Yearly Horoscope 2025 -2026
Esakal
मेष
गु रू व शनी या दोन्ही ग्रहांची साथ मिळेल. पण स्वच्छंदी व मनाप्रमाणे वागण्याचा तुमचा स्वभाव आहे; अशा वर्तणुकीला प्रतिबंध घालावा लागेल. अडचणींना खेळकरपणे तसेच बेडरपणे तोंड देतच हिमतीने मार्ग काढावा लागेल. एकदम उतावीळपणे कोणतेच निर्णय घेऊ नका.
एप्रिल-मे आणि जुलै-ऑगस्ट २०२६मध्ये नोकरीत बदल करण्याचे विचार मनात येतील, पण तो मोह टाळा. कामानिमित्ताने नवीन ओळखी व हितसंबंध जोडले जातील. प्रवास घडेल. महत्त्वाच्या कामाची जबाबदारी वरिष्ठ तुमच्यावर सोपवतील, त्यामुळे कामे काटेकोरपणे करा.
धंदा-व्यवसायातले नवीन व्यवहार व गुंतवणूक यासंबंधी महत्त्वाचे व्यवहार नोव्हेंबर-डिसेंबर २०२५मध्ये करू नयेत. भागीदार किंवा सहकारी मंडळींवर अविश्वास दाखवल्याने कोणताच फायदा होणार नाही, तरी त्यांना विश्वासात घ्या. त्यांच्या हुशारीचा फायदा घेऊन उद्योगात वाढ करता येईल. त्यासाठी २०२६च्या मार्च-एप्रिलमध्ये योग्य पावले उचलाल. संकल्पित योजना ऑगस्टनंतर वाढीस लागतील. दिवाळीच्या मुहूर्तावर एखादा छोटासा प्रकल्प हाती घ्याल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत संयम राखावा. तसेच महिलांनीही विशेष संयमाने कामे करावीत. विशेषतः राजकारण व सामाजिक कार्यात स्वतःला फारसे गुरफटून घेऊ नये. आरोग्य चांगले राहील. पुढील वर्षाअखेरीस म्हणजेच नोव्हेंबर-डिसेंबर २०२६मध्ये विवाहाचे बेत करा. विशेषतः फेब्रुवारी ते जुलैपर्यंत शुभकार्याचा विचार नको. घरातील वयस्कर व अनुभवी मंडळींचा सल्ला घेतल्याखेरीज घर व स्थावर मालमत्ता करण्यासंबंधी विचार नको. तरुणांनी ज्येष्ठांच्या अनुभवाचा फायदा घ्यावा आणि घरगुती समस्येवर तोडगा काढावा. उगाच संघर्ष वाढवू नये.
वृषभ
या राशीच्या लोकांसाठी संमिश्र ग्रहमानाचे वर्ष आहे. नेहमी स्वतःसंबंधी विचार करणे आणि स्वतःचेच हीत जपणे हा या राशीचा स्वभाव आहे. पण यंदा दुसऱ्याचा विचार करून वागावे लागणार आहे. शत्रूपक्षाकडून त्रास होईल असे नाही, परंतु त्यांचे मोहरे लक्षात घेऊन तुम्हाला पावले टाकावी लागणार आहेत. त्यामुळे जपून रणनीती आखावी. अर्थात स्वतःची क्षमता ओळखूनच तुम्ही कार्य हाती घ्याल. अनाठायी कामे अंगावर घेऊ नयेत.
नोकरीसाठी फेब्रुवारी, एप्रिल व मे २०२६ हा विशेष अनुकूल काळ आहे. याच काळात बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदारांनी नोकरीत यंदा फार मोठा बदल करू नये, संयम राखावा. दिलेले काम प्रामाणिकपणे करावे. उद्योग-व्यवसायात मोठे प्रकल्प हाती घ्याल, तेव्हा नवीन भागीदार घेण्याचा मोह होईल, पण तो टाळा. कारण तेच डोईजड होऊन बसण्याची शक्यता आहे. पुढील वर्षीच्या एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत भागीदारीचे व्यवहार जपून करा. पैशाचे फार मोठे करारमदार करताना अगर नवीन गुंतवणूक करताना २०२६च्या एप्रिल, मे आणि जुलै या महिन्यांत अडचणी जाणवतील. नंतर मात्र सुरळीत सुरू राहील.
