पावसाळ्यात अंगणात असाव्यात अशा वनस्पती

पावसाळा आला, गरम झालेल्या जमिनीची तहान भागवण्यासाठी वरुण राजाची कृपा झाली. कुठल्याही तऱ्हेने जीवन फुलण्यासाठी, बीज अंकुरण्यासाठी प्रोक्षणाची (पाणी शिंपडण्याची) आवश्‍यकता असते.
Tulsi
Tulsisakal

पावसाळा आला, गरम झालेल्या जमिनीची तहान भागवण्यासाठी वरुण राजाची कृपा झाली. कुठल्याही तऱ्हेने जीवन फुलण्यासाठी, बीज अंकुरण्यासाठी प्रोक्षणाची (पाणी शिंपडण्याची) आवश्‍यकता असते. लहानपणापासून एका गोष्टीचे आश्र्चर्य वाटत आलेले आहे की जेथे कोणीही कोठल्याही प्रकारे बीजारोपण केले असण्याची सुतराम शक्यता नाही अशा ठिकाणीही पहिल्या पावसानंतर आठ दिवसांच्या आत हिरवेगार कसे काय होते?

एरवी जमिनीवर पाणी ओतले असता तेथे चिखल तयार होतो, दलदल तयार होते परंतु पहिला पाऊस आला की बघता बघता सगळे हिरवेगार झालेले दिसते. इतकेच नाही तर पावसावर तयार झालेले धान्य काढून घेतल्यावर जमिनीत राहिलेल्या ओलाव्यावर व वरून होणाऱ्या दवबिंदुप्रोक्षणामुळे पुन्हा शेती होऊ शकते. सांगायचा हेतू काय तर बागेत किंवा कुंडीत झाड लावायचे असेल तर पावसाळ्याच्या सुमारास लावले तर ते जगण्याची, वाढण्याची शक्यता अधिक असते.

प्रत्येकाच्या आवडीनुसार, गरजेनुसार आणि त्या त्या ठिकाणच्या हवामानाला अनुकूल झाडे लावण्याची पद्धत असली तरी काही वनस्पती अशा आहे की ज्या प्रत्येक घरात असायलाच हव्यात. हाताशी ताजे औषध असले तर ते पटकन वापरता येते आणि लहान-सहान तक्रारींसाठी धावाधाव करावी लागत नाही.

औषधी वनस्पती-झाडे असे म्हटले की त्यासाठी मोठी जागा हवी, बाग हवी, असे बऱ्याचदा वाटते. पण अशा अनेक औषधी वनस्पती आहेत की ज्या कुंडीतही वाढवता येतात.

तुळस -

तुळशीमध्ये हवा शुद्ध करण्याचा अभूतपूर्व गुण आहे. घराच्या दारात तुळशी लावण्याची प्रथा यामुळेच पडली असावी, जेणेकरून घरात रोगराईचा, जंतूंचा प्रवेश होऊ नये.

 • भूक लागत नसली, जिभेला चव नसली, तोंडात चिकटपणा जाणवत असला तर काही दिवस सकाळी अर्धा चमचा तुळशीच्या पानांच्या रसात दोन चिमूट खडीसाखर टाकून घेण्याने बरे वाटते.

 • दम्याचा त्रास असणाऱ्यांनी, विशेषतः छातीत कफ भरून दम्याचा त्रास होत असला तर अर्धा चमचा तुळशीच्या रसात पाव चमचा मध मिसळून तयार केलेले मिश्रण थोडे थोडे चाटण्याचा उपयोग होतो.

 • मधमाशी, गांधीलमाशी किंवा कोणताही किडा चावला तर त्यावर तुळशीच्या पानांचा रस चोळल्याने बरे वाटते. त्या ठिकाणी तुळशीच्या कुंडीतल्या मातीचा लेप करण्यानेही आग लगेच शमते.

 • छातीत कफ भरून खोकला झाला असल्यास तुळशीची पाने ठेचून गरम करून त्याने छाती शेकल्याने बरे वाटते.

 • सर्दी, खोकल्यामुळे डोके जड होते, दुखते त्यावर तुळशीच्या पानांचा वाफारा घेण्याने बरे वाटते.

कोरफड -

ही सुद्धा कुंडीत सहजपणे वाढणारी वनस्पती आहे. कोरफडीचे एक छोटेसे रोप लावले तर त्यापासून अनेक रोपे आपोआप तयार होतात.

 • कशानेही भाजले, खरचटले तर त्यावर पटकन कोरफडीचा गर लावल्यास आग कमी होते तसेच फोड वगैरे न येता जखम भरून येते.

 • यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोरफड हे एक उत्तम औषध आहे. कोरफडीचा चमचाभर ताजा गर दोन थेंब तुपावर हलकेच परतून घ्यावा, त्यावर चिमूटभर हळद टाकून रोज सकाळी नाश्‍त्याच्या पूर्वी घ्यावा. याने नीट भूक लागते. यकृताची कार्य सुधारले की संपूर्ण पचन सुधारते.

 • कोरफडीचा गर केसांना तसेच त्वचेला लावल्यास केस मऊ व्हायला, त्वचा नितळ व्हायला मदत मिळते.

 • स्त्री-संतुलन कायम राहण्यासाठी, पाळी नियमित येण्यासाठी सकाळी कोरफडीचा ताजा चमचाभर गर घेणे उत्तम असते.

