
इनर इंजिनिअरिंग : एखादी जागा प्राण प्रतिष्ठित करताना...
प्रश्न - प्राणप्रतिष्ठा करून एखादी जागा ऊर्जित कशी करायची हे तुम्हाला कसं कळलं? तुम्हाला ही क्षमता जन्मतः मिळाली होती का कालांतराने तुम्ही हे शिकला आहात? मी सुद्धा हे शिकू शकतो का?
सद्गुरू - आमच्या योग कार्यक्रमांमध्ये आम्ही तुम्हाला जे काही शिकवत आहोत, त्याने तुम्ही स्वतःला हळूहळू प्राणप्रतिष्ठित करू शकता. तुम्ही अगोदर स्वतःची प्राणप्रतिष्ठा केली नाही, तर तुम्ही दुसरी कुठली गोष्ट कशी प्राण प्रतिष्ठित करणार? तुम्हाला आयुष्यात जे काही करायचे आहे, ते तुमच्या स्वतःमध्ये नसल्यास ते करू शकत नाही.
तुम्हाला एखादा गुणधर्म दुसऱ्या गोष्टीत किंवा दुसऱ्या कोणापर्यंत पोहचवायचा असल्यास अगोदर तुम्ही तो स्वतःमध्ये घडवून आणला पाहिजे. जे तुमच्यामध्ये घडत नाही ते तुम्ही जगामध्ये घडवून आणू शकत नाही. या संस्कृतीमध्ये, जे लोक साधना करत होते त्यांना नेहमी सांगितले जायचे, की ते स्वतः अस्वस्थ अवस्थेत असतील तर त्यांनी एकांतात गेले पाहिजे, कारण तुम्ही तुमचा गोंधळ जगात पसरवू नये. सर्वप्रथम, मला तुम्हाला प्राण प्रतिष्ठित करायचे आहे. एका अर्थाने, जागा किंवा वस्तू प्राण प्रतिष्ठित करणे ही काही आदर्श गोष्ट नव्हे.
लोकांना प्राण प्रतिष्ठित करणे हे अधिक सोपे आणि चांगले आहे - जर ९८ टक्के लोकांनी त्यांचे प्राधान्यक्रम मिनिटा मिनिटाला बदलले नाही तर! जे सतत त्यांच्या आयुष्याची दिशा बदलत असतात, अर्थातच त्यांचा कुठेही पोहचायचा उद्देश नसतो. आता तुम्ही इथे ईशा योग केंद्रात आहात, तर नकळत आदियोगी (आदियोगी आलयममधील लिंगाला उद्देशून) तुमच्यात उतरत राहील. आज तुम्ही जागा प्राण प्रतिष्ठित करण्याबद्दल बोलत आहात. मला बघायचे आहे, तुम्ही तुमचे हे उद्दिष्ट दीर्घ काळासाठी टिकवू शकता का? तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची प्राणप्रतिष्ठा करायची असेल, तर तुम्ही अगोदर एक जिवंत मंदिर बनले पाहिजे.