चेतना तरंग : नैराश्‍य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sri sri ravi shankar

चेतना तरंग : नैराश्‍य

तुम्हाला सर्व निराशाजनक वाटत आहे का? जीवन सर्वथा उद्ध्वस्त झालंय असं वाटतं का? तुम्हीच काही तरी केलं किंवा करणं थांबवता येत नाही अशा कृतीनं जीवन उद्ध्वस्त झालं किंवा दुसऱ्यांच्या काही कृतीनं ते उद्ध्वस्त झालं म्हणून निराश झालात का तुम्ही?

असे हताश होऊन उपयोग काय? तुम्हाला जगावंसं वाटत नाही आणि मरणही येत नाही. पूर्णपणे बिघडून गेलंय सगळं. असं काही वाटतंय का तुम्हाला?

हे आहे नैराश्य. निराशाजनक स्थिती.

आणि ही स्थिती एक सुंदर जागा आहे. छे, मी विनोदानं असं म्हणत नाही. काही क्षणांपुरतं का होईना, परंतु जेव्हा तुमचं मन असं नैराश्यामुळं बंद होतं, काम करणं सोडतं, तेव्हा मग सर्व सारवासारव, कसलेही भ्रामक स्पष्टीकरण, खोटा आव, सगळं काही थांबतं. वादावाद होत नाही, कल्पनाविलास आणि तक्रारी थांबतात. धावाधाव संपते. समजून घेण्याचं अथवा समजाविण्याचं प्रयत्न लोपतात. राहते शिल्लक ती वेदना. तुम्ही आणि अश्रू. नैराश्य. आणि अशा परिस्थितीत आता मन शांत होते. कोलाहल थांबतो आणि शांती लाभते.

आता तुम्ही तुमच्या या वेदनेकडं लक्ष देऊ शकाल आणि कोणतेही मत न बनवता तिचा पूर्ण स्वीकार करू शकाल. तुम्ही समर्पित होऊ शकाल. मग तुम्ही त्या वेदनेमध्येच प्रवेश करू शकाल आणि तिथं जाताच तुम्हाला आनंदाश्चर्याचा धक्का मिळंल. कारण वेदनेच्या आत तुम्हाला प्रेम दिसंल. ज्या वेदनेच्या भावनेला वा संवेदनेला घालवायचा तुमचा प्रयत्न होता, तिच्याच मध्यबिंदूमध्ये तुम्हाला प्रेमाचा अनुभव येईल, ज्याच्या तुम्ही एथवर शोधात होतात! आणि दुःख-यातनेबरोबरच त्यातून बाहेर काढणारे सहाय्यदेखील मिळेल तुम्हाला. नैराश्य ही एक अद्‍भुत जागा आहे.

अकरावी देवाज्ञा

आपण एकटे असताना गर्दी घोळक्यात असण्याची जाणीव होणं म्हणजे अज्ञान आहे. मोठ्या गर्दीत असतानाही आपण एकटेच आहोत; किंबहुना ही सगळी गर्दी आपणच आहोत याची जाणीव होणे म्हणजे आत्मबोध. हेच विद्वत्तेचंही लक्षण आहे.

  • काही जणांना केवळ जमावाबरोबर उत्सव साजरा करता येतो. काही जण केवळ एकांतात मौनात असताना आनंद साजरा करू शकतात. मी तुम्हाला सांगतो. हे दोन्ही करायला शिका.

  • जीवनाबद्दलचं ज्ञान तुम्हाला आत्मविश्वास बहाल करतं; आणि मृत्यूबद्दलचे ज्ञान तुम्हाला निर्भय आणि एककेंद्रित करतं.

  • एकांतात आनंद साजरा करा.

  • आणि जमावात राहूनही.

  • मौन आणि शांती साजरी करा.

  • ....आणि गोंगाटही.

  • जीवनाचा आनंद साजरा करा.

  • ...आणि मृत्यूचाही!

  • दहा देवाज्ञा माहीत आहेत ना? आता ही अकरावी!