औषधी हिरडा वृक्षाचे प्रमाण होतेय कमी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधी हिरडा वृक्ष

औषधी हिरडा वृक्षाचे प्रमाण होतेय कमी..

कोल्हापूर : स्वास्थ्यसंवर्धक अन्‌ रोगनाशक, औषधात आणि आरोग्य वाढविणाऱ्या द्रव्यात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या हिरडा वृक्षाचे प्रमाण जिल्ह्यातील जंगलात विरळ झाले आहे. शासनाच्या शतकोटी वृक्ष योजनेत तसेच स्थानिक पातळीवर हिरड्याचे संरक्षण अन्‌ संवर्धन केले तर हिरड्याची झाडे अधिक प्रमाणात दिसू शकतील; मात्र एकेकाळी हिरड्याचे प्रमाण जंगलांत खूप होता मात्र सध्या ही स्थिती नाही.

हिरड्यामध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असल्याने चर्म उद्योगात तसेच आयुर्वेदिक औषधांत मोठ्या प्रमाणात वापर होतो. घर बांधणीत लाकूड वापरले जाते. पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील जंगली भागांमधून रस्ते केले गेले. रस्त्याशेजारी असणारी हिरड्याची झाडे तोडली गेली. गवताळ कुरणे, शेताच्या बांधावर, शहरात, गावभागात कोणी हिरड्याचे झाड लावत नाही.

हेही वाचा: ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

हिरडा वृक्ष आजरा, चंदगड, राधानगरी, गगनबाडा, पन्हाळा, शाहुवाडीच्या जंगली भागात दिसतो. पूर्वी स्थानिक लोक वाळलेला हिरड्याच्या बिया गोळा करुन तो आठवडे बाजारात विक्री करत असत. आयुर्वेदिक दुकानांत हिरड्याच्या बिया, पावडर मिळते. असा हा हिरडा परिसरात असावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे.

हिरड्याच्या प्रजाती

पश्‍चिम घाटात फळांच्या रंगावरून हिरड्याच्या सात जाती आहेत. यामध्ये विजया, रोहिणी, पूतना, अमृता, अभया, जीवन्ती, चेतकी; तर बाळ हिरडा, चांभारी हिरडा, सुरवारी हिरडा, रंगारी हिरडा असेही प्रकार आहेत.

औषधी उपयोग

  • पित्त दोष, कफ दोष, वात दोष दूर होतो

  • मधुमेहात उपयोग

  • दात घट्ट होण्यासाठी हिरडा पावडर उपयुक्त

  • अपचन, अतिसार, आंव पडणे, मूळव्याध, भूक न लागणे, अतिघाम येणे, नेत्ररोग, स्थूलता

  • आम्लपित्त, दाह, रक्तपित्त, कुष्ठरोग, इसब, संधिवातज्वर, मूतखडा, उचकी, उलटीवर उपयुक्त

‘‘जंगलांत वृक्षांच्या स्थानिक प्रजातीला बळ देण्यासाठी दरवर्षी रोप निर्मिती केली जाते. यात बेहडा, हिरडा, किंजळ, एैन, आंबा, जांभूळ अशा अनेक वृक्षांचा समावेश असतो. जूनमध्ये ही रोपे जंगलांत लावली जातात. जेणेकरुन स्थानिक वृक्षांचे प्रमाण वाढेल. शासनाच्या शतकोटी वृक्ष योजनेंतर्गत हा कार्यक्रम राबविला जात आहे.’’

- नामदेव कांबळे, सहायक वनसंरक्षक

शहरात किंजळ, बेहडा, अजूर्न आदी वृक्ष दिसतात; मात्र हिरडा दिसत नाही. हिरड्याची बागांत, रस्त्याशेजारी कुणी तो लावलेला पाहायला मिळत नाही. हा वृक्ष फक्त शिवाजी विद्यापीठातील अग्रणी वनस्पती उद्यानात दिसतो. हा बहुगुणी असल्याने शहरात रुजविण्याची गरज आहे.’’

-डॉ. मकरंद ऐतवडे, शरदचंद्र पवार महाविद्यालय.

loading image
go to top