ध्यानासाठी आवश्यक पूर्वतयारी

‘ध्यानस्थ’ लेखमालेतून गेले चार महिने आपण भेटत आहोत. जगभरातून खूप छान प्रतिसाद मिळतो आहे.
Necessary Prerequisites for Meditation yoga meditative
Necessary Prerequisites for Meditation yoga meditativeSakal

- मनोज पटवर्धन

‘ध्यानस्थ’ लेखमालेतून गेले चार महिने आपण भेटत आहोत. जगभरातून खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. बरेच जण एक प्रश्न विचारतात, ‘ध्यानासाठी पूर्वतयारी करायला हवी का?’ ध्यानाचा अभ्यास करताना काही पूर्वतयारी केल्यामुळे, ध्यानातून मिळणारा आनंद, शांततेची प्रचिती खूप वाढते.

ध्यानाला कसं बसावं?

भगवद्‌गीतेमध्ये थोडक्यात छान सांगितलंय.

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः।

संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्।।6.13।।

शरीर समस्थितीत (पुढे-मागे-बाजूला झुकलेलं नको), डोकं मानेवर व्यवस्थित तोललेलं, दृष्टी नाकाच्या टोकावर एकाग्र ठेवावी.

आसन

ध्यानासाठी पद्मासन सर्वोत्तम समजलं जातं. मात्र, ओढूनताणून पद्मासनात बसल्यामुळे लक्ष ध्यानातल्या सूक्ष्म संवेदनांवर एकाग्र होण्याऐवजी, गुडघे-घोट्यांना रग लागून तिकडे जाऊ शकतं. ध्यानात लक्ष शरीराकडे नसावं. ध्यानात्मक आसनामुळे झोप, पेंग, पायाला बधीरपणा येत नाही. सहजपपणे बसता येईल अशा कोणत्याही आसनात बसावं. वज्रासन, सिद्धासन, सुखासनही (साधी मांडी) चालेल.

अवयव ध्यान

आसनात बसल्यावर, शरीर शिथिल सोडावं. त्यामुळे श्वसन संथ होईल. शरीराची शिथिलता, श्वसनाची संथता अनुभवताना मनही शांत होईल. ‘शरीर शिथिल, श्वसन संथ आणि मन शांत!’

हातांच्या मुद्रा

ध्यान करताना हात खाली दिलेल्या कोणत्याही मुद्रेत ठेवावे.

द्रोणमुद्रा : ही अगदी साधी सोपी पध्दत आहे. हातांचे तळवे गुडघ्यांवर पालथे ठेवणे म्हणजे द्रोण मुद्रा. या स्थितीत तळव्यांना द्रोणासारखा खोलगट आकार येतो.

ज्ञानमुद्रा : अंगठा आणि त्याशेजारचं बोट गोलाकार वळवून, त्यांची टोकं अगदी अलगद एकमेकांना स्पर्श होतील अशी ठेवावीत. राहिलेली तीन बोटं सरळ (पण ताठरता नको) ठेवावी. अंगठा आणि तर्जनी यांचा अगदी हलका स्पर्श होऊ द्यावा. कोणताही अतिरिक्त दाब देऊ नये. इतर तीन बोटं फार ताठ ठेवू नयेत. नाहीतर मनगटांवर ताण येतो. अननुभवी शिक्षकांकडून शिकताना हे बारकावे लक्षात न आल्याने सोप्या गोष्टी अवघड, त्रासदायक होतात.

ध्यानमुद्रा : विवेकानंदांच्या चित्रात त्यांच्या हाताच्या तळव्यांची विशिष्ट स्थिती ती ध्यानमुद्रा. मनात निर्माण होणारी भावनिक आंदोलनं साधकाचं ध्यान विचलित करतात. या मुद्रेमुळे आंदोलनं शांत होतात. डावा आणि उजवा तळहात एकमेकांवर ठेवावा. दोन्ही तळवे आकाशाच्या दिशेने ठेवावेत. दोन्ही हाताच्या अंगठ्याची टोकं एकमेकांना जुळलेली ठेवावी.

प्राणायाम

नियमितपणे केलेला प्राणायाम ध्यानाला पूरक ठरतो. ‘धारणासु च योग्यता मनस:।’ असं पतंजलींचं सूत्रच आहे. प्राणायाम केल्यामुळे मनाची स्थिती ध्यानासाठी अनुकूल होते असं पतंजलींनी सांगितलं आहे. प्राथमिक भस्रिका, कपालभाती, अनुलोम-विलोम असा अगदी मुलभूत प्राणायाम आठ-दहा मिनिटं करावा.

ध्यानासाठी विषय कोणता घ्यावा?

एकाग्रतेची पुढची पायरी म्हणजे एकतानता. एकतानतेच्या वरचा टप्पा म्हणजे एकरूपता. ध्यानात आपण निवडलेल्या विषयाशी एकरूप होतो. म्हणून तो विषय पवित्र, सात्त्विक, शुभ असावा. आपल्या गुरूंची, आवडत्या देवतेची मूर्ती, चित्रं घेता येईल. ओमकार तर फारच उत्तम. आपल्या श्वासाची जाणीव, सुषुम्ना नाडीवरील चक्रं हे विषयही अंतर्मुखतेसाठी फार प्रभावी आहेत.

साक्षीभाव

आपण दिवसभर सतत काहीतरी कृती करत असतो. त्याकडे आपण जाणीवपूर्वक पहात नाही. प्रत्येक कृतीकडे हळूहळू साक्षीभावाने पहाण्याची सवय जडवून घ्यावी.

अशा प्रकारे आपण पूर्वतयारी करून ध्यान केलं तर ध्यानाची परिणामकरकता नक्कीच वाढेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com