाकणे. परंतु त्या काळापासून आजपर्यंत दंतचिकित्सा तंत्रज्ञानामध्ये ४ मोठे बदल झाले आहेत. आज सर्वांत लहान ते अगदी गंभीर संसर्गावरती पर्याय उपलब्ध आहेत.

इनॅमल हा आपल्या दाताचा सर्वात बाहेरचा थर हाडापेक्षा २.५ पट मजबूत असतो. हा थर तयार केल्यानंतर इनॅमल तयार करणाऱ्या पेशी मरतात. म्हणूनच एकदा दातांवरती कीड सुरू झाली की आपोआप निवारण होत नाही. स्टेम सेल्सचा वापर करून कृत्रिमरीत्या इनॅमल वाढवण्यासाठी बरेच संशोधन सुरू आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होण्यासाठी किमान १०-१५ वर्षे लागतील. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पहिली आणि प्रमुख भूमिका हीच असावी की जेव्हा दातांवर कीड सुरू होते, तेव्हा फीलिंग ट्रिटमेंट करून त्याचा प्रसार थांबवणे.

कीड इनॅमलपर्यंत मर्यादित असते तेव्हा वेदना किंवा अस्वस्थता बिलकूल होत नाही आणि इथेच बरेच लोक चूक करतात. जोपर्यंत दात दुखत नाही तोपर्यंत त्यामध्ये काही ट्रिटमेंटची आवश्यकता नाही असे वाटणे साहजिक आहे. कीड आणखी खोल जाते आणि डेन्टिनपर्यंत पोचते, तेव्हा तुम्हाला संवेदनशीलता जाणवायला सुरू होते. या टप्प्यापर्यंतही तुम्ही फीलिंग ट्रीटमेंटने दात वाचवू शकता. परंतु या टप्प्यावरही फीलिंग केले नाही तर किडणे खोलवर जाऊ लागते. कीड पल्पपर्यंत पोचते तेव्हा वेदना असहाय्य्य होतात, आणि तो दात फक्त रूट कॅनाल ट्रिटमेंटनेच उपचार केला जाऊ शकतो.

सहाजिकच, उपचाराच्या प्रत्येक प्रगत टप्प्यावर, रुग्णाला जास्त वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करावी लागते. जे वेळेत निदान आणि उपचार केले गेले असते तर सहज वाचवता येवू शकते. मला आशा आहे की वेळेत फिलिंग का करावे याचे हे सोपे स्पष्टीकरण आणि मौखिक आरोग्याची वेळोवेळी करायची तपासणी याचे महत्त्व समजून घेतल्याने तुमच्या तोंडाला होणारे हे अपरिवर्तनीय नुकसान टाळता येईल आणि तुम्हाला निरोगी जीवन जगण्यास मदत होईल!

(लेखिका डेंटलदोस्त अॅपच्या संस्थापक आहेत.)

टॅग्स :health