वाचा इन्सुलीन रेझिस्टन्सपासून...

आधुनिक जीवनशैली आपल्याबरोबर बरेच नवीन त्रास घेऊन येते आहे, हे प्रत्येकाला जाणवते आहे. सतत एका जागी बसून काम करण्याची गरज, कामाचा खूप प्रमाणात ताणतणाव, झोपेच्या वेळांचे पालन न करता येणे, आहाराची काळजी घेता न येणे, प्रोसेल्ड फूड व फास्ट फूडचे अतिसेवन, आपल्या स्वयंपाकघरात चुकीचे स्निग्धपदार्थ व चुकीच्या साखरेचा झालेला प्रवेश वगैरेंमुळे वेगवेगळे रोग उत्पन्न होत आहेतच.
Insulin Resistance
Insulin Resistance sakal

डॉ. मालविका तांबे

आधुनिक जीवनशैली आपल्याबरोबर बरेच नवीन त्रास घेऊन येते आहे, हे प्रत्येकाला जाणवते आहे. सतत एका जागी बसून काम करण्याची गरज, कामाचा खूप प्रमाणात ताणतणाव, झोपेच्या वेळांचे पालन न करता येणे, आहाराची काळजी घेता न येणे, प्रोसेल्ड फूड व फास्ट फूडचे अतिसेवन, आपल्या स्वयंपाकघरात चुकीचे स्निग्धपदार्थ व चुकीच्या साखरेचा झालेला प्रवेश वगैरेंमुळे वेगवेगळे रोग उत्पन्न होत आहेतच. आज अनेकांना होणारा त्रास आहे तो म्हणजे इन्सुलीन रेझिस्टन्स.

इन्सुलीन हे आपल्या शरीरातील महत्त्वाचे हॉर्मोन आहे, जे शरीरात साखरेचे पचन करायला मदत करते. ज्याप्रमाणे आपल्याला घरात जाण्याआधी किल्लीने कुलूप उघडावे लागते, त्याचप्रमाणे आपल्या पेशींमध्ये साखर आत पाठवायची असेल तर त्यासाठी इन्सुलीन ही किल्ली आहे. साखर आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असते, कारण साखरेतूनच खरी ताकद मिळते. जेव्हा ही किल्ली काम करेनाशी होते तेव्हा या अवस्थेला इन्सुलीन रेझिस्टन्स म्हटले जाते. यात शरीरातील पेशी इन्सुलीनला स्वतःवर काम करू देत नाहीत. याकडे दुर्लक्ष झाले तर त्याचे रूपांतर मधुमेहासारख्या आजारात होते. याला आपण रोगाचे पूर्वरूप म्हणू शकतो. इन्सुलीन रेझिस्टन्सच्या दिसणाऱ्या लक्षणांमध्ये वजन वाढण्याची प्रवृत्ती दिसते, विशेषतः पोट व नितंब यांवर मेदवृद्धी जास्त झालेली दिसते. त्याचप्रमाणे थकवा, अंगदुखी, कामात मन न लागणे, ब्रेन फॉग, मान व काखेची त्वचा काळवंडणे वगैरे त्रास आढळतात. याचवेळी यावर काम केले तर रोगापासून कदाचित लांब राहता येऊ शकेल, पण किल्लीवर काम करण्याऐवजी फक्त साखर सोडण्याचा सल्ला दिला जातो.

आयुर्वेदामध्येही रोग होण्यापूर्वी त्याचे पूर्वरूप सांगितलेले आहे. प्रमेह किंवा मधुमेहाचे पूर्वरूप सांगत असताना म्हटले आहे की या काळात तोंडात दातांच्या आजूबाजूला घाण जास्त साठते म्हणजे ओरल हायजिन कमी होते, हात व पायाची जळजळ जाणवते, संपूर्ण शरीरात एक वेगळाच चिकटपणा जाणवतो. त्याचबरोबरीने जास्त प्रमाणात तहान लागणे, सतत लघवीला जाण्याची भावना होणे, लघवी साफ न होणे, अंगाला वास येणे व जास्त प्रमाणात घाम येणे अशा प्रकारची लक्षणे दिसू लागतात.

