चेतना तरंग : व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनाची चार तंत्रे

एका ज्ञानी व्यक्तीकडे चार गोष्टी असतात असे सांगितले जाते. त्यांनाच चार आंतरिक आणि बाह्य तंत्रे असे म्हणतात.
sri sri ravi shankar
sri sri ravi shankarSakal

एका ज्ञानी व्यक्तीकडे चार गोष्टी असतात असे सांगितले जाते. त्यांनाच चार आंतरिक आणि बाह्य तंत्रे असे म्हणतात. म्हणजेच, साम, दान, दंड आणि भेद. जगात लोकांशी व्यवहार करताना किंवा ज्ञानी होण्यासाठी तुम्ही सर्वांत पहिली गोष्ट वापरता ती म्हणजे - साम. साम म्हणजे शांततापूर्ण आणि समजूतदार वर्तन. या पद्धतीने जेव्हा काम होत नाही, तेव्हा तुम्ही बचावाचा मार्ग म्हणून तुम्ही दुसऱ्या पद्धतीकडे जाता. दुसरी पद्धत आहे दान.

आपले इच्छित घडवून आणण्यासाठी लोकांना माफ करणे, गोष्टी घडण्यासाठी अवकाश निर्माण करणे म्हणजेच दान. मात्र, तुम्ही निर्माण केलेल्या या अवकाशामागील तुमची उदारता लोकांच्या लक्षात येत नाही, तेव्हा भेद या तंत्राचा अवलंब करावा.

भिन्नता निर्माण करणे, फरक करणे, मुद्दामहून फूट पाडणे म्हणजे भेद होय. तुमच्याशी कोणी भांडत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही त्यांच्याशी बोला. आपसातील संवादाच्या अभावामुळे अनेक समस्या उद्‍भवतात. मात्र, संवाद साधल्यास सामोपचाराला सुरुवात होते. त्यानेही काम होत नसेल, तर तेवढ्याच प्रेमाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. कोणाच्या हातून काही चूक घडली तर त्याकडे लक्ष देऊ नका. त्यांना स्वतःहून चूक जाणून घ्यायची संधी द्या.

तुमची उदारता, तुमचे सोडून देणे यामुळे लोकांना त्यांची चूक उमगेल. तरीदेखील त्यांना कळले नाही तर मग तुम्ही भेद - फरक करणे सुरू करा. दोन जण असतील तर एकाच्या बाबतीत पक्षपाती वागणूक ठेवा. असे केल्याने समोरच्या माणसाला त्याची चूक कळेल.

दानामध्ये फरक निर्माण करू नका. आयुष्यात तुम्हाला भेद अनेक वेळा वापरावा लागेल. तुम्ही फरक निर्माण करता, परंतु हे जागरूकतेने किंवा हेतुपुरस्सर नसते. ते तुमच्या हातून अजाणतेपणी घडते. त्यामुळे ही भिन्नता काळजीपूर्वक करा.

संवेदनशील व्यक्तीला ते बरोबर कळेल, पण तरीदेखील ते योग्य मार्गावर आले नाहीत, तर शेवटचा मार्ग म्हणजे दंड. ती व्यक्ती भेदभाव कळण्याबाबतही असंवेदनशील असेल, तर तुम्हाला हातात छडी घेतलीच पाहिजे. सरतेशेवटी तुम्ही हातात छडी घेऊन त्यांच्या लक्षात त्यांची चूक आणून देऊ शकता.

ही चारही तंत्रे तुमच्या आंतरिक जीवनाला लागू पडतात. साम म्हणजेच समतोलपणा. तो टिकवा. जर सुखाच्या संवेदना झाल्या, तर त्यांचे निरीक्षण करा. अप्रिय संवेदना झाल्या, तरी त्यांचेही निरीक्षण करा. समतोल राखा. ध्यान, योग हे सर्व काही मनाचा समतोल राखण्याशी निगडीत असते. ते सर्व साम आहे.

मात्र, समतोल राखणे अनेक लोकांना अवघड जाते. मग दान. जे तुम्हाला विचलित करते, जे तुम्हाला समतोलाच्या सिंहासनावर बसू देत नाही, ते सर्व सोडून देणे म्हणजे दान होय. कशामुळे तुम्ही अशांत होता? काही तरी चुकीचे केल्याने आलेली अपराधीपणाची भावना किंवा काही तरी महान गोष्ट केल्यामुळे आलेला अहंकार. या दोन्ही भावना त्यागा. त्यांचा त्याग करून मनाला शरण जा. हेच दान होय.

तुम्ही शरण जाता, तेव्हा त्यात किती मुक्ती असते याचे निरीक्षण केले आहे का? तुमची दुःखे, समस्या, दुर्दशा यांचे कारण असलेल्या तुमच्या स्वतःच्या मनाचे समर्पण करणे म्हणजेच दान होय. या चारही तंत्रांचा योग्य पद्धतीने योग्य वेळी वापर करणे म्हणजेच जीवन होय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com