
Dancing Benefits : नाचो नाचो! डान्स घालवेल तुमचं टेंशन अन् डिप्रेशन, कसं? वाचा सविस्तर
Dancing Benefits : म्युझिकच्या तालावर बऱ्याच लोकांना नाचायची इच्छा होते. डान्स खरं तर एक मजेशीर व्यायाम आहे. मात्र हा कधी कधी न करता रोज केला तर त्याचा किती फायदा होऊ शकतो माहितीये? नाचण्याने तुमचे सगळे फॅट्स बर्न होतात आणि स्ट्रेस तुमच्या मानसिकतेवर हावी होत नाही. चला तर आज नाचण्याचे संपूर्ण आरोग्यदायी फायदे आज आपण जाणून घेऊयात.
वजन कमी होते : लोक नृत्याचा जितका आनंद घेतात, तितकाच त्याचा फायदा होतो. विशेषत: ज्यांना त्यांचे वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी तर हा व्यायाम उत्तमच आहे. नृत्य हा एक उत्तम व्यायाम मानला जातो कारण तो खूप कॅलरीज बर्न करतो आणि वजन वेगाने कमी करतो.

हृदयाचे आरोग्य सुधारते : नृत्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. तुम्ही जितक्या वेगाने नाचता तितक्या वेगाने तुमचे हृदय धडधडते. यामुळे हृदय मजबूत आणि निरोगी होते. हृदय चांगले कार्य करते. म्हणूनच नृत्य हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. एका संशोधनात असे आढळून आले की ज्या लोकांचे हृदय कमकुवत होते आणि त्यांनी डान्सचा सराव केला त्यांच्या हृदयाचे आरोग्य, श्वासोच्छ्वास आणि जीवनाची गुणवत्ता सायकल चालवणाऱ्या किंवा ट्रेडमिलवर चालणाऱ्या लोकांपेक्षा चांगली होती.
स्मरणशक्ती वाढते : 'द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन'च्या अहवालानुसार, नृत्यामुळे तुमची स्मरणशक्ती सुधारते. हे डिमेंशियापासून तुमचे रक्षण करते. एरोबिक नृत्य मेंदूचा तो भाग सुधारतो, जो स्मरणशक्ती नियंत्रित करतो. नृत्यातील डान्स स्टेप्स आणि वेगवेगळ्या हालचाली लक्षात ठेवल्याने मन तेज होते. प्रत्येक वयोगटात याचा फायदा होतो.
बॉडी बॅलेंस चांगला राहातो : जर्नल ऑफ एजिंग अँड फिजिकल अॅक्टिव्हिटीमधील संशोधन असे सूचित करते की टँगो नृत्य वृद्ध प्रौढांमध्ये संतुलन सुधारण्यास मदत करते. जर एखाद्याला वाढत्या वयाबरोबर आरोग्याची चिंता असेल तर तो डान्सची मदत घेऊ शकतो. डान्स स्टेप वेगवान आणि लवचिक असल्याने शरीरावर चांगले नियंत्रण ठेवता येते. (Dancing)
आनंदी जीवन जगणे : नृत्यामुळे तणाव कमी होतो आणि आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. नैराश्याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला डान्स करण्याचा सल्ला दिला जातो. डान्स ग्रुपमध्ये सामील झालेल्यांमध्ये तणाव कमी असल्याचे एका अभ्यासात आढळून आले आहे. असे लोक खूप आनंदी राहातात. (Health)