कलाकार, नट वगैरे मंडळींना प्रसिद्धी मिळवण्यास चांगला काळ आहे, त्यामुळे त्यायोग्य प्रयत्न करावेत. फेब्रुवारी ते मे २०२६ हा काळ विशेष अनुकूल राहील. एकंदरीत ग्रहमान वर्षभर उत्साही राहील.
महिलांना कलाक्षेत्रात अधिक प्रगती करता येईल, एवढेच नव्हे, तर स्वतःच्या छंदाचा पाठपुरावा करता येईल. त्यात मजेत वेळ जाईल. सामाजिक क्षेत्रातही त्यांना मानाचे स्थान मिळेल. विवाहोत्सुक तरुण मंडळींना आपले जोडीदार निवडण्यात यश मिळेल. त्यांनी २०२६च्या फेब्रुवारीच्या आत नाहीतर जुलैनंतर विवाहबद्ध होण्याचे ठरवावे आणि जबाबदारीची जाणीव ठेवावी. विद्यार्थ्यांना परदेशी जाण्याची मनीषा पूर्ण करून घेता येईल. पण नेटाने कष्ट करावेत. जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑगस्ट या महिन्यांमध्ये या राशीच्या सर्वांनीच आरोग्याची काळजी घ्यावी. या काळात जुनी दुखणी व मनस्ताप असा दुहेरी त्रास सहन करावा लागणार आहे, त्यामुळे संयम राखा आणि लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
मिथुन
संपूर्ण वर्ष दशमात राहणार असणारा शनी तुम्हाला विविध प्रकारे फलदायी ठरावा. तुमची महत्त्वाकांक्षा वाढेल, त्यामुळे उत्साहात कार्यरत राहाल. दूरदृष्टी ठेवून व आलेल्या संधीचा फायदा घेऊन पुढे जाणे हेच धोरण ठेवाल. विशेषतः हाती घेतलेल्या कोणत्याही कामाच्या बाबतीत अधिक स्थिर होऊन त्याचा अजून कशाप्रकारे विस्तार करता येईल याचा सतत विचार कराल.
नोकरदार मंडळींच्या जबाबदार भूमिकेची यंदा चांगलीच दखल घेतली जाईल. त्यांना बढती मिळेल. कामानिमित्ताने फिरतीची कामेही करावी लागतील. येणारे वर्ष उत्तम प्रगतिकारक राहील. त्याचा योग्य फायदा करून घ्या. तरुण मंडळींना उद्योगधंद्यात आपला जम बसवणे शक्य होईल. तर अनुभवी कारखानदार व व्यापाऱ्यांना व्यवसायाची अनेक दालने खुली करता येतील. उद्योग किंवा व्यवसाय करणाऱ्या मंडळींना विविध प्रकारचे उत्पादन करून दाखवता येईल, चांगली संधी मिळेल. एप्रिल ते जुलै २०२६ या काळात गुंतवणूक करताना सर्वसमावेशक विचार करून जपून गुंतवणूक करावी. नोकरदार व कामगारवर्गास आपलेसे करून विश्वासात घेऊन त्यांच्या कर्तृत्वाला वाव द्यावा. नट, कलाकार, लेखकांना आपापल्या क्षेत्रात नावलौकिक मिळेल. त्यांना त्यांनी केलेल्या कष्टांचे फळ मिळेल. महिलांना विविध व्यवसायातून पैसे मिळण्याच्या संधी आहेत, व्यवसायातून त्यांना स्वतःचे कर्तृत्व दाखवता येईल, मानसिक समाधान लाभेल. विद्यार्थ्यांची संशोधन क्षेत्रात प्रगती होईल. खचून न जाता काम सुरू ठेवावे.
