National Doctors Day: निस्वार्थ सेवेचा आदर्श ठेवणारे कर्मयोगी

BC ROY
BC ROY
Summary

"आपले व्यक्तिमत्व चांगलं विकसित करा, जेणेकरून ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य करण्यासाठी उभा राहाल त्या क्षेत्रात तुम्ही तुमची वैयक्तिक छाप सोडू शकाल." हा तत्वाज्ञानी विचार फक्त जगाला न सांगता स्वतः तो सिद्ध करून दाखवला ती व्यक्ती म्हणजे डॉ.बिधानचंद्र रॉय ते हेच डॉ.बी.सी. रॉय. ज्यांची जयंती १ जुलै ही भारताचा ' राष्ट्रीय डॉक्टर्स डे ' म्हणून साजरी केली जाते.

"आपले व्यक्तिमत्व चांगलं विकसित करा, जेणेकरून ज्या क्षेत्रात तुम्ही कार्य करण्यासाठी उभा राहाल त्या क्षेत्रात तुम्ही तुमची वैयक्तिक छाप सोडू शकाल." हा तत्वाज्ञानी विचार फक्त जगाला न सांगता स्वतः तो सिद्ध करून दाखवला ती व्यक्ती म्हणजे डॉ. बिधानचंद्र रॉय, ते हेच डॉ.बी.सी. रॉय. ज्यांची जयंती १ जुलै ही भारताचा ' राष्ट्रीय डॉक्टर्स डे ' म्हणून साजरी केली जाते.

डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जीवनप्रवास फार जिद्दीचा आणि रोमांचकारी राहिलेला आहे, याच सोबत हा खूप प्रेरणादायीही आहे. १ जुलै १८८२ रोजी बिहार राज्यातील पटना नजीक ' बारकंपोरे ' येथे त्यांचा जन्म झाला. विशेष म्हणजे त्यांची मृत्यू दिनांक १ जुलै हीच आहे. एकाच तारखेला जन्म आणि मृत्यू दिनांक हा विलक्षण योग म्हणावा लागेल. बिधानचंद्र रॉय यांना ४ भावंड होती. त्यात बिधानचंद्र सर्वात लहान. वडील प्रकाश चंद्र हे तत्कालीन सरकारमध्ये उत्पादन शुल्क अधिकारी म्हणून नोकरीला होते, तर आई अघोरीकामिनी देवी या धार्मिक आणि समर्पित सामाजिक कार्यकर्त्या होत्या. घरातील वातावरण सामाजिक कार्यातील असल्याने बिधान चंद्र यांच्यावर तसेच संस्कार होत होते. पुढे १८९६ साली त्यांच्या आईंच निधन झालं. तेव्हा साहजिक सर्व जबाबदारी वडिलांवर आली. परंतु वडील कामानिमित्त सतत बाहेर असत. अशा वेळेस सर्व भावंडं हे घरातील सर्व जबाबदारी वाटून घेऊन घरगुती कामे करत. यामुळे घरगुती कामाचं महत्व आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सवय लागली. आई वडिलांच्या संस्कारातून लोकांबद्दल करुणा व सहृदयी भावना ही कायम जागृत झालेली होतीच. यासर्व आयुष्याच्या चढ-उतारात त्यांचं मॅट्रिक पर्यंतच शिक्षण म्हणजे दहावी पर्यंतच शिक्षण पाटणा येथे झालं. त्या नंतर इंटर मेडिएट आर्टस् ( I.A. ) म्हणजे १२ वीचं शिक्षण प्रेसिडेंसी कॉलेज, कोलकत्ता येथे झालं. पुढे पटणा कॉलेजमध्ये गणित या विषयात पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांच्यासाठी इंजिनीरिंग आणि मेडिकल अशी दोन्हीची दारे खुली होती. दोन्हीकडे अर्ज केला, दोन्हीकडे प्रवेश मिळाला पण, गणित या विषयाचा विचार करता त्यांनी इंजिनीरिंगकडे जाणे अपेक्षित होत. त्यांचं अंतर्मन त्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी खुणावत होत. त्याप्रमाणे त्यांनी कोलकत्ता मेडिकल कॉलेज येथे प्रवेश घेतला. वैद्यकीय शिक्षण चालू होतं, या दरम्यान त्यांच्या वाचनात एक शिलालेख आला होता ज्यावर पुढील वाक्य लिहलेली होती. "Whatever thy hands findeth to do, do it with thy might." म्हणजे, "तुम्हाला जे जे काही मिळवायचे ते ते तुम्ही तुमच्या सामर्थ्यावर मिळवलं पाहिजे. " हे वाक्य डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी आयुष्यभर आपल्या मनात कोरून ठेवलं आणि या प्रेरणेवर आयुष्यभर काम करत राहिले.

