Health News : दुर्धर आजारांच्या विळख्यात महिला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Health News

Health News : दुर्धर आजारांच्या विळख्यात महिला

मुंबई : ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित'' या राज्य सरकारच्या अभियानात राज्यातील महिला दुर्धर आजाराच्या शिकार होत असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना मधुमेह, उच्च रक्तदाबासह कॅन्सर सारख्या आजाराचा विळखा पडत असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.

राज्यात सर्वच जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने ही मोहीम सुरू आहे. या मोहिमेला शहरी भागात फारसा प्रतिसाद दिसत नसला तरी ग्रामीण भागात मात्र मोठ्या संख्येने महिला सहभागी होत आहेत. या तपासणी मोहिमेदरम्यान उच्च रक्तदाब, मधुमेह यामागची अनेक कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक कारणे असल्याचे तज्ञांचे मत आहे.

एक लाख महिला मधुमेहग्रस्त

मोहिमेअंतर्गत १ नोव्हेंबरपर्यंत १८ वर्षांवरील दोन कोटी २५ लाख १२ हजार ७१८ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये एक लाख ५५ हजार ६८३ महिलांना मधुमेहाचे निदान झाले तर दोन लाख ६२ हजार ७९६ महिला उच्च रक्तदाब, १७ हजार १९१ महिलांना हृदय विकार जडला आहे. याशिवाय २९ हजार ८०८ महिलांमध्ये कर्करोगाची चिंताजनक लक्षणे आढळून आली आहेत.

तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक

तपासणीत महिलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे. राज्यात ९२५ महिलांना धोकादायक स्वरूपाचा तोंडाचा कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी ४९३ महिला रुग्णांवर सरकारने तातडीने उपचार सुरू केले आहेत. तोंडाचा कर्करोग आढळलेल्या सर्वाधिक महिला ७७० महिला एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. स्तनाचा कर्करोग उद्‍भलेल्या २२९ महिलांचे निदान झाले असून २१५ रूग्ण महिलांवर उपचार सुरू केले आहेत.

महिलांमधील विकार

  • १,५५,६८३ - मधुमेह

  • १७,१९१ - हृदय विकार

  • २,६२,७९६ - उच्च रक्तदाब

  • २९,८०८ - कर्करोग

कोरोनासारख्या महासाथीनंतर प्रत्येक कुटुंबात विविध समस्या निर्माण झाल्या. याचाच ताण आणि तणाव महिलांच्या आरोग्यावर पडला आहे. कुटुंबाची काळजी घेणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी महिला सुरक्षित मोहिमेतून सरकार घेत आहे. यात सर्वाधिक महिलांनी सहभागी व्हावे.

- तानाजी सावंत, आरोग्यमंत्री