फेब्रुवारी-मार्च २०२६ या सुमारास घरात एखादा शुभसमारंभ ठरेल. नवीन वस्तू खरेदी कराल. तरुणांचे विवाह मात्र वर्षाअखेरीस म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर २०२६मध्ये जमून येतील. नवीन वास्तूचा विचार करणार असाल, तर त्यासाठी ऑगस्ट-सप्टेंबर २०२६चा काळ अनुकूल आहे. सहज योग जुळून येण्याची शक्यता. करमणूक किंवा मनोरंजनाकरिता, प्रवासासाठी ऑगस्ट-सप्टेंबरचा काळ योग्य राहील. आरोग्याबाबत काळजी घ्यावी. कारण २०२६च्या सुरुवातीसच म्हणजे जानेवारी आणि मे-जून या महिन्यांत प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील. दुर्लक्ष करू नका.
कर्क
यं दा गुरूचे भ्रमण राशीत राहणार आहे, तसेच थोडा काळ व्ययातही राहणार आहे. तसेच शनी भाग्यात राहणार आहे. त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे अनेक मनोकामना बऱ्याच अंशी पूर्ण होतील. नोकरीत बढती मिळेल. दिवाळीनंतर चांगली बातमी कळेल, पण लगेच हुरळून जाऊ नये. उद्योग-व्यवसायात प्रगती होईल, मात्र पैशाचे नवीन मोठे व्यवहार करताना २०२६च्या फेब्रुवारी, एप्रिल, जून, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये विशेष काळजी घ्या. त्यावेळी मोठे धाडस टाळा. विचारपूर्वक निर्णय घेतल्यास फायदा होईल. भागीदारीत नवीन व्यवहार या काळात नकोच. मार्च २०२६पर्यंत व्यवसायात भरभराट होईल. ऑगस्टनंतर व्यवसायात वाढ करणे अजून सोईस्कर व यशदायक ठरेल.
सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना बहुमान मिळेल. त्यांचे कौतुक होईल. संशोधन क्षेत्रातील महिलांना तसेच विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळवून परदेशी प्रवास करणे शक्य होईल. त्यासाठी खचून न जाता प्रयत्न करावेत. विद्या, अभ्यास व संशोधन वगैरे कार्याला मूर्त स्वरूप येण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्या दिशेने पावले उचलावीत. घराची आणि स्थावर मालमत्तेची कामे करताना शक्यतो संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करा. दोन पिढ्यांतील अंतर बाजूला ठेवून, ज्येष्ठांना व तरुणांना एकमेकांचे विचार समजून घ्यावे लागतील आणि त्यानुसारच वागावे लागणार आहे. तरच नवीन वास्तूचे मनोरथ पूर्ण होईल. नाहीतर वादविवादामुळे व्यवहार अडकून राहतील. मार्च ते जून २०२६ हा काळ सोडून यासंबंधीचे व्यवहार करण्याचा विचार करा. म्हणजे घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील व सर्वांनाच त्याचा आनंद मिळेल.
विवाहोत्सुक मंडळींचे विवाह ठरतील. त्यांच्या लग्नाचे मुहूर्त नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ किंवा ऑगस्ट २०२६नंतर काढावेत. फेब्रुवारी, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. कोणतेही दुखणे अंगावर काढू नये, त्याचा तुम्हालाच मनस्ताप होईल हे लक्षात ठेवावे. मुळातच मानी, हटवादी आणि अहंमन्य स्वभावाला पूरक ग्रहमान आहे. मात्र आडमुठेपणा व ताठपणा कमी केलात तर फायदा तुमचाच होईल. तुमचे महत्त्व इतरांना कळून येईल. इतरांकडून जास्तीत जास्त सहकार्य कसे मिळवता येईल हे लक्षात घ्या. वर म्हटल्याप्रमाणे उगाच आडमुठेपणा न करता वर्ष सुखाने घालवण्याचा प्रयत्न करा.
