
Bajari Thalipeeth Recipe: बाजरीचे थालीपीठ
आता हिवाळा सुरू झाला आहे. या ऋतूत शरीरातील उष्णता टिकवण्यासाठी उष्ण गुणांनी युक्त बाजरीचा उपयोग होतो.
तसेच, बाजरी ही कॅल्शियम, लोह, प्रोटिन, फायबर अशा पोषक घटकांनी युक्त असल्याने लठ्ठपणा कमी करण्यासाठी, तसेच मधुमेह आणि हृदयविकार अशा आजारांमध्ये फायदेशीर ठरते, म्हणूनच आज आपण या बाजरीची एक साधी सोपी; पण चविष्ट आणि पौष्टिक अशी एक पाककृती पाहू...
साहित्य :
१ कप बाजरी पीठ
१ कप बारीक चिरलेला कोबी
१/२ कप बारीक चिरलेला कांदा
१/२ कप खिसलेले गाजर
१ कप बारीक चिरलेली मेथी
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
२ चिरलेल्या मिरच्या
मीठ चवीप्रमाणे
१/२ चमचा जिरे
तिखट चवीप्रमाणे
१/२ चमचा हळद
२ लहान चमचे तेल
२ चमचे दही
कृती :
सर्वप्रथम वरील सर्व जिन्नस एकत्र करून त्यामध्ये दोन चमचे दही घाला आणि चांगले थालीपीठाचे पीठ मळून घ्या.
नंतर तव्यामध्ये थोडेसे तेल लावून किंवा नॉनस्टिक तव्यावर नेहमीच्या थालीपीठाप्रमाणे थालीपीठ थापा.
थोडेसे तेल घालून दोन्ही बाजूने थालीपीठ खमंग भाजून घ्या.
हे थालीपीठ कोणत्याही चटणीबरोबर किंवा सॉस बरोबर छान लागते.