साप्ताहिक राशिभविष्य : (२९ जून ते ०५ जुलै २०२५)
मित्रांबरोबर गैरसमज टाळाच
मेष : सप्ताह कलाकारांना भाग्यसंकेतच देईल. विशेषतः कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह परिस्थितीजन्य लाभ देईल. घरी बसून ऑनलाइन कामे होतील. भरणी नक्षत्राच्या व्यक्ती व्यावसायिक पातळीवरचे मोठे लाभ उठवतील. ता. १ आणि २ हे दिवस एकूण आपल्या राशीसच अतिशय सुसंगत आणि प्रवाही असे राहतील. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट ग्रासलेली गुप्तचिंता निघून जाईल. पती वा पत्नीचा मोठा भाग्योदय चकित करेल. सप्ताहाचा शेवट विजयी चौकार-षटकारांचा असेल मात्र सप्ताहात मित्रांशी गैरसमज होऊ देऊ नका. राजकारणी व्यक्तींशी शक्यतो संवाद नकोच.
घरातील वाद संपतील
वृषभ : आज राशीत शुक्राचे आगमन होत आहे. सप्ताहात सज्जनांचे सहकार्य लाभेल. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक तेजी प्रसन्न ठेवेल. विशिष्ट बाबतीतले कर्ज मंजूर होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ व २ हे दिवस घरात कार्ये ठरवतील. प्रेमिकांना एकूणच सप्ताह विवाहाकडे मार्गस्थ करेल. काहींचे नूतन वास्तुप्रवेश होतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा सूर्योदय विशिष्ट स्वरूपाचे भाग्यसंकेत देईल. विशिष्ट वाटाघाटी यशस्वी होतील. सहकुटुंब मौजमजेचे योग येतील. घरातील वाद संपतील. नवपरिणितांचे गैरसमज निघून जातील.
सरकारी कामांमध्ये यश लाभेल
मिथुन : सप्ताहातील ग्रहांचे फिल्ड सरकारी कामांतून यश देणारे. ता. ३० आणि १ हे दिवस जनसंपर्कातून लाभ देतील. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा वाव देणारे ग्रहमान आहे. व्यावसायिक क्षेत्रात नवीन पर्याय उपलब्ध होतील. सप्ताहाचा शेवट मोठ्या धनवर्षावाचा असेल. उत्तम वसुली होईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहामध्ये सतत चैनींच्या बाबींवर खर्च होईल. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींचा आजचा रविवार घरात विशिष्ट उंची वस्तूंच्या खरेदीतून साजरा होईल. घरात पाहुण्यांची वर्दळ राहील.
नोकरीत वरिष्ठांवर प्रभाव टाकाल
कर्क : सप्ताहातील एक नशीबवान रास राहील. व्यवसायात तेजी येईल. आजचा रविवार मोठा रंगसंगतीचा राहील. मरगळ जाईल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचे तारुण्य बहरेल. सप्ताहाचा शेवट पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना मोठा दिलासा देणारे ग्रहमान राहील. नोकरीतील शत्रुत्वाच्या झळा कमी होतील. वरिष्ठांवर प्रभाव टाकाल. ता. १ जुलैचा मंगळवार विशिष्ट यशातून चर्चेचा होईल. व्यावसायिक वास्तुखरेदीचे व्यवहार मार्गी लागतील. काहींचा परदेशी शिक्षणाचा प्रश्न सुटेल. परदेशी व्हिसाचा प्रश्न सुटेल.
व्यावसायिक आर्थिक कोंडी जाईल
सिंह : राशीचा मंगळ सप्ताहात चांगले शौर्य गाजवेल. नोकरीतील एक उत्तम पर्व सुरू होईल. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट नव्या धोरणातून लाभ होईल. व्यावसायिक आर्थिक कोंडी जाईल. वादग्रस्त वसुलीतून लाभ होईल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट परदेशी व्यापारातून साथ देणारा. तरुणांना सप्ताहाचा शेवट नव्या नोकरीचे उत्तम पर्याय आणून देईल. लाभ घ्याच. सप्ताहात रेंगाळलेले वास्तुविषयक व्यवहार मार्गी लागतील. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार छान पर्यटनाचा असेल, तसेच उत्सव-समारंभातून मिरवाल.
व्यावसायिक पातळीवर गती येईल
कन्या : आज होणारे शुक्राचे राश्यांतर तत्काळ फलदायी होणारे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक उपक्रमांतून मोठी गती मिळेल. सप्ताह एकूणच तरुणवर्गाला मार्गस्थ करणारा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट विशिष्ट कोर्ट प्रकरण मार्गी लावणारा. नोकरीतील स्थान बळकट होईल. विशिष्ट सरकारी कामे यशस्वी होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. ३ जुलैची दुर्गाष्टमी थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून चमत्कार घडवेल. पती वा पत्नीची गुप्तचिंता जाईल. काहींचे घरात हृद्य आदर-सत्कार होतील.