सिंह
शनी आणि गुरूसारखे महत्त्वाचे ग्रह तुम्हाला साथ देणारे आहेत, त्यामुळे चिंता नसावी. नोकरदार मंडळींना नोव्हेंबर २०२५ किंवा जानेवारी किंवा मे २०२६ महिन्यात बढती मिळण्याची शक्यता; प्रयत्नांमध्ये कसूर ठेवू नये. धंदा-व्यवसायात आपल्या क्षेत्रात थोडा-अधिक बदल करण्याची आवश्यकता. बदल करून अधिक अर्थलाभ मिळवण्याचा प्रयत्न राहील. स्वतःबरोबर इतरांचीही प्रगती कराल. व्यापार व उद्योग क्षेत्रात नवे दालन खुले करून अनेकांना कामे मिळवून द्याल. त्यामुळे त्यांचे व्यवसाय भरभराटीस येतील. फक्त २०२६मधील मार्च व जुलैच्या सुमारास मोठी गुंतवणूक करू नये. काळजीपूर्वक व विचारपूर्वक निर्णय घ्यावेत, उतावीळपणे व्यवहार करू नयेत. आर्किटेक्ट, प्राध्यापक आणि शिक्षकांना येत्या वर्षात अधिक अर्थलाभ व्हावा, असे ग्रहमान आहे. त्याचा फायदा घ्यावा.
महिलांना कर्तृत्व दाखवता येईल आणि त्यांच्या कामाची प्रशंसाही होईल. विद्यार्थ्यांना जबाबदारीची भूमिका पार पाडावी लागेल. तुम्ही अनेक दिवस पाहिलेले नवीन वास्तूचे स्वप्न साकार होण्याचा काळ आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन घर खरेदी करण्याचे ठरवाल व त्यासाठी आवश्यक गुंतवणुकीची आधीपासून तयारी कराल. स्थावर मालमत्तेचे व्यवहार ऑगस्ट २०२६नंतर होतील. मनाप्रमाणे व्यवहार झाल्याने समाधानी राहाल. घराची उत्तम सजावट कराल, त्यासाठी विशेष कष्ट घ्याल. घरातील शुभकार्य ठरेल, ते जबाबदारी पार पाडाल. त्यात सहकार्य मिळेल. २०२६मध्ये आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात, त्यामुळे प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. जानेवारी, मार्च, एप्रिल व जुलैअखेर प्रकृतीच्या तक्रारी जाणवल्या तर त्यांकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच संशोधकांना कामासाठी परदेश दौरा करणे यावर्षी शक्य होईल, संधी दवडू नये. सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांचे महत्त्व वाढेल. त्यांना मानसन्मान, पुढारीपण भूषविता येईल. नावीन्याच्या, सुखासीनतेच्या कल्पना साकार करण्याचा तुमचा आटोकाट प्रयत्न राहील. स्वतःची मते ठाम राहतील. महत्त्वाकांक्षी व परखड निर्णय घ्याल. उदार हाताने देत राहाल व स्वतःही उपभोग घ्याल.
कन्या
शनी तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणणार आहे. दशमात व लाभात राहणार असणारा गुरू योग्य त्या वेळी अनुभवी व पारंगत मंडळींचे सहकार्य मिळवून देईल. त्याचा तुम्हाला फायदाच होईल. तुमच्यावर जबाबदारी आहेच, पण त्यापायी होणारी धावपळ आणि कुचंबणा कमी होईल. उत्पन्नात निश्चितता येईल व त्यामुळे वर्षातील कार्यक्रमांची चौकट निश्चित करता येईल. विविध प्रकारची जबाबदारी पार पाडावी लागेलच, त्यातून सुटका नाही. पण त्यातूनच मानसिक समाधान मिळेल.
