
डॉ. मालविका तांबे
जीवनशैली हा आपल्या आरोग्यपूर्ण जीवनाचा मुख्य आधार आहे. सात्त्विक व पोषक आहार वेळेवर घेणे, रात्रीची शांत झोप, मन शांत व आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, निसर्गनियमांनुसार वागणे वगैरे जीवनशैलीचे महत्त्वाचे भाग असतात. दिवसाची वेळ काम करण्याची व रात्रीची वेळ शांत झोप घेण्याची, हा नियम साधारणपणे सगळीकडे लागू असलेला दिसतो. पण आपल्या जीवनाच्या आधुनिकीकरणाने बरेच व्यवसाय अशा प्रकारचे सुरू झाले, की ज्याच्यामध्ये रात्रपाळीचे काम करणे गरजेचे होत गेले. हॉस्पिटल्स, विमानतळे, हॉटेल्स, पोलिस दल, आर्मी, सिक्युरिटी वगैरे व्यवसायांमध्ये रात्रपाळीचे काम आवश्यक आहे, हे आपण समजू शकतो, पण आजच्या डिजिटल युगामध्ये रिमोटवर किंवा इंटरनॅशनल क्लायंट सपोर्ट असे काम करणारेसुद्धा बरेच अभियांत्रिकी/ सॉफ्टवेअर इंजिनिअर्स रात्रपाळीच्या कामाचे भाग झाले.