

Is Urine Drinking Effective For Healing According To Doctors: आपल्या उत्कृष्ट अभिनयामुळे सतत चर्चेत असणारे प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते परेल रावल सध्या मात्र एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी चक्क स्वतःचीच लघवी प्यायल्याचे स्पष्ट केले आहे. गुडघ्याला झालेल्या एका दुखापतीसाठी ते हे करत असल्याचे त्यांनी सांगितले, ज्याला 'युरीन थेरपी' असे म्हणतात. पण ही युरीन थेरपी नक्की आहे तरी काय आणि युरीन थेरपी घेणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का, तज्ज्ञांचे यावर मत काय, हे जाणून घेण्यासाठी पुढे दिलेली माहिती नक्की वाचा.
परेश रावल यांनी नुकतीच 'लल्लनटॉप' या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या गुडघ्याला झालेल्या दुखापतीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, त्या काळात ते नानावटी रुग्णालयात दाखल होते. त्यांना भेटण्यासाठी अभिनेता वीरू देवगण आले होते. त्यांनी परेश रावल यांच्याशी विचारपूस केली आणि दुखापतीबद्दल जाणून घेतले. त्यावेळी वीरू देवगण यांनी एक अनोखा सल्ला दिला — दररोज सकाळी उठल्यानंतर स्वतःचं मूत्र प्यावं. त्यांनी असंही सांगितलं की, सर्व लढवय्ये असाच उपाय करतात आणि यामुळे आरोग्याच्या तक्रारी दूर राहतात.
त्यांनी मद्यपान, मटण व तंबाखू टाळण्यासही सांगितले. परेश रावल यांनी हा सल्ला मनापासून पाळला. त्यांनी १५ दिवस नियमित याचे पालन केले आणि त्यानंतरच्या एक्स-रेमध्ये झालेली सुधारणा पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले असे ते म्हणाले.
वैकल्पिक औषधपद्धती (Alternative Medicine) आणि मध्ययुगीन हठयोगामध्ये ‘अमरोली’ या संकल्पनेचा उल्लेख आढळतो. यामध्ये औषधी किंवा सौंदर्य वाढवण्याच्या उद्देशासाठी स्वतःच्या लघवीचा वापर केला जातो. यात लघवी पिणे किंवा ते त्वचा व हिरड्यांवर लावणे याचा समावेश होतो. मात्र, युरीन थेरपीचे आरोग्यावर कोणतेही ठोस फायदे होतात, असा वैज्ञानिक पुरावा सध्या उपलब्ध नाही.
लघवी पिण्याची परंपरा 'युरिन थेरपी' किंवा 'यूरोफॅजी' प्राचीन इजिप्त, ग्रीस व रोमन संस्कृतीतही प्रचलित होती. १९४५ मध्ये निसर्गोपचारतज्ज्ञ जॉन डब्ल्यू. आर्मस्ट्रॉंग यांच्या 'द वॉटर ऑफ लाइफ' या पुस्तकामुळे ती पुन्हा चर्चेत आली.
या पद्धतीतून रोग बरे होतात, असा दावा केला जातो, मात्र आधुनिक वैद्यकशास्त्र अशा दाव्यांना कोणताही आधार देत नाही. लघवी हे शरीरातील घाण असून त्यात पुन्हा काही पोषक घटक राहत नाहीत. त्यामुळे युरीन थेरपी ही आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नाही हे स्पष्ट होते.
परेश रावल यांनी गुडघ्याच्या दुखापतीवर लघवी सेवन केल्याचा अनुभव शेअर केला, पण तज्ज्ञ डॉक्टरांनी अशा प्रकारांवर टीका करत यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे स्पष्ट केले आहे.
सोशल मीडियावर 'द लिवर डॉक्टर' म्हणून ओळखले जाणारे तज्ञ म्हणाले , "कृपया आपली किंवा दुसऱ्यांची लघवी पिऊ नका, कारण एक बॉलीवुड अभिनेता असे करतो. लघवी पिण्याचे कोणतेही आरोग्यदायक फायदे शास्त्राने सिद्ध केलेले नाहीत. लघवीमध्ये टॉक्सिन्स असतात, जे शरीर बाहेर काढण्यासाठी खूप मेहनत करते."
- डॉ. साइरिएक एबी फिलिप्स (द लिवर डॉक्टर)
"एका प्रसिद्ध अभिनेत्याने उपचारासाठी स्वतःची लघवी प्यायचे असल्याचे सांगितलेला व्हिडिओ पाहून मी थक्क झालो आणि अक्षरशः मला उलटी येऊ लागली. याहून वाईट गोष्ट म्हणजे, त्याने हे एका दुसऱ्या प्रसिद्ध चित्रपट व्यक्तिमत्त्वाच्या सल्ल्याने केल्याचे सांगितले. ही कृती केवळ घृणास्पद नाही, तर लाखो अज्ञान भारतीयांसाठी अत्यंत दिशाभूल करणारी आहे. यापैकी काही लोक हे खरोखर करून पाहू शकतात. कृपया लघवी पिऊ नका; तुमची असो वा दुसऱ्याची."
- डॉ. अंबरीश मिताल
एंडोक्राइनोलॉजी आणि डायबिटीज विभागाचे अध्यक्ष, मॅक्स हेल्थकेअर
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.