१९०१ साली त्यांच्या वडिलांची नोकरी गेली आणि घरावर आर्थिक संकट कोसळलं. त्यावेळेस डॉ. बी.सी रॉय हे पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत होते. अभ्यासक्रमासाठी लागणारे पुस्तके मित्रमंडळी यांच्या सहकार्यांने मिळवली. फार काटकसरीने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. सन १९०५ साली बंगालच्या फाळणी घोषणा झाली तेव्हा आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा याची खूप इच्छा त्यांना होत होती, परंतु आधी शिक्षण आणि त्यानंतर देश सेवा या विचाराने त्यांनी स्वतःच्या भावनांना त्यावेळेस आवर घातला. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रांतिक आरोग्य सेवेत नोकरी चालू केली, त्या सोबत स्वतः चं प्रायवेट क्लिनिकही चालू केलं. यातून ते गरीब रुग्णांची अल्पदारात सेवा करत. यातून वाचलेले पैसे जास्त नाही फक्त रुपये १२०० घेऊन त्यांनी सन १९०९ साली लंडन गाठलं. लंडन येथील ' सेंट बार्थोलोम्यू हॉस्पिटल ' येथे पदविका शिक्षणसाठी अर्ज केला, परंतु तत्कालीन अधिष्ठाता हे आशियायी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत अजिबात इच्छूक नव्हते. त्यांनी डॉ.बी.सी. रॉय यांचा अर्ज नाकारला. तेव्हा अजिबात खचून न जाता डॉ.बी.सी. रॉय यांनी एक नाही दोन नाही तब्ब्ल ३० वेळा अर्ज केला. काय ती जिद्द आणि काय तो विश्वास असेल ? शेवटी सेंट बार्थोलोम्यू हॉस्पिटल येथे पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवलाच. दोनच वर्षात म्हणजे १९११ साली अभ्यासक्रम पूर्ण केला. सोबतच प्रतिष्ठित अशी Member of the Royal College of Physicians (M.R.C.P.), याच सोबत Fellow of the Royal College of Surgeons (F.R.C.S.) या पदवीही मिळवल्या. लंडन येथील शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तात्काळ भारत गाठलं. भारतात आल्यानंतर ते येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. हे करत असताना आपल्या मिळकतीतील बराचसा भाग हे विविध वैद्यकीय संस्था उभारणी, गरीब लोकांना वैद्यकीय सेवा आदीसाठी देत असत. त्यांना वैद्यकीय शिक्षण संस्था उभारणीत विशेष रुची होती. त्यांच्या प्रयत्नातून जाधवपूर टीबी हॉस्पिटल स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याच बरोबर चितरंजन सेवा सदन, कमला नेहरू मेमोरियल हॉस्पिटल, व्हिक्टोरिया इन्स्टिट्यूशन (कॉलेज) आणि चित्तरंजन कॅन्सर हॉस्पिटल. महिला आणि मुलांसाठी चितरंजन सेवा सदन, या सर्व संस्थाचा पाया भक्कम केला. याच बरोबर दुर्गापूर, कल्याणी, बिधाननगर, अशोकनगर आणि हाबरा या पाच प्रख्यात शहरांच्या स्थापनेतही मोठ योगदान दिल आहे. या कारणामुळे डॉ. बिधान रॉय यांना बर्‍याचदा आधुनिक पश्चिम बंगालचा निर्माता असही संबोधलं जात. १९२५ या साला पासून त्यांनी प्रत्यक्ष राजकरणात प्रवेश केला. एक अपक्ष निवडणूक लढवून निवडूनही आले. त्यांनतर १९२८ साली काँग्रेसमधे प्रवेश केला आणि पुढे जावून काँग्रेस कार्यकारणी सदस्यही झाले. कामाच समर्पण आणि कामाची शैली यामुळे खूप कमी वेळेत त्यांनी काँग्रेसमध्ये आपला ठसा उमटवला. महात्मा गांधी यांचे डॉक्टर या सोबत ते जवळचे मित्रही झाले. १९३१ ते १९३३ या सालात कलकत्ताचे महापौर हे पद भूषवलं. आपल्या कार्यकाळात मोफत शिक्षण, आरोग्य सेवा, चांगले रस्ते बांधणी, वीज, पाणी पुरवठा या सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी केलेलं प्रभावी काम हे फार उल्लेखनीय आहे.

