World Heart Day : हृदयाची काळजी

२९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या काळात हा दिवस अधिकच समयोचित ठरतो, कारण काम करता करता हार्ट अटॅक आला व व्यक्ती दगावली
prevent heart issue dr malvika tambe September 29 is celebrated World Heart Day
prevent heart issue dr malvika tambe September 29 is celebrated World Heart Day Sakal

- डॉ. मालविका तांबे

२९ सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या काळात हा दिवस अधिकच समयोचित ठरतो, कारण काम करता करता हार्ट अटॅक आला व व्यक्ती दगावली, अशा बातम्या येण्याचे प्रमाण खूप वाढलेले दिसते. अशा घटना १५ वर्षे वयाच्या मुलापासून ते ४० वर्षे वयाच्या मध्यमवयीन व्यक्तीपर्यंत कुणाच्याही आयुष्यात घडलेल्या दिसतात.

हृदय हा शरीरातील अति महत्त्वाचा अवयव. संपूर्ण शरीरात होणारे रक्ताभिसरण हृदय सांभाळते, फुप्फुसांद्वारे रक्ताची शुद्धी करायला मदत करते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या सगळ्या भावनिक गरजा हृदयातूनच येतात.

कोणावर प्रेम करायचे असले, कोणाला मनापासून आशीर्वाद द्यायचा असला तर आपला हात आपसूक छातीकडे जातो. सध्या म्हटले जाते की आपला मानसशास्त्रीय व्यवहार भाग मेंदूतील एका केंद्रातून चालतो.

पण वाईट वाटले, ताण आला, मानसिक आघात झाला तर सर्वप्रथम दुखणे हृदयाच्या जागी जाणवते. हृदय हे अतिशय संवेदनशील असल्यामुळे त्याची काळजी घेणेही आवश्यक आहे.

  • आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर तीन अति महत्त्वाच्या मर्मांमध्ये हृदयाचा समावेश होतो. त्यामुळे हृदयाला कुठल्याही प्रकारचा आजार होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी याची सविस्तर माहिती आयुर्वेदात दिलेली आहे. हृदयरोग म्हटले की आता आपल्याला हार्ट अटॅक येणार अशी भीती मनात ठाण मांडून बसलेली असते, परंतु हृदयरोग निरनिराळ्या प्रकारचा असू शकतो.

  • जन्म झाल्या झाल्या हृदयाच्या पटलांमध्ये भोक असू शकते, हृदयाच्या झडपांमध्ये दोष असू शकतो, हृदयाची शरीराला रक्तपुरवठा करण्याची क्षमता कमी असू शकते.

  • वय वाढल्यावर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांध्ये अवरोध उत्पन्न होऊ शकतात.

  • हृदयाचे स्नायू दुर्बल झाल्यामुळे हृदयाच्या कप्प्यांचा आकार वाढू शकतो, हृदयाच्या झडपांमध्ये दोष येऊ शकतो.

  • मधुमेह, रक्तदाब, वृक्करोग, आमवात वगैरे शरीरात असलेल्या अन्य रोगांमुळे हृदयरोग सुरू होऊ शकतो.

हदयरोग कशा प्रकारचा आहे, रचनात्मक आहे की कार्यात्मक, त्यावरून उपचारांचे स्वरूप बदलू शकते. कुठल्याही रोगांसाठी सर्वप्रथम उपचार असतो तो म्हणजे रोगाच्या कारणांपासून लांब राहणे. सर्वप्रथम आपण हृद्रोगाची कारणे समजून घेऊ या.

अत्युष्णगुर्वन्नकषायतिक्त श्रमाभिघाताध्यशनप्रसंगैः ।

संचिन्तनैर्वेगधारणैश्र्च हृदामयः पंचविधः प्रदिष्टः ।।...माधवनिदान २६.१

व्यायामतीक्ष्णातिविरेकबस्ति-चिन्ताभयन्नासगदातिचाराः ।

छर्द्यामसन्धारणकर्शनानि हृद्रोगकतृणि तथा अभिघातः ।।....च.चि. २६

अति उष्ण, पचायला जड, तुरट, कडू, श्रम, कुठल्याही प्रकारचा आघात, अति प्रमाणात भोजन तसेच मैथुन, अति विचार करणे, मानसिक ताण घेणे, वेगांचे धारण करणे, अति प्रमाणात व्यायाम, विरेचन वा बस्ती अति प्रमाणात घेणे, कुठल्याही प्रकारच्या भीतीला सामोरे जाणे, त्रास करून घेणे, असलेल्या आजारांवर योग्य ते काम न करणे, खूप उलट्या होणे, शरीरात आमदोष साठणे, शरीर कृश होणे वगैरे कारणांमुळे हृदयरोग होण्याची शक्यता वाढते.

