गोडवा आंब्याचा...

‘आंबा’ असे नुसते म्हणण्यानेही मनाला तृप्त वाटते कारण आंबा एकाच वेळी पंचेद्रियांपैकी चार इंद्रियांना सुखावह असतो.
mango health benefits ayurveda skin glow heart
mango health benefits ayurveda skin glow heartesakal
Updated on
Summary

‘आंबा’ असे नुसते म्हणण्यानेही मनाला तृप्त वाटते कारण आंबा एकाच वेळी पंचेद्रियांपैकी चार इंद्रियांना सुखावह असतो.

‘आंबा’ असे नुसते म्हणण्यानेही मनाला तृप्त वाटते कारण आंबा एकाच वेळी पंचेद्रियांपैकी चार इंद्रियांना सुखावह असतो. तेजस्वी पिवळा रंग, मोहक मधुर गंध, अवीट गोड चव आणि रसरशीत मऊ गर अशी एकाहून एक सरस वरदाने निसर्गाने आंब्याला दिली आहेत.

आयुर्वेदानुसार पिकलेला गोड आंबा स्निग्ध, गुरु असून वातशमन करतो, मात्र पित्त वाढवत नाही, शुक्रधातूची शक्ती वाढवतो, एकंदर शक्ती वाढवतो, हृदयासाठी हितकर असतो व कांती उजळण्यास मदत करतो. पण आंब्याचे हे गुण हवे असले तर तो डोंगराळ प्रदेशात उगवलेला असावा.

सामान्यतः आंब्याचे फळ पूर्ण पिकायच्या आधीच काढले जाते व सुकलेल्या गवतात ठेवून पिकवले जाते. याने फळ खराब होत नाही. आंबा आवडत नाही अशी व्यक्ती विरळीच. संगीत न आवडणाऱ्या व्यक्तीला जशी औरंगजेब म्हणायची पद्धत पडलेली आहे. तसेच आंबा न आवडणारी व्यक्तीही कुठली तरी असुरच असणार. स्वयंपाक बेचव, बेसूर वाटत असताना ताटात एक आमरसाची एक वाटी ठेवली तर जेवणात सातही सूर गवसतात व अर्धी पोळी अधिकच खाल्ली जाते. अशी आहे आमरसाची महती.

एखाद्या अमृतसंचयाच्या ठिकाणी रक्षण करायला एखादा काळाकभिन्न पहारेकरी असावा तसे आंब्याच्या देठाच्या ठिकाणी चीक असतो. हा चीक जर नीट काढून टाकला नाही व तोंडाला लागला तर फोड येण्याची फार वाट पाहावी लागत नाही. तसेही उष्ण प्रकृती असणाऱ्यांनी आंबा खाल्ला तर शरीरावर गळवे येऊ शकतात.

आंब्यामुळे उष्णता वाढू नये यासाठी आंबा खाण्यापूर्वी वाहत्या पाण्याने स्वच्छ धुवावा व तासभर थंड (सामान्य तापमानाच्या) पाण्यात बुडवून ठेवावा, आंबा खायची सर्वांत चांगली पद्धत म्हणजे त्याचा रस काढावा, आतील दोरे, रेषा निघून जाण्यासाठी चाळणीने चाळून घ्यावा. अशा वाटीभर रसात २-३ चमचे पातळ केलेले आयुर्वेदिक तूप, दोन चिमूट सुंठ पूड किंवा वेलची, दालचिनी, तमालपत्र, नागकेशर यांचे समभाग मिश्रण मिसळावे.

असा आंब्याचा रस खाल्ल्यास अशक्तता दूर करून शुक्रधातूची ताकद वाढते, कफदोषाचे संतुलन झाल्याने शांत झोप यायला मदत मिळते, वजन कमी असल्यास वाढते, चिडचिडेपणा कमी होतो, हृदयाची ताकद वाढते.

आयुर्वेदात आंब्याची साल, पाने, मोहोराचेही उपयोग सांगितलेले आहेत. आंब्याची ओली साल अंघोळीच्या आधी अंगाला चोळल्यास त्वचेचे पोषण होतो तसेच त्वचा घट्ट व्हायला मदत मिळते. सालीच्या काढ्याच्या गुळण्या केल्यास वारंवार तोंड येणे कमी होते. ही साल गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठीही उपयुक्त असते.