तुमचे व तुमच्या कामाचे महत्त्व कळाल्याने नोकरदारांना जबाबदारीची जागा मिळेल, महत्त्वाची कामे सोपवली जातील. डिसेंबर २०२५ किंवा फेब्रुवारी अथवा जून २०२६मध्ये बदलीची बातमी कळेल. मिळालेल्या संधीचे सोने कराल. धंदा-व्यवसायात जाहिरातीच्या नवीन तंत्राचा उपयोग करून उद्योग वाढवू शकाल. फेब्रुवारी ते जुलै २०२६ या काळात गुंतवणूक आणि पैशाचे व्यवहाराच्या बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगावी, तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत, नुकसानकारक ठरू शकतील. एखाद्या संस्थेत सेवाभावाने काम करणाऱ्या मंडळींचे भाग्य उजळेल. त्यांच्या जबाबदार भूमिकेचे चीज होईल. त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. संशोधन, कुशल संघटक, मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तींना हे वर्ष प्रगतीचे जाईल. त्यांचा गौरव होईल. विद्यार्थ्यांना परदेशी प्रवासाकरिता शिष्यवृत्ती मिळेल, ही संधी विद्यार्थ्यांनी दवडू नये. कष्ट केलेत तर विजयश्री खेचून आणाल. राजकारणी, समाजसेवक, तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना सुवर्णसंधी मिळेल. ती वाया जाऊ देऊ नका. महिलांना कलाक्षेत्रातील दालनात मनमुराद प्रगती करून दाखवता येईल. कामाचे कौतुक होईल, पण हुरळून जाऊ नका, वर्तणूक नम्र ठेवा. २०२६च्या मार्च-एप्रिल व जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये स्वतःच्या प्रकृतीला पेलतील अशाच जबाबदाऱ्या स्वीकारा. डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६च्या सुमारास अनुकूल काळ आहे, त्यामुळे स्थावर घर किंवा फ्लॅट यासंबंधित गुंतवणूक अथवा व्यवहार करा, म्हणजे २०२६च्या दिवाळीत नवीन घरात गृहप्रवेश करता येईल.
विवाहास व शुभकार्ये जानेवारी, मार्चसह २०२६च्या उत्तरार्धात साजरी होतील. तरुण मंडळींना अपेक्षित वधू-वरांची निवड मनाप्रमाणे करता येईल. गेल्यावर्षीपेक्षा हे वर्ष निश्चित सुखाचे व भरभराटीचे जाणार आहे.
तूळ
शनीसारख्या ग्रहाची अनुकूलता तुम्हाला लाभणार आहे, तसेच गुरूचीही साथ मिळणार आहे. त्यामुळे गेल्या दोन-अडीच वर्षांतील कसर येत्या वर्षात निघणार आहे. फेब्रुवारी ते जुलै २०२६ या कालावधीत महत्त्वाची कामे जपून आणि विचारपूर्वक करा. जुलैनंतर मनाप्रमाणे प्रगती होईल. नोकरदारांना ऑगस्ट २०२६मध्ये बढतीसाठी पोषक ग्रहमान आहे, त्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. धंदा-व्यवसायात प्रयत्न करत राहा, त्या प्रयत्नांना यश येईल. तुमचा व्यवसाय नावारूपाला येईल आणि संधींची नवीन दालने खुली होतील. कारखानदारांना नवीन निर्मिती करण्यास वाव मिळेल, संधी दवडू नका. विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न साकार होण्याची शक्यता आहे. संशोधन क्षेत्रातील व्यक्तींना योग्य वेळ येताच परदेशगमनाची संधी मिळेल. समाजकार्यात कार्यरत असणाऱ्या महिलांना मनाजोगते काम करता येईल, त्या कामाचे समाधान लाभेल. अनेक दिवसांपासून मनात असलेल्या सुप्त इच्छा-आकांक्षा पूर्ण करता येतील. २०२६च्या एप्रिल, मे, जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांमध्ये प्रकृतीच्या नेहमीच्या तक्रारी वाढतील. त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. वृद्धांनी आरोग्यासंबंधी अधिक काळजी घ्यावी.
मे-जून २०२६च्या सुमारास घरात विशेष चांगली घटना घडेल. लांबलेली शुभकार्ये पार पडतील. कुटुंबासमवेत मजेत प्रवास घडेल. होतकरू तरुणांसाठी चांगले ग्रहमान आहे. विवाहोत्सुक मंडळींना योग्य जोडीदार भेटेल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये स्वतःच्या वास्तूसंबंधी नेटाने प्रयत्न करा. त्याकरिता केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल. एकंदरीत हे वर्ष भरभराटीचे व सुखदायक, भाग्यकारक व प्रसिद्धी मिळवून देणारे राहील.
वृश्चिक
संपूर्ण वर्षभर शनीचे भ्रमण पंचमस्थानात राहणार आहे, त्यामुळे तुमच्या मानी व अहंमन्य स्वभावाला थोडी मुरड घालावी लागणार आहे. पण गुरू तुमच्या सहाय्याला धावून येणार आहे. तो तुमच्या बऱ्याच अंशी इच्छा पूर्ण करणार आहे. आलेल्या संधीचा फायदा जास्तीत जास्त कसा करून घेता येईल याचा सतत विचार करावा लागेल. नोकरीतील तुमच्या वरिष्ठांची तुमच्यावर मर्जी राहील. त्यामुळे जबाबदारीही वाढेल आणि अधिकारही मिळतील; त्यांचा दुरुपयोग करू नका. नोकरीत बढती मिळेल. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत अनेक कामे यशस्वी कराल.
