
वीरासन हे दंडस्थितीमधील आसन आपण बघणार आहोत. वीर म्हणजेच योद्धा.
योग जीवन : वीरासन
वीरासन हे दंडस्थितीमधील आसन आपण बघणार आहोत. वीर म्हणजेच योद्धा.
असे करावे आसन
प्रथम ताठ उभे राहावे. त्यानंतर डावा पाय पुढे घ्यावा. दोन्ही पावलांत साधारण अडीच ते तीन फूट किंवा उंचीनुसार कमी-जास्त अंतर घ्यावे.
मागचा पाय आहे म्हणजेच इथे उजवा पाय. त्याचे पाऊल उजव्या दिशेला वळवावे.
डावा पाय गुडघ्यात वाकवून गुडघा आणि घोटा साधारणपणे एक रेषेत असावे.
डावी मांडी जमिनीला समांतर असावी. दोन्ही हातांचा नमस्कार करून हात वरच्या दिशेला घ्यावेत.
दोन्ही दंड कानाला टेकलेले व कोपरात ताठ असावेत. नजर व मान वरच्या दिशेला असावी. श्वसन संथ सुरू ठेवावे.
या आसनस्थितीमध्ये कमरेतून थोडे मागे वाकावे. मागच्या पायाचा गुडघा ताठ असावा.
छायाचित्राप्रमाणे आसन करण्याचा प्रयत्न करावा. एक बाजूने कृती झाली की दुसऱ्या बाजूनेही आसन करावे.
आसनाचे फायदे
या आसनाच्या नियमित सरावाने मांडी व संपूर्ण पायाचे स्नायू सुदृढ होतात.
पायदुखी, पाठदुखी कमी होते. संपूर्ण शरीराचे रक्ताभिसरण सुधारते.
गळा, छाती, पोट यांना उत्तम ताण बसल्याने तेथील कार्यक्षमता वाढते.
थायरॉइड, मधुमेह, अस्थमा, पचनासंबंधी तक्रारी, श्वसनाचे त्रास कमी होण्यास मदत होते. फुफ्फुस आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते.
लहान मुलांना उंची वाढविण्यासाठी उपयुक्त, पाठीचा कणा अधिक लवचिक आणि सुदृढ होतो.
आत्मविश्वास, प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.