World Cancer Day 2024 : प्रोटाॅन बीम थेरपी म्हणजे काय? भारतात ही सुविधा कुठे उपलब्ध आहे?

आज ४ फेब्रुवारी २०२४ जागतिक कर्करोग दिन. कर्करोगावरील उपचारासाठी सध्या भारतात केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया या उपचार पद्धतीत निश्चित अनेक सुधारणा होत आहेत.
World Cancer Day 2024
World Cancer Day 2024 esakal

रवींद्र मिराशी

आज ४ फेब्रुवारी २०२४ जागतिक कर्करोग दिन. कर्करोगावरील उपचारासाठी सध्या भारतात केमोथेरपी, रेडिएशन, शस्त्रक्रिया या उपचार पद्धतीत निश्चित अनेक सुधारणा होत आहेत. मग सेलिब्रिटी व्यक्ती उपचारासाठी परदेशात का जातात? असा अनेकांना प्रश्न पडतो. तर अद्यावत सुविधांची आपल्या देशात वानवा आहे. आणि सुविधा असल्यास त्या पुरेशा नाहीत.

उदा. आपण 'प्रोटॉन थेरपी' पाहू. आपल्या देशाचा विचार करता कर्करोग रुग्णांसाठी 'प्रोटॉन थेरपी' ही सुविधा प्रथम 'अपोलो प्रोटॉन कॅन्सर सेंटर- चेन्नई' येथे सन २०१९ मध्ये निर्माण झाली.

आपल्या देशात या उपचार पद्धतीची सुविधा प्रथमच उपलब्ध झाल्याने, याचा गाजावाजा होणे सहाजीकच होते. परंतु हे जगातील कर्करोगावर 'प्रोटॉन थेरपी' करणारे ८९ वे केंद्र आहे. यावरून सर्व अंदाज आपल्याला येऊ शकेल.

माझ्या माहितीनुसार ऑस्ट्रेलिया मधून आलेल्या पहिल्या कर्करोग रुग्णावर या केंद्रामध्ये यशस्वी उपचार केले गेले. २०० टन वजनाचे हे 'प्रोटॉन थेरपी' मशीन बेल्जियम मधून आणण्यात आले. हे केंद्र उभारणीसाठी एकूण चार वर्षे लागली. आणि एकूण जवळपास १३०० कोटी रुपये खर्च आला.

World Cancer Day 2024
World Cancer Day 2024 : भारतात झपाट्याने वाढतोय तोंडाचा कर्करोग, 'या' गंभीर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात, कर्करोग रुग्णांची एकूण संख्या विचारात घेता हे एक केंद्र पुरेसे पडेल का? याचा विचार राजकीय नेत्यांपेक्षा अधिक टाटांनी केला. 'टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल' (पनवेल्- खारघर) मध्ये नुकतीच 'प्रोटॉन बीम थेरपी' ही देशातील दुसरी सुविधा निर्माण करण्यात आली.

या पद्धतीने कर्करोग रुग्णाला कर्करोग मुक्त करावयाचे झाल्यास ऐकिवात असलेला खर्च जवळपास एक कोटी रुपये येऊ शकतो म्हणे. अर्थात या पद्धतीमध्ये शारीरिक नुकसान कमीत कमी होते. परंतु गोरगरिबच काय चांगल्या नोकरदारांना देखील हा खर्च परवडणे शक्य नाही.

या पद्धतीने टाटा हॉस्पिटलमध्ये वर्षाला ९०० रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. याच केंद्रामध्ये वर्षाला साडेचारशे गरीब रुग्णांना मोफत उपचार दिले जातील, असे केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी मध्यंतरी सांगितल्याचे स्मरते.

विविध मोठ्या स्मारकांमध्ये एका बाजूला अशा सुविधा कर्करोग रुग्णांसाठी आपण आपल्या देशात निर्माण करू शकलो तर ! कर्करोगासाठी भारांकित असलेला 'प्रोटॉन' या मूलकणाच्या वापराची संकल्पना प्रथम सन १९४६ मध्ये प्राध्यापक विल्सन यांनी मांडली.