धंदा-व्यवसायात २०२६च्या जानेवारी, फेब्रुवारी किंवा ऑगस्टच्या सुमारास तुमचे महत्त्व वाढेल. विविध उद्योगांत जम बसवून नावलौकिक मिळवाल. कारखानदार व नवीन उद्योगपतींना सहकारी कामात निश्चित मदत करतील. त्यामुळे उत्साह वाढेल व नवीन योजना साकार करण्याचा प्रयत्न कराल. जुलै२०२६नंतर कामाला अधिक गती येईल. प्राध्यापक, शिक्षक, सेनादलांतील अधिकारी वगैरे मंडळींसाठी हे वर्ष चांगले ठरेल. विद्यार्थ्यांना यंदा अपेक्षित यश मिळेल. महिलांना सामाजिक व कला क्षेत्रात प्रगतिपथावर राहणे शक्य होईल. एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये प्रकृतिमान नाजूक राहील. विशेषतः जुनी दुखणी असलेल्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दुर्लक्ष करू नये. तरुणांसाठी लाभदायक ग्रहमान आहे. विवाहोत्सुक मंडळींना मनाप्रमाणे जोडीदार निवडता येईल.
दिवाळीचे मुहूर्तावर नवीन खरेदीचे बेत साकार होतील. मात्र नवीन वास्तू खरेदी करण्याचा विचार असेल तर जानेवारी-फेब्रुवारी २०२६मध्ये किंवा जुलै २०२६नंतर त्याचा विचार करा. मात्र त्याआधी अनुभवी ज्येष्ठांचा सल्ला घ्या. अनुभवी व्यक्तींचा सल्ला नेहमीच उपयुक्त ठरतो हे लक्षात ठेवा. एकंदरीतच हे वर्ष पुष्कळच सुखावह जाईल.
धनू
यंदा शनी वर्षभर चतुर्थात असणार आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत जे संकल्प सोडलेत ते सिद्धीस जाण्याचे मार्ग मोकळे होतील. सप्तम स्थानात असलेला गुरू पुढील वर्षात तुमच्या कार्याला मूर्त स्वरूप देईल. एकंदरीत हे वर्ष म्हणजे तयारीचा काळ असेल, पण त्याच वेळी काही योजना फलद्रूपही होतील. नोकरीत बदल किंवा बदलीसाठी इच्छुक असाल, तर मार्च ते जून २०२६ हा कालावधी चांगला राहील. आत्ताच्या नोकरीत तुमचे महत्त्व वाढेल. परिणामी वरिष्ठ तुमच्यावर महत्त्वाच्या कामाची जबाबदारी सोपवतील, आणि विशेष अधिकारही देतील. पण त्याचा गैरफायदा घेऊ नका, नुकसान होईल. उद्योजक, कारखानदार मंडळींना नवे व्यवसाय सुरू करण्यासाठी पोषक ग्रहमान आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायाची नवी दालने खुली करून उत्पादनात वाढ करणे शक्य होईल.
फेब्रुवारी ते जुलै २०२६ हा काळ मात्र कटकटीचा वाटेल. भागीदारीसंबंधीचे करारमदार स्पष्ट असावेत. गुंतागुंत नको. तसेच एप्रिल व जुलै २०२६ या काळात सुमारास अतिमोह टाळणे हिताचे ठरेल. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींसाठी नवीन वर्ष मानसन्मान व प्रतिष्ठा वाढवणारे असेल. या क्षेत्रांत तुमचा नावलौकिक चांगला होईल, कारण लाभदायक ग्रहमान आहे.
