हेल्थवेल्थ : सकाळी धावण्याचे फायदे

पहाटे लवकर उठून धावण्याचे अनेक फायदे आहेत. केवळ वजन कमी करण्यासाठी किंवा अधिक सुडौल दिसण्यासाठीच धावण्याचा व्यायाम करावा, असे नाही तर निरोगी राहण्यासाठी धावणे गरजेचे आहे.
Running
Runningsakal

- विकास सिंह, संस्थापक, फिटपेज ॲप

पहाटे लवकर उठून धावण्याचे अनेक फायदे आहेत. केवळ वजन कमी करण्यासाठी किंवा अधिक सुडौल दिसण्यासाठीच धावण्याचा व्यायाम करावा, असे नाही तर निरोगी राहण्यासाठी धावणे गरजेचे आहे. या एकाच व्यायामप्रकारातून विविध प्रकारचे लाभ होतात. त्यांच्याविषयी जाणून घेऊया.

अतिरिक्त ‘फॅट्स’ कमी करण्यासाठी

सकाळी उपाशीपोटी धावताना शरीरात अनेक महत्त्वपूर्ण बदल घडतात. रात्रीच्या जेवणानंतर आपल्या पोटात काही नसते. रात्रभर अन्न पचण्याची क्रिया सुरू असते. त्यानंतर सकाळी काहीही न खाता तुम्ही धावता तेव्हा शरीर ‘फॅट्स’चा वापर ऊर्जेचा पुरवठा करण्यासाठी करते. याला ‘फास्टेड कार्डिओ’ असं म्हणतात. धावण्याच्या व्यायामामुळे तुम्ही इतर व्यायामप्रकारांपेक्षा २० टक्के फॅट्स अधिक नष्ट करता, असेही एका अभ्यासातून सिद्ध झाले आहे.

जास्त ‘स्टेप्स’, जास्त फायदा

सकाळी धावण्याने केवळ कॅलरी कमी होतात असे नाही, तर दिवसभरासाठीचा पुरेसा व्यायाम यातून होतो. सकाळी धावणारे लोक दिवसभर उत्साही राहतात. धकाधकीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना व्यायाम करायला वेळ मिळत नाही. अशा मंडळींनी केवळ धावण्याचा व्यायाम केला, तरी पुरेसे आहे. तेही शक्य नसल्यास वेगात चालणेही फायदेशीर ठरते. यामुळे अनेक विकार होण्याचा धोका टळतो. जेवढे तुम्ही अधिक चालाल, तेवढा अधिक फायदा आहे.

सातत्याचे महत्त्व

आपली जीवनशैली धकाधकीची आहे, हे स्वीकारायला हवे. यामुळे अनेक गोष्टींना वेळ मिळत नाही, हेही खरे. मात्र, एकदा ही गोष्ट स्वीकारली की मग दिवसाची आखणी करताना सर्वांत आधी व्यायामासाठी वेळ काढा. रोज धावण्यासाठीचा वेळ वेगळा काढून त्यानुसार दिवसाचे वेळापत्रक आखले तर, तुमच्या शरीराला त्या व्यायामाची सवय लागेल आणि अपेक्षित परिणाम दिसतील.

मानसिक व भावनिक स्वास्थ्य

धावण्यामुळे केवळ शारीरिक स्वास्थ्य लाभते असे नाही. मानसिक आणि भावनिकदृष्ट्या सक्षम होण्यासही या व्यायामाचा उपयोग होतो. धावताना डोक्यातील नको ते विचार कमी होतात. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. ताण-तणाव कमी होतो. नैराश्‍य जाते आणि उत्साह वाढतो.

नैसर्गिक विविधता

नैसर्गिक विविधता आणि सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी सकाळची वेळ उत्तम असते. रोजचे धावणे तेच असले तरी महानगरातल्या एखाद्या पदपथावरील धावणे आणि पश्‍चिम घाटातील निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत धावणे यात खूप फरक असतो. दुसरी गोष्ट म्हणजे, सकाळी व्यायाम करायला अनेक लोक घराबाहेर पडतात. त्यामुळे नव्या ओळखी होऊन तुमचा ग्रुपही तयार होऊ शकतो.

आरोग्यासाठी फायदेशीर

धावण्याचे अनेक फायदे आहेत. धावण्यामुळे हृदयाचे कार्य अधिक सुरळीत होते. फुप्फुसे सक्षम होतात. हृदयविकाराचा धोका टळतो. चयापचयाची क्रिया अधिक सुरळीतपणे पार पडण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. रक्तदाबाचा त्रास होत नाही. त्यामुळे धावणे हा केवळ व्यायाम नाही, तर ते आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.

सहज, सोपा व्यायामप्रकार

धावणे हा अत्यंत सोपा व्यायामप्रकार आहे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची उपकरणे किंवा विशिष्ट जागा लागत नाही. त्यामुळे अशा या अत्यंत सोप्या व्यायामप्रकाराचा आपण अधिकाधिक फायदा करून घ्यायला हवा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com