
Symptoms of Stroke vs Symptoms of Brain Tumor: डोकेदुखी, बोलण्यात अडचण, चालताना अस्थिरता, दृष्टी कमजोर होणे... अशी लक्षणं अनेकदा आपण थकवा किंवा ताणाशी जोडतो. पण ही लक्षणं एखाद्या गंभीर मेंदूविकाराची सुरुवात असू शकतात. विशेषतः स्ट्रोक आणि ब्रेन ट्यूमर यासारख्या स्थितींमध्ये अशी लक्षणं दिसून येतात.
दोन्ही आजारांमध्ये मेंदूवर परिणाम होतो, लक्षणंही काही प्रमाणात समान असतात, त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते. अशावेळी वेळेवर योग्य निदान झालं नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे स्ट्रोक आणि ब्रेन ट्यूमरमधील मूलभूत फरक समजून घेणं आणि लक्षणं ओळखून तत्काळ उपचार घेणं अत्यंत गरजेचं आहे.
स्ट्रोक हा मेंदूशी संबंधित एक आपत्कालीन प्रकार आहे, जिथे मेंदूपर्यंत पोहोचणाऱ्या रक्तप्रवाहात अचानक अडथळा येतो. यामुळे रुग्णाच्या शरीराच्या हालचाली, बोलणे, समज आणि दैनंदिन कार्यांवर त्वरित परिणाम होतो. मणिपाल हॉस्पिटल, गाझियाबादचे न्यूरोसर्जन डॉ. गजेन्द्र सिंह संधू यांच्या मते, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे आजार, धूम्रपान, वजन जास्त असणे आणि वयोमान हे स्ट्रोकचे धोका वाढवणारे प्रमुख घटक आहेत.
ब्रेन ट्यूमर म्हणजे मेंदूमध्ये पेशींची असामान्य वाढ. ही वाढ नियंत्रित नसते आणि त्यामुळे ट्यूमर तयार होतो. हा ट्यूमर हळूहळू वाढत जातो आणि वेळोवेळी लक्षणं गंभीर होत जातात. यामध्ये डोकेदुखी, मळमळ, दृष्टी कमी होणे, संतुलन बिघडणे, बोलताना अडचण येणे असे त्रास दिसून येतात.
सुरुवात आणि प्रगती:
स्ट्रोकचे लक्षण अचानकपणे आणि तीव्रतेने दिसते, तर ब्रेन ट्यूमरची लक्षणं कालांतराने हळूहळू दिसू लागतात.
लक्षणांचा प्रकार:
दोघांमध्येही बोलण्यात अडचण, कमकुवतपणा, आणि समतोल बिघडणे ही समान लक्षणं असू शकतात. मात्र स्ट्रोकमध्ये ही लक्षणं एका क्षणात उद्भवतात, तर ट्यूमरमध्ये ती तीव्र होत जातात.
कारण:
स्ट्रोक मुख्यत्वे मेंदूत रक्तपुरवठा थांबल्यामुळे होतो. ट्यूमर मात्र पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे तयार होतो.
उपचार:
स्ट्रोकमध्ये clot-busting औषधे किंवा सर्जरीने तात्काळ हस्तक्षेप केला जातो. ट्यूमरच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया, कीमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीचा वापर केला जातो.
मेंदूशी संबंधित या दोन्ही गंभीर अवस्थांमध्ये लक्षणं दिसताच विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते. यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून दोन्ही विकारांमधील फरक ओळखणं रुग्णाच्या जीव वाचवण्यासाठी निर्णायक ठरू शकतं.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.