महिलांना आवडीचे क्षेत्र खुणावत राहील. आवडीचे काम करता आल्याने समाधानी राहाल. एखाद्या चांगल्या व्यक्तीचे सहकार्य लाभल्याने सर्व कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना सहकार्य मिळेल, त्यामुळे अभ्यासात मदत होईल व यशश्री खेचून आणाल. शिक्षकांचा गौरव होईल, त्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. तरुण उद्योजक मंडळी उद्योगधंद्यात स्थिरावतील. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६ या काळात त्यांचे काम वाढेल, नवीन संधी खुल्या होतील. एप्रिल २०२६ व जुलै-ऑगस्टमध्ये मात्र आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील, त्यांकडे दुर्लक्ष नको.
मार्च-एप्रिल २०२६ या काळात घरात शुभघटना घडण्याची शक्यता. दिवाळीच्या सुमारास घरातील विवाहादी शुभकार्ये पार पडतील व तुमचे जबाबदारीचे ओझे कमी होईल. एकंदरीत वर्ष सुखाचे जाईल.
मकर
येत्या वर्षात शनी तृतीयेत राहणार आहे. त्याचा लाभ होईल. त्यामुळे तुमचे कर्तृत्व अधिकच उजळणार आहे. वर्षाच्या उत्तरार्धात गुरू सप्तमात कर्क राशीत जाईल. त्यानंतर तो तुम्हाला मानमरातब व मोठेपणा मिळवून देईल. संयम ठेवावा.
यंदाच्या दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन कामांचा संकल्प कराल. म्हणजे २०२६च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत तुमच्या उद्योगांना मूर्त स्वरूप येईल. नोकरदार मंडळींना बढती मिळेल. फक्त त्यांनी मार्च ते जुलै २०२६ या काळात कसोशीने जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे, बेफिकीर राहून चालणार नाही, नुकसान होईल. एप्रिल आणि जुलै-ऑगस्टमध्ये काही अडचणी निर्माण होतील. मात्र त्या निभावून न्याल. तुम्ही सतत आर्थिक बाबींबाबत विचार करत असता. येत्या वर्षात उद्योगात, व्यवसायात आमूलाग्र अशी क्रांती करण्याचा विचार राहील. योग्य नियोजन केलेत तो विचार कृती उतरवाल. फलदायी ग्रहमान आहे, त्यामुळे तुमचे प्रयत्न आता यशस्वी होणार आहेत. परंतु निष्काळजी राहू नये.
आर्थिक बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. फेब्रुवारी ते जुलै २०२६ या काळात पैशाचे मोठे व्यवहार व नवे करारमदार नकोत. महत्त्वाचे व्यवहार पुढे ढकलावेत. सामाजिक कार्यात इच्छुक असणाऱ्या महिलांना मनाजोगते काम करता येईल, त्यामुळे समाधान वाटेल. त्याप्रमाणे महिलांना राजकारणातही चांगला वाव मिळेल. नोव्हेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ आणि नंतर ऑगस्ट २०२६च्या पुढचा काळ विशेष उल्लेखनीय राहील, प्रयत्न करत राहावेत. घरातील विवाहादी शुभकार्ये यंदा पार पडतील. मात्र मार्च ते जुलै २०२६ या काळात कार्य ठरवताना सावधानता बाळगा. नीट चौकशी करा. ऑगस्ट २०२६नंतर कामे निश्चितपणे गती घेतील. फेब्रुवारी-मार्चच्या सुमारास घरातील रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागतील. खूप दिवसांपासूनचे नवीन वास्तूचे स्वप्न साकार करण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. त्यासाठीची गुंतवणूक या काळात करू शकाल.
तब्येतीकडे दुर्लक्ष नको. प्रकृतिमान वर्षभर चांगले राहील, त्यामुळे हुरूप वाढेल.
कुंभ
शनी धनस्थानी आला असून गुरू पंचमात आहे. तसेच इतरही ग्रहांची साथ मिळेल. एखाद्या लोकविलक्षण विचाराने भारावून जाऊन संपूर्ण जीवनच उजळून टाकण्याचा, बदलून टाकण्याचा तुमचा प्रयत्न असेल.
