
डॉ. मालविका तांबे
भारतीय संस्कृतीमध्ये तसेच आयुर्वेदात पायांना खूप महत्त्व दिलेले आहे. आपल्या शरीरातील प्राण अर्थात जीवनशक्ती, शरीरातील अंगप्रत्यंग, ऊर्जास्थान या सगळ्यांशी पायाचा थेट संबंध असतो, असे आयुर्वेदात सांगितलेले आहे. एवढेच नव्हे तर शरीराच्या आत होणारे बदल व वातावरणात होणारे बदलही पायांमध्ये होणाऱ्या बदलांवरून ओळखले जाऊ शकतात, असे अनुभवांतून कळते. ताण असल्यावर ज्याप्रमाणे चेहरा म्लान दिसतो, तसेच पायपण कोमेजलेले दिसायला लागतात. म्हणूनच देवाच्या किंवा सुंदर पायांना आपल्याकडे कमळाची उपमा दिलेली दिसते. माणसाची खरी ओळख त्याच्या पायांवरूनच होत असते, असे जुनी मंडळी म्हणत असत. पायात असलेल्या ऊर्जेला आपल्याकडे एवढे महत्त्व दिलेले आहे की गुरुजनांच्या, सन्माननीय व्यक्तींच्या पायांवर डोके ठेवून नमस्कार करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीत आहे.