BC ROY
अद्याप १०५ खासदारांनी घेतली नाही लस

सन १९३३ साली महात्मा गांधीजी यांनी पर्णकुटी, पुना (सध्याच पुणे) येथे आमरण उपोषण चालू केलं, त्यावेळीस डॉ.बी.सी. रॉय तेथे पोहचले काही दिवसांनी गांधीजी यांची तब्बेत खालावत चालली होती. तेव्हा त्यांच्या उपचारासाठी डॉ.बी.सी. रॉय यांनी दिलेले औषध भारतीय बनावटीची नाही यामुळे गांधीजी यांनी नाकारली, आणि त्यांनी प्रश्न केला, "माझ्या देशातील ४ करोड लोकांचा तुम्ही असाच मोफत उपचार कराल का?" तेव्हा डॉ.बी.सी. रॉय यांनी दिलेलं उत्तर फार समर्पक आणि महत्वाच होत. ते म्हणाले, " हो, मी ४ करोड लोकांचा उपचार मोफत नाही करू शकत. आणि हो मी, येथे मोहनदास करमचंद गांधी या एका व्यक्तीला ही आरोग्य सेवा द्यायला आलेलो नाही तर, मी त्या व्यक्तीला आरोग्य सेवा द्यायला आलो आहे, जो ४ करोड लोकांचे प्रतिनिधित्व करतो." हे एकूण गांधीजी यांच समाधान झालं आणि त्यांनी उपचारास परवानगी दिली.

पुढे असाच राजकीय सक्रिय सहभाग चालूच होता. १९४७ मध्ये भारताने स्वातंत्र्याचा श्वास घेतला. सन १९४८ साली महात्मा गांधीजी यांच्या सुचनेने त्यांना पश्चिम बंगालच मुख्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यांच्या अतोनात मेहनीतीची दखल घेत भारत सरकारने ४ फेब्रु १९६१ रोजी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ' भारतरत्न ' दिला. १ जुलै १९६२ या आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते मुख्यमंत्री होते. त्या दिवशी सकाळी त्यांनी आपल्या रुग्णांची तपासणी केली आणि आपले दैनंदिन कामे चालूच होते, पुढे काही तासातच त्यांच निधन झालं. काय कर्मयोगी असावं एखाद्यानं?..... आपल्या पश्चातही लोकसेवा त्यांनी सोडली नाही. आपलं राहत घर आपल्या आई अघोरीकामीनी देवी यांच्या नावे नर्सिंग होम चालवण्यासाठी भेट द्यावं अशा सूचना त्यांनी आधीच देऊन ठेवल्या होत्या. १९६२ साली रॉय यांच्या स्मृतीतून 'बी.सी. रॉय नॅशनल अवॉर्ड' स्थापित करण्यात आला आणि सन १९७६ पासून दरवर्षी या पुरस्काराने वैद्यकीय, राजकारण, विज्ञान, तत्वज्ञान, साहित्य आणि कला क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानान दिलेल्यांना या सन्मानित केले जाते. दि बी.सी. रॉय मेमोरियल लायब्ररी आणि चिल्ड्रन बुक ट्रस्ट मधे मुलांसाठी एक वाचन कक्ष, नवी दिल्ली, येथे १९६७ साली उघडण्यात आला. आजही त्यांची खासगी कागदपत्र दिल्लीतील ' टीन मूर्ती हाऊस ' येथील नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररीमधील आर्काइव्ह्जचा भाग आहेत.

