

Mother's Milk
Sakal
डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ
एक ते सात ऑगस्ट हा ‘जागतिक स्तन्यपान सप्ताह’ म्हणून पाळला जातो. यंदाच्या सप्ताहाचे ब्रीदवाक्य ‘स्तन्यपानाला प्राधान्य द्या; शाश्वत आधार प्रणाली तयार करा,’ अशी आहे.
बाळाला निरोगी ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे स्तन्यपान. पहिले सहा महिने केवळ मातेच्या दुधाचा वापर केला, तर आपण लाखो बालकांचे प्राण वाचवू शकू. स्तन्यपानाचे महत्त्व सर्वश्रुत आहे. पहिल्या दोन वर्षांखालील मुलांचे आजारी पडण्याचे व मृत्यू पावण्याचे प्रमाण त्यामुळे कमालीचे कमी होते. स्तन्यपानाने बाळाचे पूर्ण पोषण होते, रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते, निरोगी वाढ आणि विकास होतो. आई व मुलामध्ये अनोखे नाते निर्माण होते. स्तन्यपान आईच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते. प्रसूतीनंतर लवकर बरे होण्यास तिला मदत होते आणि काही विशिष्ट आजारांचा दीर्घकालीन धोका कमी होतो. स्तन्यपान हे मेंदूच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे लहानपणी अथवा प्रौढावस्थेतही लठ्ठपणा येत नाही आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, वेगवेगळ्या कॅन्सरपासून बचाव होतो.