नॉन कोविड पेशंटच्या मनात सर्जरीची धास्ती; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

आता कोरोना रुग्ण कमी होत असल्याने नॉन कोविड रुग्ण पुन्हा रुग्णालयांकडे वळले आहेत. पण त्यांच्या मनात अद्यापही भीती कायम आहे.
Doctor Advice
Doctor AdviceFile Photos

कोरोना काळात नॉन कोविड रुग्णांबाबतही चिंता वाढू लागली आहे. कोरोनाच्या धास्तीने कॅन्सर, मधुमेह, आर्थरायटिस, हृदयाचे आजार असलेल्या रुग्णांना आपले उपचार घेतानाही भीती वाटत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत या रुग्णांचं रुग्णालयात येण्याचं प्रमाण कमी झालं होतं. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर हे रुग्ण आपले पुढील उपचार घेण्यासाठी रुग्णालयात येऊ लागले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हे प्रमाण पुन्हा कमी झालं आणि आता कोरोना रुग्ण कमी होत असल्याने नॉन कोविड रुग्ण पुन्हा रुग्णालयांकडे वळले आहेत. पण त्यांच्या मनात अद्यापही भीती कायम आहे. त्यामुळे असे रुग्ण आपली सर्जरी पुढे ढकलत आहेत. आणि यामुळे या रुग्णांनाही समस्या उद्भवू शकते, शिवाय डॉक्टरांनाही त्यांच्यावर उपचार करणं आव्हानात्मक बनेल, असे संचेती हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. पराग संचेती यांनी म्हटले आहे. (non covid patient cancer diabetes arthritis heart disease surgery related doctors advice)

कार्डिओलॉजी, ऑन्कोलॉजी विभागाप्रमाणे ऑर्थोपेडिक विभागासमोरही कोरोना काळात मोठी समस्या उभी आहे. सध्या ऑर्थोपेडिकमध्ये ट्रॉमा केसेस येत आहेत. जसं की एखादा अपघात, दुर्घटना झाल्यानंतर त्यामुळे फ्रॅक्चर होणं किंवा गंभीर दुखापत होणं यावर तात्काळ सर्जरी केल्या जात आहेत. त्यांना उपचारही आम्ही लगेच देत आहोत. याला इलेक्टिव्ह सर्जरी म्हणतात. पण नॉन इलेक्टिव्ह सर्जरी ज्या आवश्यक आहेत पण तात्काळ नाही झाल्या तरी हरकत नाही, इतर मार्गाने तात्पुरते त्यावर उपचार करता येतात, अशा सर्जरीचं प्रमाण कमी झालं आहे. संचेती रुग्णालयात 50 ते 70 टक्के सर्जरी या इलेक्टिव्ह सर्जरी होतात. बाकी नॉन इलेक्टिव्ह सर्जरी असतात. पण कोरोनामुळे अनेक रुग्णांनीच या सर्जरी पुढे ढकलल्या आहेत, असेही ते म्हणाले.

Doctor Advice
National Doctors Day: निस्वार्थ सेवेचा आदर्श ठेवणारे कर्मयोगी

जेव्हा कोरोना रुग्ण संख्या अधिक होती तेव्हा आम्ही रुग्णांचं आरोग्य लक्षात घेता त्यांना नंतर सर्जरी करण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत आम्ही त्यांना घरच्या घरी फिजिओथेरेपी करायला सांगितलं. टेलि कन्सलटेशनद्वारे व्यायाम दाखवायचो, वेदना कमी करण्याचा उपाय सांगायचो, असे पर्यायी तात्पुरते उपचार आम्ही करत होतो. पण आता कोरोनाचे रुग्ण संख्या घटली आहे, तरी रुग्ण स्वत: या सर्जरी पुढे ढकलत आहेत, अशी माहिती संचेती यांनी दिली.

पाठ, मान, गुडघे यांचं दुखणं वेळेत उपचार करून बरं करता येतं. पण कोरोनामुळे रुग्ण हे सर्व उपचार पुढे ढकलत आहे. त्यामुळे आम्हाला अशी भीती आहे, उपचार करता येण्यासारख्या या समस्या पुढे जाऊन गंभीर होतील. आम्ही सर्जरी करूनही कदाचित ते पूर्णपणे बरे होणार नाहीत. कोरोना पुढील दोन महिन्यात संपेल असं नाही. त्यामुळे एक-दोन-तीन वर्षे ऑर्थोपेडिक सर्जरी पुढे ढकलल्याने परिस्थिती गंभीर होऊ शकते. जिथं तुमची गुडघेदुखी एका छोट्याशा ऑपरेशनने पूर्ण बरी होऊ शकते. ती आणखी उशिराने केल्यास कदाचित सर्जरीचाही फारसा परिणाम होणार नाही. कारण ती वेळेत झाली तरच त्याचा फरक पडतो, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

Doctor Advice
Doctors Day: "डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध"

कोरोना काळातही अशा सर्जरी करण्यास घाबरू नका. कारण ज्या ऑर्थोपेडिक सर्जरी रुग्णालयात घेतल्या जात आहेत. त्यासाठी रुग्णाला इन्फेक्शन होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. सर्जरीच्या आधी रुग्णाची कोरोना टेस्टही केली जाते. शिवाय आता सर्जरीची प्रक्रियाही सोपी झाली आहे. सुरुवातीला सर्जरी करताना चिरफाड केली जायची. यावेळी रुग्णाला आठ ते पंधरा दिवस रुग्णालयाच ठेवावं लागायचं. त्याला बरं व्हायलाही खूप वेळ जायचा. पण आता रोबोटिक सर्जरीचा पर्याय उपबल्ध आहे, ज्याला मिनिमली इनव्हेसिव्ह सर्जरीही म्हणतात. अगदी छोटासा छेद देऊन ही शस्त्रक्रिया केली जाते आणि रुग्ण लवकर बरा होतो. अगदी दोन-तीन दिवसांत आम्ही अशा रुग्णाला डिस्चार्ज देतो. त्यामुळे कोरोनाला घाबरून अशा सर्जरी पुढे ढकलण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपण सुरक्षित राहू. कोरोनापासून बचावासाठी कोरोना लस घेणं महत्त्वाचं आहे. जास्तीत लोकांनी लस घेतली तर हार्ड इम्युनिटी मिळून बऱ्यापैकी कोरोनावर नियंत्रण मिळू शकतं. त्यामुळे सध्या लस घेऊन आणि कोरोनाशी लढण्यासाठी तयार राहू.

कोरोना महासाथीतून एक धडा आपण घेतला तो म्हणजे आपल्याकडे आरोग्य सेवा मजबूत नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता, औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. यासाठी आपण तयार राहायला हवं. जास्तीत जास्त डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी तयार व्हायला हवेत. आरोग्य सेवा इतकी मजबूत करायला हवी की खेड्यापाड्यातही पोहोचायला हवी, अशी आशाही संचेती यांनी व्यक्त केलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com