Heart Attack : लठ्ठपणा असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heart Attack

Heart Attack : लठ्ठपणा असणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका; वेळीच व्हा सावध...

Heart Attack : लठ्ठपणा आणि पोटाचा घेर जसजसा वाढत जातो, तसतसे आरोग्याला निर्माण होणारे धोके ही वाढत जातात. लठ्ठपणा आणि हृदयविकार यांचे नाते अतिशय घनिष्ठ आहे. लहान वयात व किशोरवयात लठ्ठ असलेली मुले मध्यम वयात प्रवेश करतात, तेव्हा त्यांना असणारा हृदयविकाराचा धोका कित्येक पटीने वाढला असतो.

हृदयविकाराप्रमाणे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होतात. रक्तवाहिन्या कठीण होणे, इन्शुलिनच्या कार्यात अवरोध निर्माण होणे, झोपेत श्वासाला अवरोध होणे, हे सर्व धोकादायक बदल लठ्ठपणाचा परिणाम आहेत. (healthy Lifestyle : physical inactivity increases risk of heart attack read story)

शरीराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पुरेसा रक्तपुरवठा व प्राणवायूचा पुरवठा होणे गरजेचे असते. वजन वाढल्यामुळे शरीरातील सर्वच घटकांचे आकारमान वाढत जाते. या वाढलेल्या शरीराच्या आकारमानाला योग्य प्रमाणात रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला अधिक कार्य करणे भाग पडते.

त्यामुळे हृदयाचा आकार हळूहळू वाढू लागतो. त्यातच रक्तवाहिन्या कठीण होऊ लागल्या तर रक्तदाब वाढतो व हृदयाच्या आकारात आणखीनच वाढ होते.

लठ्ठपणामुळे हृदय विकार होऊन मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब यांचा संबंध सर्वज्ञात आहे. रोजच्या आयुष्यातील ताणतणाव, चुकीची आहारपद्धती, यामुळे उच्चरक्तदाबाचा धोका वाढतो.

बी एम आय १ ने वाढला की रक्तदाबाचा धोका १२ टक्क्यांनी वाढतो, असे म्हणतात. उच्च रक्तदाबाच्या परिणामामुळे हार्ट अटॅक व ब्रेन स्ट्रोक यांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे.

शरीरातील सर्वांत महत्त्वाचा अवयव म्हणजे रक्तवाहिन्यांच्या आतील आवरण होय. हे आवरण खराब होऊ लागले की रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी होते, त्यांची प्रसरण पावण्याची क्षमता कमी होते आणि आवरणाच्या आतील बाजूस कोलेस्ट्रॉल साठू लागले की रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो.

या दुष्परिणामांचे लठ्ठपणा हे प्रमुख कारण आहे. अर्थात, वजन कमी केले तर रक्तवाहिन्या पूर्ववत होऊ शकतात.