
डॉ. बालाजी तांबे
सृष्टीवरजीव वाढावेत व जीवन नांदावे, असा उद्देश ठेवूनच मुळात सृष्टीची उत्पत्ती केली गेली आहे. छोट्यात छोटा जीव, अगदी कीटकसुद्धा स्वतःचे संरक्षण कसे करायचे याचे ज्ञान घेऊनच जन्माला आलेला असतो. स्वसंरक्षणार्थ काही प्राण्यांच्या त्वचेचा रंग आजूबाजूच्या वातावरणाशी मिळताजुळता झालेला दिसतो, स्थानविशेषानुसार काहींचे डोळ्यांचे वा जबड्यांचे आकार वेगवेगळे झालेले दिसतात. अशा तऱ्हेने स्वसंरक्षणार्थ एक प्रतिकार यंत्रणा जीव स्वतःच तयार करत असतो. खूप खटपटीने एका विशिष्ट प्रकारचे शरीर तयार होऊन त्यात राहून जीव जगू पाहात असतो आणि मृत्यूपासून संरक्षण होण्याच्या हेतूने अनेक योजना आखत असतो. अर्थात या योजना जिवाच्या पलीकडे असलेला आत्मा, म्हणजे परमेश्वरी अंश, त्यात अंकित आणि जन्मजात आलेल्या संकल्पनेप्रमाणे ही सर्व योजना केलेली असते.