या कल्पनेप्रमाणे तसा योग्य प्रवेग बांधून 'लॉरेन्स बर्कली नॅशनल लॅबोरेटरी - अमेरिका' येथे पहिल्या रुग्णावर सन १९५४ मध्ये, (३४० मेगा इलेक्ट्रॉन होल्ट, प्रोटॉन बीमसह क्रॉस -फायरिंग तंत्र वापरून) प्रोटॉन थेरपीने प्रायोगिक उपचार करण्यात आले.

इलेक्ट्रॉन पेक्षा प्रोटॉनचे वस्तुमान १८३६ पट अधिक असल्याने, प्रोटॉनची मात्रा अधिक प्रभावी ठरली. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान कमी असल्याने त्वचेच्या पृष्ठभागावरच अधिक ऊर्जा विसर्जित होते.

मात्र, या कारणाने त्वचेच्या कर्करोगासाठी इलेक्ट्रॉनचा उपयोग प्रभावी ठरला. ज्यांना न्यूक्लिअर फिजिक्स मधील पितामह म्हटले जाते, ते ब्रिटिश भौतिक शास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी सन १९२० मध्ये अणूचा उपकण प्रोटॉनचा शोध लावला.

जो धनभारांकित असतो. सन १९९४ मध्ये जपानी शास्त्रज्ञांनी कार्बन धनभारित मूलद्रव्याचा (कार्बन आयन) वापर प्रथम सुचवला. कार्बन आयन चिकित्से मध्ये कर्करोग पेशींच्या केंद्रकामधील सिंगल ऐवजी डबल स्ट्रॅन्ड डीएनए तोडले जातात. आणि एकदा का यामध्ये यश आले की, अशा पेशी पुनर्जीवित होण्याची सुतराम शक्यता नसते.

मात्र कर्करोग पुढच्या टप्प्यात गेल्यास, शक्तिशाली गॅमा किरणांचा मारा करण्यामध्ये सुद्धा मर्यादा येतात. सन २०१६ मध्ये कर्करोगासाठी 'बोरॉन - न्यूट्रॉन' चिकित्सेचा बोलबाला संशोधकांनी केला. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, क्ष, गॅमा, कार्बन अशा किरण व मूलकणांच्या वापरा बरोबरच भारांकित नसलेल्या न्यूट्रॉनचा वापर करण्यात आला. 'बोरॉन- १०' केवळ कर्करोगाच्या गाठीत आणि पेशीतच शोषले जाते. हा खूपच मोठा फायदा म्हणावा लागेल.

यावर न्यूट्रॉनच्या अचूक मारा केल्यास परस्पर अभिक्रिया घडून अगदी उचित स्थळी ऊर्जा विसर्जित होते. यामुळे ॲडिनो, कार्सिनोमा, सार्कोमा, मॅलिग्नंट, मेलेनोमा सारख्या अतिजहाल विषारी कर्करोगाच्या पेशी समूळ नष्ट होतात. यावर शास्त्रज्ञांचे प्रयोग सुरू आहेत.

न्यूट्रॉनचे वस्तुमान इलेक्ट्रॉनपेक्षा १८३९ पटीने अधिक असल्याने तो प्रभावी ठरतो. यामध्ये सुद्धा प्रोटॉन थेरपी प्रमाणेच चांगल्या पेशींचा नायनाट होत नाही. (सध्याच्या रेडिएशन पद्धतीमध्ये 'क्ष' किरणामुळे चांगल्या पेशींचे नुकसान होते.) आपल्या देशातील कर्करोग रुग्णांसाठी या सुविधांची आपण प्रतीक्षा करू.

World Cancer Day 2024
World Cancer Day 2024 : भारतीय महिलांना या 5 प्रकारच्या कर्करोगांचा सर्वाधिक धोका, असा करा बचाव

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com