Dry eye disease : स्क्रिन करतोय मुलांचे डोळे कोरडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

laptop computer mobile Screen children eyes are dry health issue mumbai

Dry eye disease : स्क्रिन करतोय मुलांचे डोळे कोरडे

मुंबई : अधिक काळ लॅपटॉप, टीव्ही किंवा मोबाईलच्या स्क्रिनकडे पाहिल्यामुळे डोळे कोरडे पडत असल्याची तक्रार अनेक नोकरदार व्यक्ती करत असतात. कोरोना कालावधीत घरूनच शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही ही समस्या आढळून आल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मात्र, आता शाळा-महाविद्यालये नियमितपणे सुरु झाले असले तरी ही समस्या विद्यार्थ्यांमध्ये अजूनही दिसून येत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. नोकरदार, विद्यार्थी, विविध स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणारे आणि गृहिणींचाही ‘स्क्रिन टाईम’ वाढला आहे. लॅपटॉपवर सलग बराच वेळ काम करणे, एकाच वेळी मोबाईल आणि लॅपटॉपवर काम करणे, सलग सहा ते सात तास ऑनलाइन शिक्षण घेणे अशा काही कारणांमुळे हा ‘स्क्रिन टाईम’ वाढला आहे.

डोळे कोरडे पडणे म्हणजे काय?

आपल्या डोळ्यांमध्ये अश्रूंचा पडदा असतो. त्यामुळे डोळे ओलसर राहतात. हा पडदा डोळ्यांचे सुरक्षा कवच म्हणून काम करतो. आपण ज्यावेळी सातत्याने स्क्रिनकडे पाहतो, त्यावेळी डोळ्यांवर ताण येतो आणि त्यामुळे डोळ्यांतून पाणी येते. कालांतराने डोळ्यांत योग्य प्रमाणात पाणी तयार न होणे, अश्रू लवकर वाळणे असे प्रकार घडतात आणि डोळे कोरडे पडतात, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. लहान मुलांना डोळ्यांच्या समस्येबद्दल नीटसे सांगता येत नाही. ते डोळे चोळत बसतात. त्यामुळे पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

उघडझाप होण्याचे प्रमाण घटते

संगणकाच्या स्क्रिनकडे पाहत असताना डोळ्यांची नियमित होणारी उघडझाप ६६ टक्क्यांनी कमी होते. डोळ्यांच्या निरोगीपणासाठी ही उघडझाप आवश्‍यक असते.

समस्येपासून मुलांना दूर कसे ठेवावे?

  • संगणकावरच मुलांचा अभ्यास असेल तर त्यांना नियमित कालावधीने विश्रांती घ्यायला लावावी

  • मोबाईल अथवा संगणकावरील गेम हे प्रमाण कमी करावे

  • डोळ्यांत जळजळ निर्माण करणाऱ्या धुरापासून दूर ठेवावे

  • गॉगल-चष्म्याचा वापर करावा

  • रोज सकाळी मुलांच्या डोळ्यांवर ओलसर कपड्याची पट्टी थोडा वेळ ठेवावी.

  • संगणक स्क्रिनपासून त्यांना किमान २० ते २५ इंच दूर बसून काम/अभ्यास करण्याची सवय लावावी

  • अधिक त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

आहारात या गोष्टींचा समावेश करा

  • हिरव्या पालेभाज्या : ‘क’ जीवनसत्त्व डोळ्यांसाठी उपयुक्त

  • सोयाबिन : फायबर आणि प्रथिनसमृद्ध असतात

  • मासे : यातील ओमेगा-३ हे स्निग्धाम्लामुळे जळजळ कमी

  • पाणी : योग्य प्रमाणात पाणी पिणे आवश्‍यक

लहान मुलांमधील डोळे कोरडे पडण्याचे प्रमाण

३ टक्के - कोरोना काळापूर्वी

६७ टक्के - कोरोना काळानंतर

लहान मुलांमध्ये मोबाईल बघण्याचं प्रमाण वाढल्याने त्यांच्यामध्ये डोळे कोरडे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. कोरोना उद्रेकाच्या आधी लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण अत्यल्प होते. पण, आता बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या दहापैकी पाच मुलांची डोळे कोरडे होणे ही तक्रार असते.

- डॉ. जाई केळकर, नेत्ररोग तज्ज्ञ