
माझे वय ५२ वर्षे आहे. सध्या मला विस्मरणाचा त्रास व्हायला लागला आहे. काम करायला निघते पण तेथे गेल्यावर काय काम करायचे आहे हे लक्षात येत नाही. गॅसवर दूध ठेवल्यावर नंतर गॅस बंद करायचे लक्षात राहत नाही. असे सध्या बऱ्याच वेळा होत आहे. मुख्य म्हणजे कुणाचे नाव पटकन आठवत नाही. यासाठी मी काय करू शकते?
- नंदा जंगम, अक्कलकोट
उत्तर : वाढत्या वयाबरोबर शरीरात वेगवेगळे त्रास दिसू लागतात. स्मरणशक्ती कमी होणे हा त्यापैकी असलेला एक त्रास होय. पण असा त्रास होण्यासाठी ५२ हे वय खूप कमी आहे. सध्या तरी स्वतःसाठी एक वही करावी, त्यात आपल्याला काय कामे करायची आहेत हे लिहावे, तसेच हा त्रास किती वेळा जाणवतो आहे, कशा प्रकारचे विस्मरण आहे हे वहीत नोंदवावे. यामुळे दिवसागणिक त्रास वाढतो आहे की काय हे लक्षात येईल. रोज एखादे पुस्तक न चुकता वाचणे, वाचलेल्या भागावर आपल्या मैत्रिणींसोबत चर्चा करणे, यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढू शकते. रोज एखादे-दोन स्तोत्रे म्हणण्याचा फायदा होऊ शकले.
रात्री झोपताना दुसऱ्या दिवशी करायच्या कामांची यादी करावी. रोज आहारात संतुलन अमृतशर्करायुक्त पंचामृत, ४-५ भिजवलेले बदाम, घरी केलेले गाईचे साजूक तूप, लोणी यांचा समावेश असावा. ब्राह्मी, जटामांसी, शंखपुष्पी, अश्र्वगंधा, वेखंड इत्यादींपासून तयार केलेल्या सॅन ब्राह्मी वटी, मेमोसॅन, अश्र्वसारस्व वगैरे घेण्याचा फायदा होऊ शकेल. शक्य झाल्यास वेळ काढून संतुलन पंचकर्म करून शरीरशुद्धी करून नंतर शिरोधारा, शिरोबस्ती वगैरे उपचार घेतल्याचा फायदा होऊ शकेल. रोज सकाळी संतुलन ब्रह्मलीन घृतासारखे घृत घेणे उत्तम. यामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढायला मदत मिळते.