Measles : गोवर उद्रेकाची मुंबईत भीती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Measles

Measles : गोवर उद्रेकाची मुंबईत भीती!

मुंबई : गोवंडीत गोवरसह रुबेलाची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे मुंबईत गोवरची लाट (पीक पिरियड) नजीकच्या काळात कधीही येऊ शकते. ही लाट नेमकी कधी येते, यासाठी रुग्णसंख्येवर लक्ष ठेवावे लागणार आहे. गोवरचा पीक पीरिएड गाठल्यानंतर समाजात नैसर्गिक इम्युनिटी तयार होईल, परंतु त्यासोबतच लसीकरणालाही अधिक प्रमाणात प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मुजीब सय्यद यांनी सांगितले.

गोवंडी परिसरातील नागरिकांकडून बालकांच्या लसीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याने गोवरच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे मौलवींनी शुक्रवारी नमाजच्या दिवशी लसीकरण तसेच गोवरच्या आजारावर उपचारांसाठी नागरिकांनी पुढे यावे असे आवाहन केले. या सगळ्या प्रक्रियेत समाजाला वेळीच रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक गोष्टींची काय गरज आहे, हेदेखील सर्वसामान्यांना पटवून द्यावे, अशी विनंती डॉ. सय्यद यांनी केली केली.

गोवरचा डी-८ व्हेरिएंट

मुंबईत गोवंडीत आढळलेला गोवरचा विषाणू हा डी-८ टाईपचा आहे. याआधी २०१९ मध्ये हाच व्हेरिएंट आढळून आला होता. त्यामुळे गोवर, रुबेलाच्या रुग्णांचे घसा, लघवी, थुंकीचे नमुने हे पुण्यातील प्रयोगशाळेत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. यूपी, बिहारमधील स्थलांतरित लोक मोठ्या प्रमाणात गोवंडी परिसरात वास्तव्यास आहेत. कमी शिक्षण, लसीकरणाबाबतची माहिती नसणे, अनेक कारणांमुळे लसीकरण रखडले जाणे यांसारख्या अनेक कारणांमुळे गोवरचे रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात गोवरच्या ५०३ रुग्णांची नोंद झाली आहे. या वर्षी राज्यात गोवरचा २६ वेळा उद्रेक झाला आहे.

गोवरने सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू?

सहा महिन्यांच्या मुलीचा गोवरमुळे संशयित मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सकिना अन्सारी असे या मुलीचे नाव आहे. हा मुंबईतील आठवा संशयित मृत्यू आहे. ही मुलगी ऑक्टोबरमध्ये भिवंडीत राहायला गेल्याची नोंद आहे. तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात मंगळवारपासून उपचार सुरू होते. ताप व पुरळ असलेल्या एकूण आठ संशयित रुग्णांचे मृत्यू झाले असून, मृत्यू पुनर्विलोकन समितीमार्फत अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे निश्चित निदान प्राप्त होणार आहे.

मुख्यमंत्र्यांकडून आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुंबईसह राज्यातील गोवर परिस्थितीचा आढावा घेतला. गोवरमुळे भरती रुग्णांची देखभाल काळजीपूर्वक करण्यात यावी, याबाबत त्यांनी सर्व संबधितांना सूचना दिल्या.