गवती चहा -

गवती चहा सुद्धा घराघरात असावा. मूळासकट थोडा गवती चहा कुंडीत खोचल्यास अनेक रोपे तयार होतात.

 • गवती चहाचे २-४ तुकडे रोजचा चहा करताना टाकले तर चहाचा स्वाद वाढतो. गवती चहा, तुळशीची पाने, पुदिना व साखर टाकून केलेला चहा सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे वगैरे तक्रारींवर उत्तम असतो.

 • सर्दी, खोकला होऊन ताप आला असल्यास नुसत्या गवती चहाचा वाफारा घेतल्यास तसेच वरील चहा प्यायल्यास ताप उतरतो, अंग दुखणे कमी होते.

 • गवती चहा लघवी साफ होण्यासही मदत करतो.

पुदिना -

सहजासहजी मिळत असला तरी थोडासा मुळासकट पुदिना कुंडीत लावल्यास वर्षभर हवा तेव्हा ताजा पुदिना मिळू शकतो

 • पुदिना अतिशय रुचकर असतो, पचनास मदत करतो तसेच जंत कमी करण्यासही मदत करतो. पुदिन्याची चटणी प्रसिद्ध आहेच.

 • अपचन, वायू धरल्यामुळे पोट दुखत असले तर पाव चमचा पुदिन्याचा रस आणि पाव चमचा आल्याचा रस, त्यात चिमूटभर सैंधव मिसळून घेतल्यास बरे वाटते.

 • पावसाळ्यात भूक मंदावते, पचन व्यवस्थित होत नाही, सूर्यशक्ती कमी झाल्याने जंत वाढण्याची प्रवृत्ती असते, अशा वेळी जेवणात पुदिन्याची पाने, जिरे, मिरे, सैंधव हिंग, लिंबू, खारीक वा काळ्या मनुका यांची चटणी ठेवणे उत्तम असते.

 • जेवणानंतर घ्यायच्या ताकात पुदिन्याचा, आल्याचा रस चवीपुरता टाकला तर पचन सुधारण्यास मदत मिळते.

अडुळसा -

हे खोकल्यासाठी एक उत्तम औषध आहे. अडुळशाचा रस मधाबरोबर घेतल्यास खोकला कमी होतो.

 • लहान मुलांनाही अडुळशाचे पिकलेले पान व ज्येष्ठमधाचा लहान तुकडा यांचा काढा करून देण्याने खोकला बरा होतो.

 • खरूज या त्वचाविकारात अडुळशाची पाने पाण्यात उकळून त्याने स्नान करण्याने खाज कमी होण्यास तसेच खरूज बरी होण्यास मदत मिळते.

पानओवा -

पानओव्याला ओव्यासारखा वास असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला याच्या काड्या मातीत लावल्या असता झाड तयार होते.

 • तोंडाला चव नसणे भूक न लागणे वगैरे तक्रारींमध्ये पानओव्याच्या पानांचा चमचाभर रस जेवण्याआधी घेण्याचा फायदा होतो.

 • याच्या पानांची भजी चविष्ट असतात.

 • पोटात जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनीसुद्धा याच्या पानांचा १-२ चमचे रस घेण्याचा उपयोग होतो.

जास्वंद -

जास्वंदीचे झाड जमिनीत छान वाढतेच, पण कुंडीतही लावता येते. अनेक रंगांच्या जास्वंदी उपलब्ध असल्या तरी औषधात मुख्यत्वे पांढरी व लाल रंगाची जास्वंद वापरली जाते.

 • जास्वंदीची फुले, कोवळी पाने वाटून तयार केलेला लेप केसांना अर्ध्या तासासाठी लावून ठेवल्यास केसांची वाढ होते, केस मऊ होण्यास मदत मिळते व पांढरे होण्या प्रतिबंध होतो.

 • स्त्रियांच्या अंगावरून पांढरे पाणी जाते, त्यावर पांढऱ्या जास्वंदीच्या पाकळ्या तुपात तळून साखरेसह खाण्याचा फायदा होतो. हा प्रयोग सात दिवस केल्यास गुण येतो.

पाऊस आला, तेव्हा आता कामाला लागलेच पाहिजे. निसर्गावर प्रेम करणे, निसर्गाच्या सान्निध्यात राहणे, डोळ्यांना हिरवाईचे सुख मिळणे, आपल्याला आरोग्यदायी वनस्पती, भाजीपाला स्वतःपुरता मिळविणे, अधिक प्रमाणात आल्यास शेजारच्यांना देणे यासारखे मोठे सुख नाही. प्रत्येकाने अशा तऱ्हेने आपल्या बाल्कनीत, अंगणात, घराभोवतीच्या बागेत एका कुटुंबाला उपयोगी ठरतील एवढी झाडे अवश्‍य लावावीत.

हात-पाय मातीत घालून थोडे कष्ट करणे आरोग्यासाठी चांगलेच असते. एरवी वर्षभर अंगमेहनत चांगलीच, पण पावसाळ्यात जाठराग्नी मंद असल्यामुळे थोडी तरी मेहनत करणे आवश्‍यक असतेच. हाताला माती लागल्याने पथ्वीतत्त्व पण संतुलित होण्यास मदत होते व स्वतःच्या प्रत्यक्ष कष्टाच्या भाकरीची चव अमृताहून गोडच असते.

(श्रीगुरु डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com