सध्याच्या काळात सर्वांकडून आहाराच्या बाबतीत चुका होताना दिसतात. सध्या सोशल मीडियाच्या वापरामुळे अगदी लहान वयापासूनच मुला-मुलींना शारीरिक संबंधांबद्दल माहिती होताना दिसते. हस्तमैथुनाचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत अशा प्रकारचा चुकीचा प्रचार समजात होत असल्यामुळे त्याकडेही मुलांचा कल वाढलेला दिसतो.

फिगरबद्दल चुकीच्या कल्पना मनात ठेवल्यामुळे अति व्यायाम करणे, अति तुरट व अति कडू गोष्टी खाणे, साखरेपासून लांब राहणे, शरीर कृश ठेवण्यासाठी फार प्रयत्न करणे, वेळ नाही व फार प्रवासामुळे वेगधारण करणे ही कारणे मोठ्या प्रमाणावर आढळायला लागलेली आहेत.

मुळात आयुर्वेदात रोग होऊच नये यासाठी प्रयत्न करायला सांगितले आहे. पण हृदय हा असा अवयव आहे जो खूप त्रास झाल्याशिवाय आपल्याला जाणीव होऊ देत नाही की त्यात काही बिघाड झाला आहे.

एकदा हृदयाला काही त्रास झाला तर त्याची कार्यक्षमता पूर्ववत होऊ शकत नाही. त्यामुळे हृदयाचा काळजी घेणे अनिवार्य असते. हृदयरोग टाळण्याकरिता व झाला असल्यास पुन्हा पुन्हा त्रास होऊ नये याकरिता,

प्रत्येकाने स्वतःच्या पचनाकडे लक्ष देणे अत्यावश्यक असते. अपचन हृदयासाठी त्रासाचे कारण ठरू शकते. प्रकृतीनुरूप व पचनाला हलके अन्न खाणे उत्तम. आहारात रोज घरचे साजूक तूप आवर्जून ठेवावे. कमीत कमी ५-७ चमचे तूप प्रत्येकाने रोज खाणे उत्तम. कोलेस्टेरॉलच्या भीतीने सध्या बरेच लोक तूप खाण्यापासून लांब राहतात. पण तूप न खाणाऱ्यांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण सध्या जास्त दिसते.

रोज गाईचे ताजे दूधही आहारात नक्की असावे. पचनाच्या दृष्टीने आहारात जिरे, हिंग, सुंठ, मिरी, आले, पुदिना, कोथिंबीर वगैरेंचा समावेश नक्की असावा. तसेच पोट साफ होण्याकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक असते.

अपचन किंवा मलावरोध होऊन पोटात गुबारा धरल्यामुळे अस्वस्थता आल्यावर हृदयाचा त्रास होत आहे असे समजून दवाखान्यात भरती होण्याची उदाहरणे अनेक आढळतात. पचन व्यवस्थित ठेवण्याच्या दृष्टीने रोज रात्री झोपण्यापूर्वी सॅनकूल चूर्णासारखे चूर्ण घेणे, तसेच काही चुकीचे खाण्यात आल्यास संतुलन पित्तशांती वा संतुलन अन्नयोग गोळ्या घेणे.

आठवड्यातून एकदा तरी संध्याकाळच्या वेळी लंघन करणे उत्तम. फार भूक लागत असल्यास गरम सूप घेतल्यास चालू शकते.

हृदयरोग झाल्यावर आहारात तांदूळ, जव, मूग वगैरेंसारख्या हृद्य गोष्टींचा समावेश करणे चांगले. भूक कमी लागत असल्यास साळीच्या लाह्यांपासून बनविलेला फांट किंवा दूध व साळीच्या लाह्या घेता येतात. ऋतुनुसार उपलब्ध असलेल्या पालेभाज्या व फळभाज्या घ्यायला हरकत नाही.

हृदयाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने नियमित व्यायाम करणे उत्तम. न चुकता रोज चालायला जाणे हे हृदयाच्या कार्यशक्तीचा अंदाज घेण्यासाठीही वापरता येऊ शकते. शक्य असल्यास रोज किमान अर्धा-पाऊण तास चालायला जावे, ज्याला त्यामुळे धाप लागत असेल त्याने हृदयाची तपासणी केलेली उत्तम.

एकूणच हृदयाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने तसेच हृदयाच्या स्नायूंमध्ये लवचिकता आणण्यासाठी आयुर्वेदात अर्जुन, मनुका, पुनर्नवा, कमळ तसेच सुवर्णभस्म, शृंगभस्म वगैरेंची योजना आयुर्वेदाच्या तज्ज्ञांकडून करवून घेता येते. हृदयाची ताकद वाढविण्याच्या दृष्टीने अन्न-औषध स्वरूपात असलेले संतुलन सुहृदप्राश वयाच्या चाळिशीनंतर घेणे उत्तम.

