esakal | लग्नाची गोष्ट : प्रत्येक क्षण एन्जॉय करतो | Sai and Tirthdeep
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Lokar and Tirthdeep Roy
लग्नाची गोष्ट : प्रत्येक क्षण एन्जॉय करतो

लग्नाची गोष्ट : प्रत्येक क्षण एन्जॉय करतो

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- सई लोकूर-तीर्थदीप रॉय

मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री जिचा विवाहसोहळा हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला ती म्हणजे अभिनेत्री सई लोकूर. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सईने तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न केले. तो एका आयटी कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत आहे. या दोघांचं अरेंज मॅरेज. एका मॅट्रिमोनी साइटच्या मार्फत त्यांची ओळख झाली. पहिल्याच भेटीत त्यांनी एकमेकांना पसंत केलं आणि पुढच्या ३ महिन्यांच्या आत ते मिस्टर अँड मिसेस रॉय झाले होते.

सई आणि तीर्थदीप यांचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहे. सईने सांगितलं, ‘‘मी पटकन एखाद्या गोष्टीवर रिअॅक्ट करणारी, थोडीशी चुलबुली आणि गप्पिष्ट, आपल्या आयुष्यात काही ना काही हॅपनिंग घडत असलं पाहिजे असं म्हणत दिलखुलासपणे आयुष्य जगणारी मुलगी आहे. ज्या गोष्टी माझ्या स्वभावात नाहीत त्या सगळ्या तीर्थदीपमध्ये आहेत. तो अगदी साधा आणि गोड मुलगा आहे.

तो अतिशय शांत, समंजस, समजूतदार, मितभाषी आहे. त्याची पेशन्स लेव्हल माझ्याहून कित्येक पटीने जास्त आहे. तो कधीही कोणत्या गोष्टीवर पटकन रिअॅक्ट करत नाही. तो कधीही कोणाला चुकूनही दुखावत नाही. मी कधीही आतापर्यंत त्याला कोणावरही चिडलेलं पाहिलेलं नाही. त्याच्यामुळे माझा चिडचिडेपणा कमी होऊन मीदेखील शांतपणे विचार करू लागले आहे. प्रत्येक गोष्टीत तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. सध्या आम्ही बेळगांवला रहात आहोत. इथे असल्यामुळे मी घरूनच वेगवेगळ्या ब्रँड्सचं प्रमोशन करते. त्याचंही वर्क फ्रॉम होम सुरू आहे. मला फोटोशूटमध्ये आवर्जून मदत करतो. तो कामात बिझी असल्यावर मीही त्याला खोलीत जेवण नेऊन देते. अशा छोट्याछोट्या गोष्टी आहेत ज्यातून नवरा बायकोचं नातं खुलत जात असतं आणि एकमेकांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण आम्ही एन्जॉय करतो.’’

तीर्थदीप म्हणाला, ‘‘सईची आणि माझी भेट झाली तेव्हा ती एक अभिनेत्री आहे इतकंच मला माहीत होतं. तिची कामं मी पाहिली नव्हती. पहिल्या क्षणापासून मी एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीशी बोलतोय असं मला कधीही असं वाटलं नाही. ती खूप नम्र आहे. ती स्टारडम कधीही बरोबर घेऊन मिरवत नाही. ती खूप अल्लड, नेहमी उत्साही आणि सकारात्मक विचार करणारी मुलगी आहे. तितकीच खूप समजूतदार आहे. ती सगळ्यांमध्ये मिसळते, तिच्या स्वभावाने ती सगळ्यांना आपलंस करते. लग्नानंतरही आमच्या संपूर्ण कुटुंबातील प्रत्येकाशी तिने खास नातं तयार केलं आहे. ती सुगरण आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट एकमेकांशी शेअर करत, एकमेकांना आपापली स्पेस देत, छोट्याछोट्या गोष्टी एकमेकांसाठी करत एकमेकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.’’

(शब्दांकन ः राजसी वैद्य)

loading image
go to top