जुन्या गुंतवणुकीतून लाभ
तूळ : सप्ताह महत्त्वाच्या कामांतून फास्ट ट्रॅकचाच राहील. आजचा रविवार छान मनोरंजनाचा असेल. सप्ताह एकूणच गाठीभेटींतून सुसंवादी राहील. सप्ताहात जुन्या गुंतवणुकींतून लॉटरी लागेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट अतिशय रंगतदार फळे देईल. मोठ्या चैनी-करमणुकींतून आनंद साजरा कराल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ दुखापतींपासून जपण्याचा आहे, काळजी घ्यावी. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींनी आजच्या रविवारी विवाहविषयक गाठीभेटी कराव्याच. आजचा रविवार व्यावसायिकांना छान फलदायी होणारा असेल. जाहिराती यशस्वी होतील.
संततीचे नोकरीचे प्रश्न सुटतील
वृश्चिक : सप्ताहात शुक्रभ्रमणाची रंगसंगती छानच राहील. वैवाहिक जीवनात आनंद साजरा कराल. नोकरीतील विशिष्ट सावट निघून जाईल. बढतीचे संकेत मिळतील. काहींना सरकारी माध्यमांतून लाभ होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर विवाहयोग आहेत. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २ व ३ हे दिवस अतिशय प्रवाही राहतील. व्यावसायिक उपक्रम फलदायी होतील. काहींना राजकीय पुढाऱ्यांकडून लाभ होतील. मुलाबाळांच्या नोकरीचे प्रश्न सुटतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी घरात वरिष्ठांशी वाद टाळावेतच.
मोठ्या सुवार्ता मिळतील
धनु : सप्ताहातील ग्रहांचा ट्रॅक छानच राहील. बुद्धिचातुर्यातून लाभ उठवालच. मात्र सप्ताहाच्या आरंभी धावपळीचा प्रवास टाळावा. आरोग्यविषयक पथ्ये पाळाच. बाकी सप्ताहातील ता. १ ते ३ हे अष्टमीचे प्रभावक्षेत्र पतप्रतिष्ठेचा लाभ देणारेच. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना बुधवार मोठ्या सुवार्तांची परंपरा ठेवेल. विशिष्ट स्वरूपाचे कायदेशीर प्रश्न सुटतील. वास्तुचिंता जाईल. नुकसानीची भीती जाईल. पूर्वाषाढा नक्षत्रास मोठ्या पॅकेजची नोकरी मिळेल. सप्ताहाचा शेवट उत्सव-समारंभातून मिरवणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना दुर्गाष्टमीचा गुरुवार गुरुप्रचितीचाच ठरेल.
वैवाहिक जीवनात आनंदोत्सव
मकर : सप्ताहात तारुण्यातील मस्ती आणि वृद्धांनी वार्धक्यातील कुपथ्ये टाळावीतच. उष्णताजन्य विकारांपासून सावध राहावे. व्यसनी माणसांनी अतिरेक करू नये. सप्ताहात शेअर बाजारातील अतिरेक टाळावा. बाकी सप्ताहातील शुक्रभ्रमणाचा अंडरकरंट घरातील तरुणांच्या संदर्भातून चांगलाच परिणाम दाखवेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना त्याचा परिणाम सुखावेल. नोकरीतील विशिष्ट ताण निघून जाईल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट घरात छान ख्यालीखुशालीचा राहील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना आजचा रविवार वैवाहिक जीवनात विशिष्ट आनंदोत्सव साजरा करेलच.
परदेशात शिक्षणाच्या संधी येतील
कुंभ : सप्ताहात ता. १ ते ३ या दिवसांत अष्टमीच्या प्रभावक्षेत्रात मोठे विजयी चौकार-षटकार मारणार आहात. शततारका नक्षत्राच्या व्यक्ती यशातून प्रकाशझोतात येतीलच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी शिक्षणाच्या संधी प्राप्त होतील. मॅरेज मार्केटमध्ये विवाहेच्छूंचा भाव वाढेल. अर्थातच त्यांना उत्तम नोकरीचा लाभ होईल. सप्ताहात व्यावसायिक प्रकल्प मार्गी लागतीलच. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना एकूणच मोठे परिस्थितीजन्य लाभ उठवता येतील. सप्ताहाचा शेवट मोठी भरारी घेणाराच.
थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील
मीन : सप्ताहातील अष्टमीचे प्रभावक्षेत्र शुभ ग्रहांच्या लॉबीला चांगलेच अनुकूल राहील. सप्ताहात प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळेलच. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट अपयश धुऊन काढता येईल. नोकरीचा प्रश्न सुटेल. आजचा रविवार मोठे भाग्यसंकेत देईल. उत्तरा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह म्हणजे एक पर्वणीच राहील. सप्ताहाचे शिस्तबद्ध नियोजन कराच. यशस्वी व्हालच. नोकरीत कौतुकास प्राप्त व्हाल. सप्ताहात विवाहेच्छूंना मनपसंत स्थळे येतीलच. रेवती नक्षत्रास आजचा रविवार व्यावसायिक लॉटरीचा ठरेल. थोरामोठ्यांच्या गाठीभेटी होतील. राजकीय प्रतिष्ठा वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.