मानसिक ताण कमी ठेवण्याकरता, एकूणच उत्साह नीट राहण्याकरता, रक्तसंवर्धनाच्या दृष्टीने मदत होण्यासाठी रोज प्राणायाम करणे उत्तम. सकाळच्या प्रहरी अनुलोम-विलोम ५-१० मिनिटे नक्की करावा. तसेच इतर योगासने करणेही उत्तम.

अशा वेळी एखादे स्वास्थ्यसंगीत लावले तर हृदयाच्या कार्यक्षमतेसाठी व संवेदनशीलता कमी राहण्यासाठी मदत होऊ शकते. आम्ही बऱ्याच वेळा रोग्यांना स्पिरीट ऑफ हार्मनी, योगनिद्रा, समृद्धी वगैरे श्रीगुरु बालाजी तांबे यांचे स्वास्थ्यंगीत ऐकायला देतो व त्याचा त्यांना फायदा होत असल्याचे रुग्ण सांगतात.

हृदयवाहिन्यांमध्ये असलेल्या अवरोधांबद्दल लोकांच्या मनात खूप भीती असते. एखाद्या हृदयवाहिनीत अवरोध असला तर ती वाहिनी हृदयाच्या ज्या भागाला रक्तपुरवठा करते त्या भागाला रक्तपुरवठा न केला गेल्याने हृदयाचा झटका येण्याची शक्यता असते.

अशा वेळी शस्त्रकर्म करून अवरोध कमी केले जातात किंवा त्या ठिकाणी दुसरी वाहिनी टाकली जाते. हे सगळे त्या वाहिनीपुरते केले तरी अशा प्रकारचे दोष दुसऱ्या वाहिनीत आल्याचे आढळतात.

त्यामुळे शरीराची वाहिन्यांमध्ये अवरोध करण्याची प्रवृत्ती थांबवणे जास्त गरजेचे असते. याकरता आहारात व दिनचर्येत बदल करणे आवश्यक असतेच, पण त्याबरोबर संतुलन पंचकर्मासारखे शास्त्रोक्त पंचकर्म करून घेतल्यास शरीरशुद्धी होऊन अवरोध तयार करण्याची शरीराची प्रवृत्ती कमी व्हायला मदत मिळते.

संतुलन पंचकर्मातील हृदबस्ती हा हृद्रोगावर केला जाणारा सगळ्यात महत्त्वाचा उपयार होय. हृदयवाहिन्यांमध्ये अवरोध झाला असल्यास, हृदयाची ताकद कमी झाली असल्यास, हृदयाच्या झडपांची कार्यक्षमता कमी झाली असल्यास, हृदयाच्या गतीत दोष उत्पन्न झालेला असल्यास हृद्बस्तीचा उत्तम उपयोग होतो असा आत्मसंतुलन केंद्राच्या कित्येक रुग्णांचा अनुभव आहे.

कित्येक रुग्णांनी तर शस्त्रकर्म करण्याऐवजी पंचकर्म व हृद्बस्तीचा सल्ला पाळल्यानंतर १०-२० वर्षे तरी ते व्यवस्थित आयुष्य जगत आहेत. सुंतलन पंचकर्म व हृद्बस्तीचा करून घेतल्यावर त्यांची तब्येत आधीपेक्षाही सुधारली व ते त्यांचे काम अधिक जोमाने करत आहेत.

हृदय संपूर्ण शरीराला रक्तपुरवठा करते. त्याचे कार्य व्यवस्थित चालू राहण्याच्या दृष्टीने त्याला स्वतःलासुद्धा पुरेसे रक्त मिळणे आवश्यक असते. हृदयाला शक्ती मिळण्याकरता, त्याची ताकद वाढविण्याकरता आयुर्वेदिक जीवनशैलीचा आवर्जून पालन करणे आवश्यक आहे, तसेच वयाच्या चाळिशीनंतर दर २-३ वर्षांनी वैद्यांच्या सल्ल्याने आयुर्वेदिक शास्त्रोक्त पंचकर्म व हृद्बस्ती करणे अत्यंत आवश्यक असते.

गणेश ही बुद्धीची देवता आहे व ही बुद्धी आपल्या स्वतःच्या आरोग्याकरता नक्की वापरली गेली पाहिजे. गणेशपूजनाच्या या काळात आपण सगळ्यांनी स्वतःच्या हृदयाची काळजी घेण्याचा वसा घ्यावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com