आयुर्वेदानुसार मधुमेहाची कारणे

जास्त प्रमाणात जेवणे, जास्त झोपणे, दह्याचा अतिवापर, मांसाहार अधिक प्रमाणात करणे, दूध वा दुधाचे पदार्थ व नवधान्ये जास्त प्रमाणात खाणे, गोड पदार्थांचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, आळस वगैरे कारणे आयुर्वेदात प्रमेह वा मधुमेह होण्यासाठी सांगितलेली आहेत. आयुर्वेदानुसार आहारात स्निग्धता व मधुरता गरजेची असते असे सांगितलेले असले तरी यांचे अतिसेवन झाल्यास त्रास होऊ शकतो. एकूणच आजच्या जीवनशैलीचा विचार केला तर यातील बऱ्याच गोष्टी आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यात घडत आहेत असे दिसेल. त्यामुळे असा प्रकारची जीवनशैली ठेवली तर त्रास होण्याची शक्यात सर्वाधिक असते. या आजारापासून वाचायचे असेल तर आपल्याला काय करता येईल हे आपण पाहू या.

इन्सुलीन अर्थात शरीरातील अग्नी. आपल्या पाचकाग्नीवर कार्य करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

सकाळी वेळेत उठण्यापासून दिनचर्येची सुरुवात होते. शक्यतो सूर्योदयाच्या आधी उठणे अग्निसंवर्धनाकरिता उत्तम. उशिरा उठल्यास शरीरात दोषांचे असंतुलन तयार होते व नंतर खाल्लेले अन्न पचायला त्रास होतो. सकाळी लवकर उठल्यावर व्यायाम करणे अत्यंत महत्त्वाचे असते. रोज किमान ३०-४० मिनिटे चालणे, १० मिनिटे प्राणायाम करणे, किमान अर्धा तास योगासने करणे उत्तम. दिवसभरात जमेल तेव्हा थोडे चालणे बरे. जास्त आराम करणे, आळस करणे आयुर्वेदात चुकीचे सांगितलेले आहे. दुपारी झोपणे टाळावे. पोहणे, टेनिस खेळणे वगैरे एखाद्या आवडत्या खेळाचा सराव करावा, सतत टीव्ही-मोबईल पाहणे टाळावे.

जेवढे वजनावर नियंत्रण राहील तेवढे शरीरातील कफदोषावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. याचा अर्थ असा नाही की वजन कमी करण्याचा सतत प्रयत्न करावा. प्रत्येकाचा प्रकृतीनुसार, आनुवंशिकतेनुसार एक योग्य वजनाचा आकडा असतो. त्यानुसार आपले वजन आहे की नाही हे पाहावे. यासाठी आहाराची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. जेवणाच्या वेळा नियमित ठेवाव्यात. सकाळी ८-९ च्या सुमारास न्याहारी, दुपारी साडेबारा-दीडच्या दरम्यान जेवण, साडेसहा-सातच्या सुमाराला रात्रीचे जेवण करणे उत्तम. रात्रीचे १२-१४ तास पोटात आहार न जाणे चांगले. हा लंघन किंवा इंटरमिटेट फास्टिंगचा एक प्रकार आहे.

