

Spinal Cord Disorder
मुंबई : गॅझेट्सच्या अतिवापराने तरुणांमध्ये मणक्याच्या समस्या वाढल्या आहेत. यात ओपीडीत येणाऱ्या ६० टक्के रुग्णांमध्ये तरुणांची संख्या चिंताजनक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारत हा सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात तरुणांची संख्या अधिक आहे, ही खूपच चांगली बाब असली, तरी तरुणाईमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे.
अगदी लहान वयापासूनच मोबाईल हातात आल्याने तरुणांना विविध आजार जडत आहेत. तरुणाईत कॉम्युटर आणि मोबाईल गेमिंगचा अतिवापर झाला आहे. तासन् तास एकाच जागी बसून मोबाईलवर राहिल्याने डोळे आणि मेंदूवर परिणाम होतोय.
याशिवाय, पाठ, खांदे आणि मणक्यात वेदनाची समस्या वाढत आहे. सांधेदुखीमुळे बाह्यरुग्ण विभागात उपचारांसाठी येणारे ६० टक्के रुग्ण हे ऑफिसमध्ये काम करणारे आहेत. ऑफिसमध्ये कॉम्युटर बसून काम केल्यानंतरही प्रवासात मोबाईलचा वापर केला जातो.
यातून मणक्याचे आजार उद्भवतात. त्यामुळे मोबाईल व कॉम्युटरचा अतिवापर टाळून मैदानी खेळ खेळावेत आणि शारीरिक व्यायाम करावा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.
१० दशलक्ष व्यक्ती सर्व्हायकल स्पॉडिलासिसने पीडित
तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे १० दशलक्ष व्यक्ती सर्व्हायकल स्पॉडिलासिसने पीडित आहेत. प्रौढांमध्ये मानदुखीचे प्रमाण दरवर्षी २५-५० टक्के असते. ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ७५ टक्के व्यक्तींमध्ये स्पाइनल कॅनलची समस्या असते. सध्या तरुणांमध्ये सव्हायर्कल स्पाईन आणि सांधेदुखीची समस्या वाढली आहे.
योग्य निदान गरजेचे
स्पोर्ट्स मेडिसिन आणि आर्थ्रोस्कोपी सर्जन डॉ. यजुवेंद्र गवई म्हणाले की, “बऱ्याचदा खेळताना दुखापत झाल्यास खांद्यात असह्य वेदना आणि सूज येण्याची शक्यता अधिक असते. आधीच्या दुखण्यामुळेही खांद्यातील दुखणं वाढू शकते.
यासाठी एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय किंवा इलेक्ट्रोमायोग्राफी (ईएमजी) या वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. खांद्यातील दुखणं वाढून गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी वेळीच निदान व उपचार घेणं आवश्यक आहे.’’
२० वर्षांखालील मुलांमध्येही समस्या
झायनोव्हा शाल्बी रुग्णालयातील ऑर्थोपेडिक आणि गुडघे प्रत्यारोपण सर्जन डॉ. धनंजय परब म्हणाले की, “कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वापर वाईट असतो. संगणक, फोनच्या अतिवापरामुळे मनगटात सुन्नपणा आणि वेदना होऊ शकतात.
यामुळे हातावर ताण येतो. मोबाईलच्या अतिवापरामुळे मान खालच्या दिशेने राहते, ज्यामुळे मान आणि मणक्याची समस्या उद्भवते. तसेच, मोबाईलचा अति वापर केल्यावर खांदे आणि पाठदुखीचा त्रासही होऊ शकतो.
या तक्रारीसाठी दररोज बाह्यरूग्ण विभागात २ ते ३ रुग्ण येतात. हे रुग्ण २० ते ४० वयोगटातील आहे. याशिवाय सध्या २० वर्षांखालील मुलंही येतात. यावर वेळीच निदान होणं खूप गरजेचं आहे. कारण सांधेदुखीचा त्रास वाढल्यास यावर सर्जिकल प्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे.''
कारणे
लॅपटॉप, स्मार्टफोनचा अतिरिक्त वापर, बैठी जीवनशैली, कमकुवत बॉडी पोस्चर हे यामागील मुख्य कारण आहे.
तरुण वयोगटातील मुलांमध्ये गाणी बघत किंवा गेम खेळत जेवण करण्याची ही सवय अतिघातक आहे.
सतत २४ तास त्यांच्या हातात मोबाईल असतो. यात चुकीच्या स्थितीत बसून मोबाईल वापरल्याने बोटे, हात, पाठ आणि मानेत खूप वेदना होऊ शकतात.
याला वेळीच आवर न घातल्यास पुढे अजून गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.
प्रतिबंधात्मक उपाय
मोबाईल खाली वाकून वापरणे टाळावे
डोळ्यांच्या लेवलवर मोबाईल वापरता येऊ शकतो.
एका वेळेस डोकं ३५ डिग्रीपेक्षा जास्त खाली वाकवू नये
एका वेळेस ४० ते ४५ मिनिटे बसू नये, ज्यातून मणक्याचा ताण कमी होतो.
एका किलोग्रॅम १ ग्रॅम प्रोटिनचे सेवन करावे.
मणक्याची झीज होण्याची शक्यता
खांदा आणि गुडघा सर्जन डॉ. उत्कर्ष पवार म्हणाले की, “मोबाईल किंवा संगणकाच्या अतिवापरामुळे पाठ आणि मणक्याची दुखणी होतात. वेळीच उपचार न झाल्यास ऑस्टियोआर्थरायटिस म्हणजे मणक्याची झीज होऊ शकते.
पाठ, खांदा आणि मणक्याचे दुखणे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. स्ट्रेचिंगचा व्यायाम फायदेशीर ठरू शकतो. वेदना कमी करण्यासाठी थंड पाण्याचा शेक द्या. जळजळ कमी करण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी कॉर्टिकोस्टेरॉईड इंजेक्शन्स दिली जाऊ शकतात. डॉक्टरांचा सल्लाही घ्यावा.
कामाच्या गडबडीत फार काळ एकाच स्थितीत बसल्याने मणका आणि मानेच्या समस्या वाढतात. कॉम्प्युटरवर काम करणाऱ्या अनेक नागरिकांना याचा त्रास होतो. त्यामुळे किमान ५ मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायचा. ज्यात मानेच्या आणि पाठीचे व्यायाम करायचे. दोघांची हालचाल होणे आवश्यक आहे.
- डॉ. मोहन देसाई, ऑर्थोपेडिक विभागप्रमुख, केईएम रुग्णालय
४० टक्के लोकसंख्येत व्हीटामिन डी ची कमतरता आहे, त्यासाठी त्याचे सेवन वाढवावे. यातून मांसपेशी, हाडे आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राहते. मान आणि मणक्याच्या व्यायामांकडे लक्ष द्यावे. सूर्यनमस्कार, प्लॅन्स्क आणि मानेला चारही बाजूंना फिरवून व्यायाम करता येतात.
- धीरज सोनावणे, स्पाईन सर्जन, जीटी रुग्णालय
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.