- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत
बघता बघता वेळ कशी निघून जाते कळलंच नाही... १५ फेब्रुवारी २०२३ रोजी माझी सर्जरी झाली, आणि पाहता पाहता दोन वर्षे उलटली.
सर्जरी, केमो, रेडिएशन, टार्गेट थेरपी, पिरिअड बंद होण्याचे इंजेक्शन, डॉक्टरांच्या चुकीमुळे एक वर्ष हाताची हालचाल नाही या सगळ्यातून गेले. या प्रवासात खूप काही शिकायला मिळालं - कधी डॉक्टरांच्या चुकीमुळे वर्षभर गळ्यात हात घालून फिरवावा लागला, तर कधी स्वतःच्या अज्ञानामुळे त्रास सहन करावा लागला.
दिवस कसे जातात खरंच कळत नाही - मग ते आनंदाचे असो किंवा दुःखाचे. आयुष्यात सगळ्याच गोष्टी क्षणभंगुर असतात. वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीची तेवढी तीव्रता राहत नाही हेच खरं.
माझ्या शेवटच्या केमोथेरपीनंतर मी पेट स्कॅन केला. मनात खात्री होती - मी पूर्णपणे बरी झाले आहे. डॉक्टरांकडे रिपोर्ट घेऊन गेले, तेव्हा डॉक्टरांनी मला हसून सांगितलं, ‘Your PET scan report is normal.’ तेव्हा मनातला सारा तणाव क्षणात गायब झाला.
गाठी गेल्या की नाही, या प्रश्नावरही उत्तर आलं, ‘स्कॅन पूर्णपणे क्लिअर आलेला आहे.’ त्यांचे मॅजिकल शब्द माझ्या कानावर पडताच माझ्या चेहऱ्यावर मस्त स्माईल आली. त्या क्षणी माझ्या मनाची मरगळ, झालेला त्रास काही काही आठवलं नाही. फक्त डॉक्टरांचे शब्द कानात घुमत होते..
माझ्या उपचारांच्या सुरुवातीला मी एका चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे त्रास सहन करत होते. त्याचवेळी, देवदूताप्रमाणे डॉ. रेश्मा पुराणिक भेटल्या आणि त्यांच्या आत्मविश्वासाने माझ्या मनातील गोंधळ दूर झाला. उपचारादरम्यान त्यांनी केवळ वैद्यकीय दृष्टिकोन न ठेवता माझ्या आर्थिक बाजूचाही विचार केला. कोणती औषधं अधिक प्रभावी आणि परवडणारी असतील, याबद्दल नेहमीच त्यांनी मला खूप छान माहिती दिली..
प्रत्येक भेटीत त्या मला पुरेसा वेळ द्यायच्या, माझ्या असंख्य प्रश्नांची उत्तरं शांतपणे देत राहायच्या. एवढंच नव्हे, तर माझी पहिली केमो झाल्यानंतर, बाहेरगावी असतानाही डॉक्टर माझी विचारपूस व्हॉट्सअॅपवर करत राहायच्या.
केमोच्या आधी आणि नंतर होणाऱ्या चाचण्यांवर त्या बारकाईने लक्ष ठेवायच्या. एवढ्या पेशंट्स असूनही त्या प्रत्येकाच्या उपचारांचा तपशील तोंडपाठ ठेवायच्या. हा त्यांचा समर्पणभाव मला नेहमीच थक्क करतो.
आज मी कॅन्सर पेशंट्ससाठी काम करते आणि अनेकांना डॉ. रेश्मा पुराणिक यांच्याकडे पाठवते. काही रुग्ण आर्थिकदृष्ट्या सक्षम नसले, तरी त्या त्यांना उपचार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. त्यांचं हे माणुसकीचं कार्य शब्दात मांडणंही कठीण आहे. आजच्या काळात जिथे व्यावसायिक मानसिकता वाढीस लागली आहे, तिथे डॉ. रेश्मा पुराणिक यांच्यासारखे अनेक डॉक्टर एक प्रकाशकिरण आहेत.
हे डॉक्टर केवळ वैद्यकीय मदतच नाही, तर मानसिक आणि भावनिक आधारही कॅन्सर पेशंटला देतात. खरं तर, डॉक्टर केवळ आजार बरे करत नाहीत, तर आशेचे नवे किरणही देतात. या युगात जेव्हा डॉक्टर म्हणजे फक्त एक प्रोफेशन मानलं जातं, तेव्हा असे डॉक्टर दाखवून देतात की हे फक्त व्यवसाय नाही, तर एक जबाबदारी आहे -माणुसकीची, विश्वासाची आणि संवेदनशीलतेची!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.