नवीन वर्षात नव्या उमेदीने व जिद्दीने कामाला लागाल. आगामी अडीच वर्षे तुमची वाटचाल भरधाव वेगाने होणार आहे. हे वर्ष निश्चितपणे प्रगतिपथावर नेणारे आहे. नोकरदार मंडळींना बढती मिळेल. परदेशी प्रवास करण्याचे विचार फलद्रूप होतील. केलेल्या कष्टांचे चीज होईल. व्यावसायिक व कारखानदार मंडळींना आपल्या उद्योगधंद्याचे तंत्र बदलावे लागेल. नवीन तऱ्हेने जाहिरात करून पैसा तसेच कीर्ती मिळवता येईल व यशप्राप्ती घडेल. पण त्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, आयते यश मिळेल अशी अपेक्षा ठेवू नका.
महिलांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. कला क्षेत्रात आपले कौशल्य प्रदर्शित करता येईल. आवडीच्या क्षेत्रात त्या वाकबगार होतील व मानसन्मान मिळवतील. संशोधक, अभ्यासू व्यक्तींना बहुमान मिळेल. त्यांच्या कामाचे कौतुक होईल, दखल घेतली जाईल. एप्रिल-मे २०२६मध्ये घरात संघर्ष होण्याची शक्यता. कोणत्याही कारणास्तव संघर्ष निर्माण झाला, तरी तो तात्पुरताच ठेवा. उगाच ताणू नका. मिळतेजुळते धोरण सगळ्यांसाठीच फायदेशीर ठरेल. जानेवारी किंवा मे २०२६मध्ये नवीन वास्तूचा विचार करून गुंतवणूक करा. ऑगस्ट २०२६नंतर नवीन घरात वास्तव्य होईल. तोपर्यंत संयम राखा.
विवाहोत्सुक व होतकरू तरुण मंडळींच्या विवाहाच्या वाटाघाटी दिवाळीच्या मुहूर्तावर सुरू करा. ऑगस्ट २०२६नंतर जीवनाचा जोडीदार निवडण्यात यश येईल, तोपर्यंत शोध सुरू ठेवा. जुलै व सप्टेंबर महिन्यात आरोग्याची काळजी घ्या. प्रकृतीच्या काही तक्रारी जाणवू शकतील.
मीन
गुरूची साथ मिळाल्याने गेले काही दिवस ज्या महत्त्वाकांक्षेने भारावून गेला होतात त्या फलद्रूप होतील. राशीतील शनीची सध्यातरी धास्ती घेऊ नका. शनी तुम्हाला योग्य तेथे आवर घालेल.
नोकरदार मंडळींना चांगला काळ आहे. नवीन संधी खुल्या होतील. कामाचा योग्य तो मोबदला मिळेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. उद्योजक, कारखानदार आणि छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या मंडळींचा त्यांच्या नावीन्याच्या कल्पना पूर्ण करून व्यवसायात प्रगती करता येईल. फक्त अनाठायी गुंतवणूक नको. तसेच तुमचा उधळेपणा नको. काळजीपूर्वक खर्च करावा. आपल्या व्यवसायाची जाहिरात जास्त उठावदार कशी होईल याचा विचार केल्यास, मालाला चांगला उठाव येईल. आर्थिक प्राप्ती वाढेल. पण त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिक्षक, प्राध्यापक तसेच समाजकार्य करणाऱ्या मंडळींना बहुमान मिळेल. त्यांच्या कामाची दखल घेतली जाऊन कामाचे कौतुक होईल.
तरुण होतकरू लोकांना आपले स्थान स्थिर करता येईल. फेब्रुवारी ते जुलै २०२६ या दरम्यान अतिधाडस नको. संयमाने कृती करावी. महिला व विद्यार्थ्यांना अनेक संकल्प सिद्धीस नेता येतील. संशोधन क्षेत्रातील स्कॉलरशीप मिळवून ती मंडळी परदेशी जाण्याची तयारी करतील. एप्रिल ते जुलै २०२६ या काळात प्रकृतीच्या तक्रारी राहण्याची शक्यता आहे, तरी आरोग्याची काळजी घ्या. घरात विवाहादी शुभकार्ये ठरतील.
नवीन काहीतरी करून दाखवावे असे विचार सतत मनात येतील व त्यादृष्टीने तुमचे प्रयत्न राहतील. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केल्यास हे वर्ष प्रगतीचे व भरभराटीचे जाणार आहे.
------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.