Health news : शस्त्रक्रियेसाठी कानाच्या कृत्रिम हाडाची निर्मिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health

Health news : शस्त्रक्रियेसाठी कानाच्या कृत्रिम हाडाची निर्मिती

नागपूर : नवीन तंत्रज्ञान आणि स्टार्टअप योजना आरोग्य क्षेत्रात दररोज नवीन यशोगाथा तयार करत आहेत. स्टार्टअपच्या मदतीने सुलभ आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. कानाच्या हाडाला इजा झाल्यानंतर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया तज्ज्ञाशिवाय शक्य नसते. यामुळेच वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टरांना प्रात्यक्षिक करता यावे, यासाठी एका अभियंत्याने कानातील कृत्रिम हाड तयार केले आहे. पीयूष उके असे या अभियंत्याचे नाव आहे.

कान हा शरीरातील सर्वाधिक गुंतागुंतीची रचना असलेला अवयव आहे. तसेच सर्वात कमी आकाराचे हाडही कानातच असते. यामुळे कानाची शस्त्रक्रिया करणाऱ्या तज्ज्ञांना फार काळजी घ्यावी लागते. वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाशिवाय पर्याय नाही. परंतु, कानाच्या हाडाची फारशी उपलब्धता होत नाही. यामुळे प्रत्यक्ष अनुभव घेण्यास अडचणी येतात. हीच अडचण पीयूष उके या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने दूर केली आहे.

पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा भाग म्हणून या तरुण अभियंत्याने कानाच्या हाडाची हुबेहुब कृत्रिम रचना साकारली. ही संकल्पना वैद्यकीय विद्यार्थ्यांसह कान, नाक, घसा उत्पादकांना अभ्यास व संशोधनाच्या दृष्टीने उपयुक्त ठरली आहे.

एम.टेक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून प्रोजेक्ट तयार करावा लागतो. प्रकल्प समाजोपयोगी असावा असा त्याचा निर्धार होता. यासंदर्भात त्याने नागपूरचे ज्येष्ठ कान, नाक, घसा सर्जन डॉ. प्रशांत नाईक यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांनी कानावर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी पीयूषपुढे मांडून कृत्रिम कान तयार करण्याबाबतचा सल्ला दिला.

हाडाची किंमत १० हजार

पीयूषने अल्पावधीतच प्राथमिक मॉडेल तयार केले. नंतर एकएक करीत त्रुटी दूर करून अगदी कानाच्या हाडाशी ८० टक्के समरूप असणारे कृत्रिम हाड साकारले. वैद्यकीय विद्यार्थी, डॉक्टर या हाडावर प्रयोग करू शकतात. व्यक्तिपरत्वे अडचणीही वेगवेगळ्या असू शकतात. गुंतागुंतीच्या वेळी प्रथम या कृत्रिम हाडावर प्रयोग करून पाहिल्यानंतर प्रत्यक्ष शस्त्रक्रिया करता येते. त्यामुळे शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांचा विश्वास वाढतो असे पीयूष म्हणाला. कानाचे हे कृत्रिम हाड साधारणपणे १० हजार रुपये प्रमाणे विकले जाऊ शकते.

पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करूनच कृत्रिम हाड तयार केले आहे. पेटंटसुद्धा मिळविले. या उत्पादनांचा प्रसार व प्रचार योग्यरितीने झाल्यास जगभरातूनच मागणी होण्याची शक्यता आहे. अवयव सिम्युलेशनच्या व्यवसायात फारच कमी कंपन्या आहेत. स्पर्धकही फारच कमी आहेत, ही व्यवसायाची संधी लक्षात घेऊन कंपनी स्थापन केली आहे.

-पीयूष उके, एम टेक.