जेवणात गहू, तृणधान्ये, चांगल्या प्रतीचा तांदूळ, कारले, शेवग्याची शेंग, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये, गाजर, कोथिंबीर हे जास्त प्रमाणात ठेवावे. मसाल्यांमध्ये हळद, धणे, जिरे, वेलची, सूंठ, शोप यांचा वापर नक्की करावा. यातील हळद हा सगळ्यात महत्त्वाचा मसाला होय. हळद व आवळ्याची पूड मधात मिसळून घ्यावी किंवा आवळा व हळदीचे लोणचे आहारात ठेवावे. कढीपत्ता व कडुनिंबाची पाने आपल्या आहारात नक्की असावीत. नवीन धान्य पूर्णपणे टाळावे. आहारात दह्याचा वापर शक्यतो टाळावा. दही खायचे असल्यास ते ताजे असावे व तेही सकाळच्या जेवणात. रात्री दही खाऊ नये. आवडत असल्यास ताक नियमितपण घेतले तर चालू शकते. आरोग्याच्या हिशेबाने दह्याचा वापर कोणी, कधी व किती प्रमाणात करावा याबद्दलची माहिती डॉ. मालविका तांबे यू-ट्यूब चॅनेलवर दह्याच्या व्हिडिओत दिलेली आहे.

अपचनाचा त्रास जाणवत असल्यास दुर्लक्ष करू नये. जेवणापूर्वी छोटा आल्याचा तुकडा सैंधव मीठ लावून खावा. जेवल्यानंतर संतुलन अन्नयोग गोळ्या नियमित घेण्याचा फायदा होऊ शकतो. ज्याच्या घराण्यात मधुमेहाचा इतिहास आहे त्यांनी अधून मधून संतुलन पुनर्नवासव, जम्ब्वासव घ्यायला हरकत नाही. जांभूळ व ताडगोळा ही दोन्ही फळे मधुमेहात उत्तम समजली जातात, त्यांचा ऋतूनुसार वापर करणे उत्तम ठरते. शरीरातील अग्नीने व्यवस्थित कार्य करावे अशी इच्छा असली तर शरीरशुद्धी करून घेणे उत्तम असते. ज्यांच्या घरात मधुमेहाचा किंवा हृदयरोगाचा इतिहास असेल त्यांनी वेळोवेळी वैद्यांच्या सल्ल्याने संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेणे उत्तम. यासाठी वेळेवर कमी दिवस दिल्यास आजारापासून लांब राहणे शक्य असते. आजार झाल्यावर मात्र शरीरशुद्धीसाठी जास्त दिवस लागू शकतात.

मानसिक सकारात्मकतासुद्धा आपल्याला इन्सुलीन रेझिस्टन्स कमी ठेवायला मदत करू शकते. यासाठी श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे स्पिरीट ऑफ हार्मनी, सोम ध्यान, समृद्धी स्वास्थ्यसंगीत ऐकणे उत्तम. शक्य झाल्यास रोज ध्यानही करावे. दिनचर्येत संपूर्ण शरीराला संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे तेल लावणे, रात्री झोपताना पादाभ्यंग घृत व काशाच्या वाटीने पादाभ्यंग करणे, शक्यतो झोपण्यापूर्वी संतुलन ब्रह्मलीन तेलासारखे तेल डोक्याला लावणे या सगळ्यांचाही उपयोग होऊ शकेल.

जीवनातील असंतुलन वेगवेगळ्या आजाराला कारणीभूत ठरते. त्याचा विचार करून श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांनी लाइफ इन बॅलन्स ही संकल्पना समोर आणली. यात सांगितलेला क्रम पाळल्यास आपसूक दिनचर्या व ऋतूचर्या पाळली जाते व एकूणच आरोग्यासाठी पाळायच्या नियमांचे पालन केले जाते. ज्यांना यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी lifeinbalance.in या साइटला भेट द्यावी. एकूणच काय तर साखरेसारखी शरीरासाठी आवश्यक असलेली शक्तीदायी गोष्ट पचवता आलीच पाहिजे असा आग्रह आपण धरला पाहिजे. अग्नी जेवढे व्यवस्थित कार्य करेल तेवढी पचनशक्ती व्यवस्थित राहून साखरेचे पचन होण्यास मदत होईल. अशा प्रकारे इन्सुलीन रेझिस्टन्सपासून इन्सुलीन ॲक्सेप्टन्सला जायला आयुर्वेदाची मदत आपल्याला नक्कीच घेता येऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com