esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीती झिंटा

ग्लॅम-फूड : ‘हिमाचली डाळ, कढीभात आवडीचा’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बॉलिवूडची ‘डिंपल क्वीन’ प्रीती झिंटा मूळची सिमल्याची असल्याने हिमाचली डाळ आणि कढीभात हा तिचा आवडीचा प्रकार आहे. प्रीतीला वेगवेगळे पदार्थ  जेवढ्या रुचीने चाखायला आवडतात, तितक्याच आवडीने शिकण्यातदेखील रस असतो.

प्रीतीला  जेवणामध्ये सी फूड आवडीचे आहे. इटालियनमध्ये तिला सर्व पदार्थ आवडतात;  पण पिझ्झा आणि पास्ता विशेष आवडीचा. आईस्क्रीममध्ये  तिचा आवडीचा फ्लेवर कॉफी, बदाम आणि हनी नट्स  आहे. कोरोनाकाळात घरातून बाहेर जाणे शक्य नसल्याने तिने तिच्या आईकडून स्वयंपाकाचे धडे घेतले. सुरुवातीला ती तिच्या आवडीची साऊथ इंडियन डिश म्हणजे मसाला डोसा  शिकली. हा मसाला डोसा, दोन चटण्या आणि  बटाट्याची  भाजी अशा प्लेटचा फोटो तिने सोशल मीडियावर  शेअरदेखील केला होता.

प्रीतीला ताज्या फळांचा रस प्यायला खूप आवडते आणि ती हा फळांचा रस घरी करून पिण्यास  प्राधान्य देते. स्वीट डिशमध्ये गाजराचा हलवा खूप आवडता. ताज्या गाजरावरचे प्रेम तिने या आधीही पुष्कळदा सांगितले आहे. दररोजच्या रुटीनमध्ये ती पपई, हिरव्या पालेभाज्या; तसेच फळे खाते.

हेही वाचा: लग्नाची गोष्ट : प्रत्येक क्षण एन्जॉय करतो

काही वर्षांपूर्वी तिला समजले, की तिच्यात व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. तेव्हा तिने ट्विटरवर तिच्या चाहत्यांना या समस्यांचे गांभीर्य समजावून सांगितले आणि विशेषतः महिलांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये; तसेच योग्य आहार कसा घ्यावा व तंदुरुस्त कसे राहावे हा संदेश सोशल मीडिया साइटवरून दिला.

‘दिवसातून दोन किंवा तीन वेळा जेवण्यापेक्षा थोडे थोडे असे दिवसातून ६ वेळा आहार घेण्याने वजन समतोल ठेवण्यास, निरोगी व तंदुरुस्त राहण्यास खूप मदत होते,’ असे ती सांगते. सकाळी उठल्यावर ती २ ग्लास पाणी पिते. उठल्यावर पहिल्या १५ मिनिटांत काही तरी खाते. कार्बोहायड्रेट्स असलेल्या पदार्थांऐवजी प्रथिनयुक्त धान्य, कडधान्ये, फळे यांचा वापर ती आहारात करते. स्वतःचे मानसिक, शारीरिक आरोग्य चांगले व सुदृढ ठेवण्यासाठी योग्य आहाराबरोबरच योगाभ्यास, व्यायाम ती करते. प्रीती परदेशांत असते, तेव्हा चाट खूप मिस करते. कॅलिफोर्नियामध्ये राहत असताना प्रीतीने तिचा आईकडून सेंद्रिय पद्धतीने भाज्या कशा पिकवाव्यात याचे धडे घेतले. तिच्या बागेमध्ये तिने सिमला मिरची, लिंबू; तसेच हिरवी मिरचीदेखील पिकवली होती.

loading image
go to top