चेतना तरंग : धर्म आणि राजकारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sri sri ravi shankar

धर्माची आवश्यकता लोकांना प्रेमळ आणि सदाचरणी करण्यासाठी आहे आणि राजकारणाची व्याख्याच लोकांची आणि त्यांच्या कल्याणाची काळजी करणे अशी आहे.

चेतना तरंग : धर्म आणि राजकारण

धर्माची आवश्यकता लोकांना प्रेमळ आणि सदाचरणी करण्यासाठी आहे आणि राजकारणाची व्याख्याच लोकांची आणि त्यांच्या कल्याणाची काळजी करणे अशी आहे. जेव्हा राजकारण आणि धर्म एकत्र नांदत नाहीत, तेव्हा तुम्हाला भ्रष्ट राजकारणी आणि दांभिक धर्मनेते यांचा सुळसुळाट झाल्याचे आढळेल.

जी धार्मिक व्यक्ती प्रामाणिक, प्रेमळ आणि सदाचरणी आहे, ती सर्व जनसामान्यांच्या कल्याणाची धूरा बाळगेल आणि त्यामुळे एक चांगली राजकारणी बनू शकेल. एक चांगला राजकारणी प्रेमळ आणि सदाचरणी असावाच लागतो. म्हणजे त्याला धार्मिक असण्यास पर्याय नाही. सर्व अवतार आणि धर्मगुरू हे लोकांच्या कल्याणाची काळजी करत असत आणि म्हणून सर्वजण राजकारणात उतरले होते. या प्रकारची अनेक उदाहरणे तुम्हाला इतिहासात आढळतील.

धर्म सर्वसमावेशक हवा

धर्म जेव्हा लोकांचे प्रार्थनेचे आणि प्रार्थना करण्याच्या पद्धतींचे स्वातंत्र्य नियंत्रित करू पाहतो वा त्यावर मर्यादा लादू पाहतो, तेव्हा तो धर्म एका सुसंवादी, शांतताप्रिय समाजाची निर्मिती करण्यास असमर्थ असतो. उलट जेव्हा धर्म सर्वसमावेशक असतो आणि प्रार्थना करण्याचे आणि प्रार्थना-पद्धती निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतो, तेव्हा तो धर्म समाजामध्ये प्रेम, सदाचरण आणि शांती प्रस्थापित करू शकतो आणि त्यामुळे समाजासाठी योग्य असतो.

अनेक धर्मांनी समाजातील सर्व लोकांना समान वागणूक देऊ केली नाही आणि प्रार्थना स्वातंत्र्य बहाल केले नाही. यामुळे राजकारणात धर्माचा हस्तक्षेप नसावा, असे अनेकांना वाटते. धर्माने समाजात कलह निर्माण केल्याचे दाखले इतिहासात आहेतच. पण त्याचबरोबर अधार्मिक समाजामध्ये (उदाहरणार्थ, साम्यवाद) अधिक तीव्र अराजक, अशांती आणि भ्रष्टाचार माजल्याचे आढळते.

आजच्या युगात धर्म आणि राजकारण या दोन्हीमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. समाजाला प्रार्थनेचे स्वातंत्र्य देण्यासाठी आणि सर्व जगातील उपयुक्त ज्ञान एकत्र वापरण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी धर्माला अधिक विस्तृत, सर्वसमावेशक आणि अधिक आध्यात्मिक होणे आवश्यक आहे आणि राजकारण्यांनी अधिक सद्वर्तनी, प्रेमळ आणि आध्यात्मिक व्हायला हवे.