Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

swasthyam yoga

प्राणायाम म्हणजे प्राणाचे किंवा श्वासाचे आयाम किंवा विस्तार. प्राणायम हा योगाचा एक भाग असून, यामध्ये श्वास घेण्याच्या विविध शास्त्रीय पद्धती आहेत.

Swasthyam 2022: प्राणायाम करताना या सात गोष्टी लक्षात ठेवा

प्राणायाम म्हणजे काय?

प्राणायाम म्हणजे प्राणाचे किंवा श्वासाचे आयाम किंवा विस्तार. प्राणायम हा योगाचा एक भाग असून, यामध्ये श्वास घेण्याच्या विविध शास्त्रीय पद्धती आहेत. योग्य व शास्त्रीय पद्धतीने घेतलेला श्वास अनेक आजारांना दूर करतो. योगाभ्यासात केलेला प्राणायामाचा सराव आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवतो व आपले शरीर आणि मन संतुलित करतो.

प्राणायाम करताना घ्यायची काळजी

1) आपण कुठेही बसून प्राणायाम करू शकता. फक्त ती जागा मोकळी आणि हवेशीर असेल, तर अधिक चांगले. प्राणायाम करण्यासाठी सकाळची सूर्योदयाची वेळ ही सर्वांत योग्य मानली जाते. तसेच, आपण संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळीही प्राणायाम करू शकतो. प्राणायाम सकाळी पोट रिकामे असेल, तेव्हा करायला हवे. तसेच, आपण अल्पोपहार केला असेल, अथवा चहा घेतला असेल, तर कमीत कमी दोन तासांनंतर प्राणायाम करावे.

2) प्रथम श्वास कसा घ्यावा व कसा सोडावा याचा अभ्यास करावा, प्राणायाम करताना कंफर्टेबल आसनात बसून करावे, प्राणायाम करताना घाई करू नये.

3) प्राणायाम करतेवेळी आरामदायी कपडे परिधान करावेत. जास्त टाईट कपडे घालू नयेत.

4) प्राणायामामध्ये सराव महत्त्वाचा आहे. तसेच, प्राणायाम करत असताना आजूबाजूची हवा शुद्ध व वातावरण स्वच्छ असणे आवश्यक आहे.

5) प्राणायाम हे काळजीपूर्वक करायला हवेत. कोणतेही पुस्तक व व्हिडिओ बघून प्राणायाम केले, तर त्याचे परिणाम योग्य मिळतातच असे नाही. उदाहरणार्थ, एखाद्याला बीपीचा त्रास असेल, तर त्यांनी कपालभाती करू नये. तसेच, थंडीमध्ये शीतली प्राणायाम करायचा नसतो.

6) प्राणायाम करताना तुमचे लक्ष श्वासावर असणे खूप महत्त्वाचे आहे.

7) प्राणायाम व योगसाधना करताना निरोगी जीवनासाठी चार मुलभूत गोष्टी आवश्यक आहेत. एक चांगला व्यायाम, दुसरे योग्य पोषक व सकस आहार, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रात्रीची शांत झोप आणि चौथी गोष्ट म्हणजे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन. या चारही गोष्टींचे प्रत्येकाने नियमित पालन केले, तर शरीर सुदृढ व निरोगी राहीलच, शिवाय मानसिक ताण-तणावाचे अतिशय चांगल्या प्रकारे समायोजन होते.

दीर्घकालीन निरोगी आरोग्यासाठी प्राणायाम

नियमित प्राणायामाच्या सरावाने श्वासावर योग्य नियंत्रण मिळविल्यास निरोगी आयुष्याचा लाभ मिळतो. अनेक व्याधींचा प्रतिबंध या प्राणायामामुळे होतो व त्याचबरोबर आत्मिक बळही वाढते. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर श्वासाच्या माध्यमातून मनाचे नियंत्रण करण्याचे शास्त्र म्हणजे प्राणायाम. आपल्या मनाच्या विविध अवस्थांचा श्वासावर सर्वांत प्रथम परिणाम होतो. मनातील राग, भीती, अस्वस्थता या विविध स्थितींमुळे श्वासोच्छ्वास असंतुलित होतो. तसेच, मन शांत असेल, तेव्हा श्वासही संतुलित असतो. मनाच्या अवस्थेप्रमाणे व स्थितीप्रमाणे श्वास बदलतो.

श्वास घेणे म्हणजे फक्त हवा घेणे नाही, तर, श्वासोच्छ्वास घेण्याचीदेखील एक शास्त्रीय पद्धत आहे. आपण योग्य व शास्त्रीय पद्धतीने श्वासोच्छ्वास केला, तर त्याचा आपल्या शरीराला व निरोगी आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच फायदा होतो. प्राणायामाच्या माध्यमातून आपण योग्य रितीने श्वासोच्छ्वास घेऊन, श्वासावर नियंत्रण मिळवू शकता.

प्राणायाम हे योगसाधनेतील प्रमुख साधन आहे. प्राणायामाच्या योग्य व सातत्याने केलेल्या सरावामुळे श्वसनक्षमता वाढते. तसेच, सुदृढ निरोगी शरीर, स्थिर व प्रसन्न मन आणि प्रबळ इच्छाशक्ती प्राप्त करून घेण्यासाठी नियमित योगसाधना करणे आवश्यक आहे. व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सुदृढ व तंदुरुस्त असेल आणि मनाने शांत आणि भावनिक स्तरावर स्थिर असेल, तरच तिला संपूर्ण निरोगी म्हणता येईल. शांत व स्थिर मनामुळे व्यक्तीची सर्व स्तरांवर कार्यक्षमता वाढते. प्राणायाम व योगसाधना आपल्याला शरीर, श्वास आणि मन या विविध स्तरांवर निरोगी राखण्यासाठी मदत करते. प्राणायामामुळे श्वासावर नियंत्रण राहते आणि मनातील विचारांचे व भावनांचे चढ-उतार दूर होऊन मन स्थिर व प्रसन्न होते.