BC ROY
World Doctor Day: तिसऱ्या लाटेत मुलांवरील धोका टाळणे शक्य

२०२० आणि २०२१ चा राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा कोविड-१९ च्या भयाण सावटाखाली आपल्याला साजरा करावा लागत आहे. अचानक आलेलं हे संकट सर्वात जास्त भयानक आणि त्रासदायक हे आरोग्य यंत्रणेसाठी ठरलेलं आहे. पायाभुत सुविधांचा अभाव, अचानक वाढलेला रुग्णांचा ताण, तुटपुंजे आणि वेळच्या वेळी न होणारे पगार, दिवसरात्र आलेला कामाचा ताण, आपल्या जवळील गमावलेली लोकं, अशा परिस्थितीतही डॉक्टरांवर होणारे हल्ले, सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात सोसायटीने आरोग्य सेवकांना केलेली प्रवेश बंदी यासारख्या अनेक गोष्टी घडत आहेत. प्रचंड मानिसक व शारीरिक त्रास सहन करून आपली आरोग्य यंत्रणा लोकांच्या सेवेसाठी दिवस रात्र उभी आहे. कारण त्यांच्या समोर त्यांनी डॉ.बी.सी.रॉय यांच्या सारख्या असंख्य कर्मयोगी डॉक्टरांनी आपला निस्वार्थ सेवेचा आदर्श ठेवलेला आहे.

कोविड-१९ च्या संसर्गजन्य आजारात झालेली हानी पाहता, आता तरी आरोग्य सेवांना प्राथमिक गरज म्हणून पाहिलं गेलं पाहिजे. ज्या वर्षानुवर्षांपासून चाललेल्या गोष्टी आहेत, यामध्ये बदल व्हायला हवा. सद्य परिस्थितीत आरोग्यसेवा या प्रशासकीय अधिकारातील लाल फितीच्या बंधनात अडकून पडल्या. याचे चांगले वाईट अनुभव सर्वांच पहायला मिळाले. आता या कोविड-१९ ने शिकवलेल्या धड्यातून बोध घेता, आरोग्य विभागासाठी वेगळी प्रशासकीय यंत्रणा उभी करावी लागेल. यासाठी, 'इंडियन मेडिकल सर्विसेस' ची स्थापना व्हावी आणि आरोग्य यंत्रणेसाठी पूर्णवेळ आरोग्यसेवेशी निगडित प्रशासकीय अधिकारी मिळावेत. याच सोबत आरोग्यसेवकांचे योग्य मानधन ठरवून ते योग्य वेळेत व्हावेत, आरोग्य यंत्रणेतील पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात याच बरोबर आरोग्य व आरोग्याशी निगडीत विषयातील शिक्षण हे सर्वसामान्यांना परवडेल या खर्चात उपलब्ध होणे गरजेचे आहे. भरमसाठ महागड्या शिक्षणामुळे दिवसेंदिवस आरोग्य सेवा या महाग होत आहेत. याच सोबत आरोग्य ही luxary नसून ती दैनंदिन गरज आहे, याचा विचार करुन सर्वसामान्यांना सहज आणि परवडेल या दरात उपलब्ध होईल यासाठी सर्वच स्थरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे, कारण महाग आरोग्यसेवेची झळ ही सरळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसते. या एक ना अनेक गोष्टींचा विचार होणे गरजेच आहे. आरोग्य सेवेची बळकटी हे सामाजिक, राजकीय मुद्दे असायला हवेत. याबाबत सर्वांनी जागरुक राहून शक्य त्यापरीने काम केलं पाहिजे. देशात कोणी आजारी पडू नये, व आजारी पडला तर त्याला सहज शक्य उपचार घेता यावा, तसेच रुग्ण, डॉक्टर्स व इतर आरोग्यसेवक यांच्यात एक विश्वासाच नातं निर्माण होऊन आरोग्यदायी भारत निर्माण झाला तरच आपल्याला खऱ्या अर्थाने ‘डॉक्टर्स डे साजरा’ करण्यात आनंद होईल. याच सोबत डॉ .बिधान चंद्र रॉय यांच्या सारख्या हज़ारो डॉक्टर्स ने दिलेलं आपलं योगदानाचं चीज होईल असं म्हणायला हरकत नाही.

(- डॉ.ऋषिकेश आंधळकर

वैद्यकीय अधिकारी, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR-NIRT)

९१४६६९९९५३

rushikeshandhalkar@gmail.com)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com