
डॉ. मालविका तांबे
स्त्रीच्या आयुष्यात अनेक वेगवेगळे बदल होत असतात. बालपण, रजोदर्शन (पाळीची सुरुवात), गर्भधारणा, प्रसूती, रजोनिवृत्ती, येणारे वार्धक्य या सगळ्या टप्प्यांवर तिच्या शरीरात वेगवगेळ बदल होताना दिसतात. या सगळ्या बदलांच्या मुळाशी असते तिच्या पाळीचे आरोग्य. पाळीच्या दरम्यान प्रत्येक महिन्याला तिच्या शरीरातून ३ ते ४ दिवस रक्तस्राव होत असतो. पाळीची सुरुवात जरी तेराव्या-चौदाव्या वर्षी होत असली तरी पाळीच्या आरोग्याचा पाया तिच्या बालपणात रोवला जातो. पाळी सुरू झाली की ३-४ दिवस रक्तस्राव होणे, प्रसूती होणे व साधारण पन्नाशीच्या सुमाराला रजोनिवृत्ती होणे या गोष्टी स्त्रीच्या आयुष्यात होत असतात. रजोनिवृत्तीनंतर स्त्रीच्या आयुष्यात येणाऱ्या वाताच्या काळातील आरोग्य पाळीच्या आरोग्यावर अवलंबून असते. पाळी नियमित येणे हे तिच्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित असल्याचे लक्षण आहे.