

पुणे : ध्वनीने जर गोंगाटाचे रूप धारण केले तर त्याचा त्रास सहन करावा लागतो. याचा अनुभव रोजच आपण सर्वजण घेतो. परंतु तोच ध्वनी योग्य लयीत, चांगल्या वातावरणात आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने कानावर पडल्याने साधनेतून स्वास्थ्याची अनुभूती शनिवारी पुणेकरांनी अनुभवली. निमित्त होते साउंड हीलिंग कार्यशाळेचे. सकाळ माध्यम समूह आणि ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत ‘स्वास्थ्यम्’ या उपक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात ‘योग फिटनेस साउंड हीलिंग इंडिया’च्या संस्थापक प्रियांका पटेल यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी प्रियांका यांचा सन्मान केला.
वयाच्या ११ व्या वर्षी प्रियांका यांनी शास्त्रीय संगीताचा अभ्यास सुरू केला. ध्वनीच्या कंपनांमुळे येणाऱ्या अनुभवातून चित्त स्थिर करण्याची विद्या त्यांना अवगत आहे. २०१० पासून त्या ‘साउंड थेरपी’ करत आहेत. अंतरंगाशी संवाद साधण्यासाठी नादयोग किंवा संगीत साधना उपचार पद्धती (साउंड थेअरपी) कशी काम करते हे त्यांनी प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून सादर केले. ध्वनीचा निनाद करीत तो अंतरंगात पोचवत त्याची अनुभूती, त्यातून स्थिर झालेले चित्त, सहभागींचा स्वतःशी झालेला कनेक्ट आणि त्यानंतर पुन्हा दैनंदिन जीवनात आगमन अशा टप्प्यांत ही कार्यशाळा पार पडली. सिंगिंग बाउलमधून येणारा ध्वनी, मंद प्रकाश आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्माण झालेली शांतता यामुळे नागरिकांना अंतरंगाशी संवाद साधणे आणखी सोयीस्कर झाले.
प्रियांका पटेल यांनी दिलेल्या टिप्स
प्रत्येक मानसिक आजाराला औषधोपचार हा उपचार नाही
शारीरिक आणि मानसिक समतोल असलेल्यांचे आरोग्य चांगले असते
मानसिक समस्या हा आजार नाही
ही समस्या लक्षात आल्यानंतर त्यावर योग्य उपचार घ्यावेत
समस्यांतून बाहेर पडण्यासाठी मंत्रोच्चार करावा
ध्वनी, कंपने आणि शांतता
ध्वनीविना कंपने नाही आणि कंपनांविना ध्वनी नाही. जेव्हा आपण ध्वनी अनुभवतो. तेव्हा आपले शरीर अंतर्गत हालचाल करते. त्यातून चित्त स्थिर होण्यास मदत होते. ध्वनी आपल्याला शांततेकडून घेऊन जातो. ज्याद्वारे मानसिक समस्यांवर उपचार होतात. जेव्हा आपण सतत काही विचार करीत असतो, तेव्हा आपल्याला मानसिक स्थितीकडे पाहणे व ती समजून घेणे अवघड जाते. मात्र शांतता अनुभवली तर आपण स्वतःला सकारात्मक स्थितीत घेऊन जातो व नवीन ऊर्जा मिळते, असे प्रियांका या वेळी म्हणाल्या.
‘सकाळ’ आयोजित ‘स्वास्थ्यम्’च्या माध्यमातून मला साउंड हीलिंगचा अनुभव घेता आला. हा खूप चांगला अनुभव होता. ध्वनीचे कंपन मी माझ्या सर्व शरीरात अनुभवत होते. त्यातून अगदी शांत वाटले. आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर मानसिक आणि शारीरिक हीलिंगची गरज असते. त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे.
- स्नेहा देवरे, हेल्थ अँड वेलनेस
मी पहिल्यांदाच साउंड हीलिंग कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा खूपच अविस्मरणीय अनुभव होता. ध्वनी सुरू होता तेव्हा मी एका वेगळ्याच जगात गेले होते, असा अनुभव मला आला. मी एका वेगळ्या, शांततेच्या दुनियेत प्रवास करत असल्याची अनुभूती आली. याही पुढे स्वतःचा शोध घेण्यासाठी अशा कार्यक्रमांना येणार.
- नेहा भाले, ज्वेलरी डिझायनर
आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. मात्र मानसिक व भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष नको. मानसिक आरोग्याशी निगडित समस्या उद्भवली आहे. हेच अनेक जण मान्य करत नाहीत. ही समस्या वाढत गेली तर उपचारासाठी मानसोपचार तज्ज्ञ, थेरपिस्ट यांच्याकडे जाण्यास टाळले जाते. याचे मुख्य कारण म्हणजेच समाजाची भीती. मात्र तसे न करता योग्य पद्धतीने चांगले उपचार घ्यावेत.
- प्रियांका पटेल, संस्थापक, साउंड हीलिंग इंडिया
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.