या काढ्याची उत्तरबस्ती घेतल्यास गर्भाशयाची सूज कमी होऊन अंगावरून पांढरे किंवा रक्तस्राव होणे थांबते, मात्र हा उपचार तज्ज्ञांकडूनच करून घ्यावा. ‘पंचपल्लव’ या गणामध्ये आंब्याच्या पानांचा अंतर्भाव आहे. ही तुरट चवीची असतात. कोवळी पाने चावून थुंकून दिल्याने तोंड स्वच्छ होते, हिरड्या-दातांचे आरोग्य सुधारते व हिरड्या घट्ट होतात.

स्त्रियांना अंगावरून फार दिवस रक्तस्राव होत असल्यास आंब्याची फुले मधात मिसळून वरून तांदळाचे धुवण घेतल्यास फायदा होतो. साठवलेला आंब्याचा रस सीझननंतरही खाता येतो. पण पावसाळ्यात आंबा सांभाळूनच खावा. म्हणूनच पावसाळा सुरू झाला की आंब्याला भाव राहत नाही. सगळ्यांनाच आंबा हवाहवासा वाटत असला व आवडत असला तरी मधुमेहींना आंब्याचा खरा धोका.

आंबा जरी गोड असला तरी त्याचे ‘आम’ हे नाव अधिक वस्तुस्थिती दाखवणारे आहे. वास्तविक आपल्या सर्वांना व्हायचे असते निरामय - निर्‌-आमय, कारण निरामयताच आरोग्य देते. आंबा कितीही चांगला असला तरी तो खाल्ल्याने आम वाढणार नाही याकडे लक्ष एकवटायलाच पाहिजे. ज्यांना आमवाताचा त्रास आहे, जराही आंबट खाल्ले तरी ज्यांचे सांधे दुखतात अशा लोकांनी रक्तविकार असणाऱ्यांनी आंबा गोड असला तरी सांभाळूनच खावा.

मी केनियाला गेलो असताना तेथे आंब्याची जाडे पाहिली. प्रत्येक झाड आपल्या आंब्याच्या झाडाच्या चौपट, पाचपट तरी मोठे होते. तपास करताना असे कळले की तेथे आंब्याच्या झाडाला वर्षातून दोन वेळा फळे येतात. पूर्वी कधी तरी तेथला एक राजा भारतात शिकायला आला होता. परत जाताना त्याला कुणी तरी भेट दिलेली आंब्याची दोन झाडे त्याच्या देशात घेऊन गेला.

त्या दोन झाडांपासून तेथे सांप्रतचे आम्रवन तयार झालेले आहे. आफ्रिकेतील जमीन आंब्याला इतकी मानवली की मूळ भारतापेक्षाही आफ्रिकेत ते अधिकच फोफावले, त्याला वर्षातून दोनदा फळे यायला लागली व तीही मोठी मोठी. आज जगभर आफ्रिकेतून आंबे निर्यात केले जातात. पण हापूसच्या आंब्याची चव त्या आंब्यांना नाही.

तसे पाहता राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश वगैरे ठिकाणी आंब्याच्या निरनिराळ्या जाती मिळतात. केसरिया आंब्याचा रस कितीही गोड असला तरी हापूस-पायरीची सर कशालाच येत नाही. महाराष्ट्रातील जमिनीचा हा गुण म्हणू या. महाराष्ट्रात जन्मलेले संतमहात्मे, महापुरुष, राजकारणातील नेते यांच्या चारित्र्याला व कर्तृत्वाला जशी तोड नाही, तसेच फळांचा राजा असलेल्या येथील आंब्याच्या चवीलाही तोड नाही. आंब्याला राजा का म्हणायचे तर तुष्टी, पुष्टी देऊन राजा जसे प्रजेचे रक्षण करतो तसे आंबा जर योग्य वेळी व योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात खाल्ला तर सर्व धातूंचा व पर्यायाने वीर्यवृद्धी व ओजवृद्धी करून शरीराची पुष्टी वाढवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com