Health : रक्तातील साखरेची पातळी आठवडाभरात ४५० वरून १५० वर

नागरिकाचा अनुभव : घराच्या परिसरातच लावा आयुर्वेदिक वनस्पती
Health tips Blood sugar level decrease
Health tips Blood sugar level decrease

औरंगाबाद : हडको श्रीकृष्णनगरातील रहिवासी व निवृत्त पोलिस अधिकारी किशन प्रधान यांना मधुमेहाला सामोरे जावे लागले. ते म्हणतात, की माझी रक्तातील साखरेची पातळी ४५० होती. सकाळ-संध्याकाळ इन्सुलीनचा डोस सुरू होता. ‘इन्सुलीन प्लांट''विषयी माहिती मिळाली, ते रोप आणून कुंडीत लावले, सकाळ-संध्याकाळ दोन-दोन पाने खात राहिलो आणि आठवडाभरात साखरेचे प्रमाण २५० वर आले. सध्या हे प्रमाण १५० पर्यंत आहे. पूर्वीचा इन्सुलीनचा डोसदेखील कमी झाला. श्री. प्रधान यांचा हा प्रातिनिधीक अनुभव आहे.

भारतात प्राचीन काळापासून आयुर्वेदीय निसर्गोपचार पद्धत प्रचलित आहे. निसर्गोपचार पद्धतीमध्ये वनौषधींचा वापर केला जातो. गावी घरातील सर्वात ज्येष्ठ असणारी आजीबाई घरात कोणाला काही दुखले, काही त्रास असेल, लहान बाळाला काही त्रास होत असेल तर बटव्यातून काहीतरी मुळी, पावडर हातावर ठेवून ‘एवढे खा, बरं वाटेल’ असे सांगायची आणि आजीने दिलेली मुळी, पावडर खावून बरेदेखील वाटायचे. शहरांमधून घरांचे आकार लहान झाले तरी घराच्या परिसरात कुंड्यांमध्ये औषधी वनस्पतींची लागवड करून काळाच्या ओघात विसर पडलेल्या आजीबाईच्या बटव्याला आपल्या घराच्या परिसरात आणता येईल.

असा प्रयोगही शहरातील अनेक नागरिक करीत आहेत. पूर्वी दवाखाना म्हटले की, नको रे बाबा म्हणून आपल्या घराच्या आसपास, शेत शिवारात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींचा वापर करूनच बहुतांश आजार बरे केले जायचे. हा निसर्गोपचार आज आपण विसरत आहोत. आता कोरोनामुळे जगभर आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात आले आहे. या औषधांबरोबरच आहारविषयक नियम, योगक्रिया आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर दिला जातो. कोरोनाकाळात आपल्या प्राचीन आयुर्वेदिय निसर्गोपचार पद्धतीचाही मोठा उपयोग झाला.

आजीच्या बटव्यात काय असायचे?

घरात सहज उपलब्ध होणाऱ्या बहुतांश मसाल्याच्या वस्तू आजीबाई बटव्यात आसायच्या. कोरोनाकाळातही याच वस्तूंचा काढा अनेकजण करून पित होते. या बटव्यात वेखंड, काळी मिरी, ओवा, लेंडी पिंपळी, मुरूडशेंग, बेहडा, हिरडा, आवळा, डिकेमली अशा पोट साफ होणाऱ्या औषधी, खोकल्यासाठी दिली जाणारी काळी शेंग यांचाही समावेश आहे.

