
Medical Miracle : २७ वर्षांच्या मुलीला झोपेत यायचा उदबत्तीचा वास, 'भूतबाधा' नाही हा तर...
Superstition & Science : जगात बऱ्याच अजब गजब गोष्टी घडत असतात. कधी त्या आपल्या पर्यंत पोहतात कधी नाही. पण जेव्हाही अशा अजब गोष्टी कानावर पडतात तेव्हा आश्चर्याने डोळे विस्फारल्याशिवाय राहत नाही. कधी अंगावर काटाही उभा राहतो. भारतीय संस्कृतीत ज्या गोष्टींचा उलगडा होत नाही त्या गोष्टी एकतर दैवी समजल्या जातात किंवा भूतबाधा. अशीच एक घटना सध्या व्हायरल होत आहे. ही घटना डॉ. सुधीर कुमार यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
हैद्राबादची एक २७ वर्षिय महिला राधा ही पती, सासू यांच्यासोबत आनंदाने नांदत होती. पण तिला सतत उदबत्तीचा वास येत होता. पण प्रत्यक्ष आजूबाजूला चेक केलं तर कुठेच काही जळत नाही असं लक्षात येत होतं. एकदा झोपेत हा वास आला. उठून बघितलं तर सगळे शांत झोपलेले होते. नंतर आजूबाजूलापण चेक केलं तर कुठेच काही जळत नव्हतं. स्वप्न असेल म्हणून त्याकडे दूर्लक्ष केलं. पण नंतर हा प्रकार वाढू लागला. आठवड्यातून ३-४ वेळा असा वास येऊ लागला.
हा वास दिवसभरात कधीही येत होता. घरच्यांनी तिला देवा, धर्माचं जास्त मनापासून करण्याचा सल्ला दिला. सासूने काही उपास तापास करायला सांगितलं. काही यज्ञ याग पण केले. बाहेरची बाधा आहे का, यावर उपाय केला. पण नाईलाज. त्रास काही कमी होईना. घरचे कंटाळून शेवटी मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन गेले. पण हा प्रकार मानसिक नाही, काहीतरी वेगळं आहे असं त्यांनी सांगितलं.
मानसोपचार तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार न्युरोलॉजिस्ट डॉ. सुधीर कुमार यांच्याकडे तिला नेण्यात आले. त्यांनी विविध तपासण्या केल्या. त्यात MRI आणि EEG या तपासण्या केल्यावर निदर्शनास आलं की, तिला मेंदूत ट्यूमर आहे. त्यामुळे तिला उदबत्तीचा वास येणे, ट्रांसमध्ये जाणे अशी लक्षणे दिसत होती. त्यावर शस्त्रक्रिया, उपचार करण्यात आले. त्यानंतर हे सर्व त्रास बंद झाले आणि आता ती महिला आनंदात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.