

Hidden Salt in Your Snacks
esakal
Truth About Packaged Food: सध्या भारतात तरुणांमध्ये किडनीचे आजार फार वेगाने वाढत आहेत. ज्या वयात किडनीचे आजार होण्याची अजिबात शक्यता नसते, अशा विशी आणि तिशीतील तरुणांना याचा सामना करावा लागत आहे. याचे मुख्य कारण आपल्या जेवणात असणारे मिठाचे अती प्रमाण हे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, एका दिवसात ५ ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. मात्र, सरासरी भारतीय नागरिक दररोज ८ ते ११ ग्रॅम मीठ खातात, जे ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा दुप्पट आहे. हाच अतिरेक तरुणांच्या किडनीवर गुपचूप कसा हल्ला करतोय, यावर वैद्यकीय तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
जेव्हा शरीरात मिठाचे प्रमाण वाढते, तेव्हा शरीर जास्त पाणी साठवून ठेवते. यामुळे रक्ताचे प्रमाण वाढून रक्तदाब (बीपी) वाढतो. सतत वाढलेल्या रक्तदाबामुळे किडनीच्या आतील अतिशय बारीक रक्तवाहिन्या (Glomeruli) खराब होतात. एकदा या वाहिन्या खराब झाल्या की त्या पुन्हा बऱ्या होऊ शकत नाहीत. यामुळे किडनीची कचरा फिल्टर करण्याची क्षमता हळूहळू संपते आणि माणूस क्रॉनिक किडनी डिसीज (CKM) चा शिकार होतो. सुरुवातीच्या टप्प्यात याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने डायरेक्ट किडनी फेल झाल्यावरच रुग्णाला याची माहिती मिळते.