काही अनुभव

श्रीकृष्णनगर हडकोमध्ये राहणारे किशन गोविंदराव प्रधान सांगतात, की त्यांची रक्तातील शुगर ४५० होती. घराच्या कंपाऊंडमध्ये कुंडीमध्ये लावलेल्या इन्सुलीन प्लांटची पाने खाणे सुरू केले. सुरूवातीला सकाळ-संध्याकाळ दोन दोन पाने खायला सुरूवात केली. आठवडाभरात रक्तातील साखरेची पातळी ४५० वरून २५० एवढी झाली. नंतर दोनऐवजी एक पान खाणे सुरू केले असून आता साखरेचे प्रमाण कमी झाले आहे. आता जेवणानंतर १५० तर जेवणापूर्वी ११० एवढे साखरेचे प्रमाण आहे. शिवाय इन्सुलीनच्या इंजेक्शनचा डोस देखील कमी झाला आहे. पूर्वी सकाळी ३५ तर सायंकाळी ४० असा इन्सुलीनचा डोस होता तो आता सध्या सकाळी १८ आणि सायंकाळी २० एवढा घेत आहे. नारेगावमधील अशोक तांगडे यांनी घराच्या परिसरात खोकल्यावर गुणकारी असलेली ‘ काळी, पांढरी गुंज, आडुळसा, अश्‍वगंधा, कोरफड, तुळस अशा औषधी वनस्पती लावल्या आहेत. याचा मी वापर करतो आणि इतरांनाही देत असल्याचे ते म्हणाले.

प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या वनस्पती

लॉर्डस वनौषधी उद्यानाचे डॉ. दत्ता सावंत यांनी सांगितले, की अनेक आजार हे वातावरणातील विषाणू, जिवाणू, धुलीकणांमुळे होत असतात. यांचे शोषून करून किंवा त्यांना निष्क्रिय करून माणसाला पूरक असे घटक वातावरणात सोडणाऱ्या वनस्पती आपले रक्षण करतात करतात. काही औषधी वनस्पती रोग झाल्यानंतर तो बरा करतात. घराभोवती ‘ सर्पगंधा, अडुळसा, अक्करकारा, मखमल (झेंडू), वेखंड, तुळस, सब्जा, पानलसन, पानओवा, गवती चहा, सिट्रोनिला, निरगुडी, इन्सुलीन प्लांट, शतावरी, ऑल व्हिटॅमिन, बासमती, सताप, दमावेल '' यासारख्या वनस्पती औषधी वनस्पती लावल्या पाहिजेत, म्हणजे छोट्या-छोट्या आजारांसाठी आपल्याला तातडीने घराच्या परिसरातच औषधोपचार मिळतील.

आता छोटी घरे असतात. तरी छोट्या औषधी वनस्पती आपल्या घराच्या परिसरात लावता येतात. वेखंडाने डास, साप येत नाहीत. धान्यात बोरीक पावडरऐवजी वेखंडाचा पाला टाकला तर धान्य खराब होत नाही. आपण व्हिटॅमिनच्या गोळ्या खातो, त्याला पर्याय ‘ऑल व्हिटॅमिन’ वनस्पती आहे. व्हिटॅमिन बी कॉम्पलेक्स देणारी ‘बासमती’ नावाची वनस्पती आहे. ‘सताप’ या औषधी वनस्पतीचा पाला कपड्यात बांधून वाफ दिली तर नवजात बालकाचीदेखील सर्दी नीट होते. एवढ्या ताकदीच्या औषधी वनस्पती आपल्या निसर्गाने दिल्या आहेत, त्यांची घराभोवती लागवड करावी.

- डॉ. दत्ता सावंत, लॉर्डस रिसर्च ॲण्ड लाईफ सायंसेस लॅबोरेटरी

आयुर्वेदानुसार वर्षभराची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतूंमध्ये विभागणी केलेली आहे. या सहा ऋतूंमध्ये होणाऱ्या वातावरणातील बदलांप्रमाणे आपला आहार विहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केले आहे. यस्य देशस्य यो जन्तुस्तज्जं तस्यौषधं हितम् । जो प्राणी जिथे जन्म घेतो, त्याच्यासाठी त्या देशातील औषधोपचार, आहार-विहार उपयोगी असतात. याचा अर्थ भारतीयांसाठी आपल्या देशातील स्वदेशी उपचार पद्धती उपयोगी आहे. यासाठी आपल्या अवती-भवती औषधी वनस्पती लावल्या पाहिजेत.

- राजेंद्र संकलेचा, धन्वंतरी औषधालय, निसर्गोपचारतज्ज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com