‘स्वास्थ्यम्’ का उपयुक्त?

प्रत्येक पाच व्यक्तींमागे एका व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा मानसिक त्रास होत असतो. त्यातील फक्त दहा टक्के लोकांना उपचार मिळतात. चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैली आवश्यक आहे. त्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ नागरिकांना उपयुक्त ठरणार आहे.

‘स्वास्थ्यम्’ कशासाठी?

1) ध्यानधारणांविषयी शास्त्रीय माहिती : मनुष्याला अनेक शारीरिक व्याधी ‘मनाच्या अस्वस्थे’मुळे होतात. ताण-तणाव, मनात सुरू असलेले वेगवेगळे विचार, भीती, काळजी अशा अनेक कारणांनी आपले शरीर व मन थकते. आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी मेंदूची असते, म्हणूनच आपल्या मेंदूचे कार्य अतिशय संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित ध्यानधारणा आवश्यक आहे.

2) शरीर, इंद्रिये आणि निरोगी मनासाठी प्राणायाम : शरीराच्या विविध अवयवांतील प्राणाचे प्रमाण कमी-जास्त झाल्याने शरीरात व्याधी उत्पन्न होतात. प्राणायामामुळे प्राणशक्ती संतुलित होऊन व्याधींचा नाश होतो. नियमित प्राणायामाने शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी ठेवण्यास मदत होते. प्राणायामाच्या माध्यमातून श्वास कसा घ्यावा, श्वासावर नियंत्रण कसे मिळवावे हे जाणून घेऊ शकता.

3) उत्तम, निरोगी व तंदुरुस्त आरोग्यासाठी योग : मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक या चार गोष्टींचे संतुलन म्हणजे उत्तम आरोग्य. योग या शास्त्रात मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक या तीन गोष्टींचा समावेश होतो. या तीन महत्त्वपूर्ण गोष्टींनी मानवी जीवनाचे योग्य संतुलन राखले जाते.

4) अध्यात्म आणि सुदृढ आरोग्य यांचा सहसंबंध : अध्यात्मातून माणूस स्वतःकडे पाहण्यास शिकतो. स्वतःकडे पाहिल्याने आत्मपरीक्षणाची सवय लागते. अध्यात्म हे लोकांना जीवनाचा अर्थ व सार सांगण्यासाठी, नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी व चांगल्या संस्कारांचा स्वीकार करण्यासाठी मदत करते. अध्यात्माचा सकारात्मक प्रभाव मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.

5) सकस आहार आणि आरोग्य : धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मानवाच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी शरीराला पौष्टिक व सात्त्विक आहाराची आवश्यकता असते. पौष्टिक आहार कमी किंवा अधिक प्रमाणात मिळाला, तरी दुष्परिणाम शरीरावर होतो.

6) गायन, कला व संगीताचा आरोग्याशी संबंध : आपल्या आवडीचे गाणे किंवा संगीत ऐकले, की मन प्रसन्न होते. म्हणजे संगीताचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा आणि गायन-संगीत कलेचा आपल्या आरोग्याशी संबंध आहे.

तीन दिवसांत यांचे मिळणार मार्गदर्शन व विषय

डॉ. हंसाजी योगेंद्र : योगा : अ होलिस्टिक अ‍ॅप्रोच फॉर हेल्थ अँड वेलबिइंग

नूपुर पाटील : लर्न द रिअल मिनिंग ऑफ द वर्ड डाएट

अॅक्शन दिग्दर्शक चित्ता शेट्टी : मार्शल आर्ट्स द्वारे शारीरिक तंदुरुस्ती व स्वास्थ्य

ख्यातनाम कवी, व्याख्याते कुमार विश्वास : दैनंदिन जीवन समृद्ध करण्यासाठी रामायण आणि महाभारतातील शिकवण

प्रियांका पटेल : इमर्सिव्ह साउंड्स : साउंड हीलिंग कार्यशाळा

सूफी गायिका रुहानी सिस्टर्स व शास्त्रीय गायक, संगीतकार उस्ताद राशीद खान : मानसिक स्वास्थ्यासाठी संगीत व गायन

अध्यात्म गुरू संत श्री गौरांग दास : आनंदी जीवनाची कला

अभिनेत्री शिल्पा शेट्टी : कीप इट सिम्पल - योगा आणि फिटनेस

डॉ. राजेंद्र बर्वे : आजची नवीन सामान्य स्थिती आणि मन

योगगुरू श्री एम : योग, अनंत क्षमतेचा मार्ग

सर्वेश शशी : योगा, फिटनेस आणि त्यापलीकडे

अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया देशमुख : लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन

असे व्हा सहभागी...

मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी होऊ शकतात. तसेच योग, प्राणायाम, अध्यात्म, तंदुरुस्ती आदी क्षेत्रांत कार्यरत असलेल्या विविध संस्था, ग्रुप्स यांनाही सहभागी होता येईल. त्यासाठी खालील वेबसाइट ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता.

https://www.globalswasthyam.com/

उपक्रमाच्या माहितीसाठी व अपडेट मिळविण्यासाठी वेबसाइट व खालील सोशल मीडिया पेजेसला भेट द्या !

Facebook: https://www.facebook.com/globalswasthyam

Instagram: https://www.instagram.com/globalswasthyam/

Twitter: https://twitter.com/GlobalSwasthyam

LinkedIn: https://www.linkedin.com/company/global-swasthyam