तंदुरुस्त राहा, आनंदी राहा

शारीरिक आरोग्यासाठी मी जितकं होऊ शकते, तितकं योगा करते. वॉकिंग करते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नृत्य करते. नृत्य माझा छंद आहे. त्यातून मला खूप आनंद मिळतो.
actress richa agnihotri
actress richa agnihotrisakal

शारीरिक आरोग्यासाठी मी जितकं होऊ शकते, तितकं योगा करते. वॉकिंग करते आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नृत्य करते. नृत्य माझा छंद आहे. त्यातून मला खूप आनंद मिळतो. त्यातून फक्त शारीरिक व्यायामच नव्हे, तर मानसिक व्यायामही होतो. त्याशिवाय मी माझ्या पेटला फिरवते, त्याच्यासोबत खेळते.

त्यामुळे फक्त माझे आरोग्य नाही तर त्याच्याही आरोग्याची काळजी घेतली जाते. त्यात मला आनंद मिळतो, ताणतणाव निघून जातो. त्यामुळे माझे मानसिक स्वास्थ्य छान राहते. मानसिक आरोग्यासाठी मी मेडिटेशनही करते, शिवाय देवाची आराधनाही करते. त्यातून मन प्रसन्न होते.

मी जिममध्ये कमी जाते. कारण मी जिममध्ये इक्विपमेंट्सचा वापर करण्यापेक्षा माझा कल नैसर्गिक व्यायामाकडे आहे. मी योगाद्वारे वजन कमी करण्याचा प्रयत्न करते. मी जिममधील ट्रेडमिल टाळण्याचा प्रयत्न करते. त्याऐवजी बाहेरच्या वातावरणात चालल्याने शुद्ध हवाही मिळते आणि व्यायामही होतो. मात्र, जिममध्ये मी सायकलिंग आवर्जून करते. त्याशिवाय नैसर्गिक गोष्टींपासून जो व्यायाम मिळू शकतो, ते करते. मी एकोणतिसाव्या मजल्यावर राहते. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा पायऱ्यांवर चढ-उतार करण्याचा प्रयत्न करते.

योगा, प्राणायाम, ध्यानधारणा हा माझ्यासाठी जवळचा विषय आहे. त्यातून मनाला चांगली ऊर्जा मिळते आणि प्रसन्न वाटते. त्याच्या व्यतिरिक्त बरेच फायदे आहेत. आजच्या पिढीचे हार्मोनल असंतुलन होत असते, ते योगासने आणि प्राणायामामुळे खूप नियंत्रणात राहते. योगासने, प्राणायामामुळे शरीरातील विषारी घटक शरीरातून बाहेर काढून टाकायला मदत होते.

नैसर्गिक आहारावर भर

माझा आहार खूप शिस्तबद्ध असतो. मी सकाळी अकरा ते बारा या वेळेत जेवते आणि संध्याकाळी सहा ते सातच्यामध्ये जेवते. माझ्या आहारात दोन पोळ्या, भाजी, सॅलेड व जमल्यास ताकाचा समावेश असतो. भात मी जास्त खात नाही. प्रोटिन्सवर जास्त भर असतो. नैसर्गिकरीत्या पिकलेली फळे अन् भाज्या मी आहारात जास्त घ्यायचा प्रयत्न करते. कामानिमित्त अनेकदा बाहेर असते. तरीही मी आहाराच्या वेळा पाळते. घरी बनविलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करते. जंक फूड टाळते.

फिटनेससाठी टिप्स...

  • आपण जितके आरोग्याला जपू, तितकेच आरोग्य आपल्याला जपते. कारण सगळ्यांना हवे असते की, भरपूर पैसा कमवायचा, छान दिसायचं, छान लाइफस्टाइल जगायची; पण त्यासाठी सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले आरोग्य.

  • आपल्या आरोग्याने साथ दिली नाही, तर आपण अनेक गोष्टी करू शकत नाही. गेल्या पिढीतील आजी-आजोबा शेतात भरपूर काम करत असत. त्यामुळे त्यांचे आरोग्यही सुदृढ असे.

  • आपण फिटनेसबाबत कायमच काळजीपूर्वक राहणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध प्रकारची कामेही करावीत.

  • सध्याच्या धावपळीच्या युगात सर्वजण कामाच्या मागेच पळत आहेत. त्यामुळे आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. पैसा खूप कमवतात; पण तो नंतर ट्रीटमेंटवरती घालतात.

  • मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी दिवसातला अर्धा तास काढावा. जेणेकरून आपला दिवस सुंदर जाईल आणि आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळेल. त्यातून आपण अजून चांगल्या गोष्टी करू शकू, यशस्वी होऊ शकू, भरपूर पैसे कमवू शकू आणि ते पैसे आपल्याला पुढे जाऊन ट्रीटमेंटमध्ये घालवावे लागणार नाहीत, तर ते आपल्या आनंदासाठी खर्च करता येतील.

  • जीवन आनंदी करण्यासाठी भरपूर व्यायाम करा. प्राणायाम, योगासने आणि ध्यानधारणा करत जावी.

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com