

चीजवस्तूंची काळजी घ्या
मेष : शुक्रभ्रमणाचं एक पर्व राहीलच. शुक्रभ्रमण गृहिणींना प्रसन्न ठेवणारं. ता २४ व २५ हे दिवस शुभग्रहांचे. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना अतिशय शुभदायी. मात्र, अमावास्येचं प्रभावक्षेत्र संमिश्र स्वरूपाचं. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी चीजवस्तूंची काळजी घ्यावी. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना पितृचिंता शक्य.
येणं वसूल होईल
वृषभ : राशीचा मंगळ ऊर्जा देणारा. चातुर्यानं लाभ उठवा! व्यवसायातील येणं वसूल होईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना अनेक बाबतींत अनुकूल ग्रहमान. थोरामोठ्यांच्या ओळखीतून मोठी कामं मार्गी लागतील. ता. २४ व २५ या दिवशी हुकमी कामं होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश. कॅम्पसमधून नोकरी मिळेल. अमावास्येला काळजी घ्या. मानवी उपद्रवाची शक्यता.
अडचणी दूर होतील
मिथुन : हा सप्ताह बराचसा शुभग्रहांच्या ताब्यातीलच! शिक्षण, नोकरी वा विवाह यासंदर्भातील आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींच्या अडचणी एकामागोमाग एक दूर होतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींची अपत्यांविषयीची चिंता दूर होईल. मुलं-बाळं नोकरीत स्थिर होतील. अमावास्येच्या आसपासच्या काळात इजा होणार नाही याची मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी काळजी घ्यावी. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना स्नायुपीडेची शक्यता.
वरिष्ठांची मर्जी राखा
कर्क : या सप्ताहावर शुभग्रहांचं आधिपत्य राहीलच. ता. २४ व २५ या दिवशी मोठे चमत्कार घडतील. पुष्य आणि आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचं विशिष्ट संकट दूर होईल. घरात प्रिय व्यक्तींची कार्ये ठरतील. ता. २५ चा गुरुवार विशिष्ट शुभारंभाचा. मात्र, ता. २६ व २७ या अमावास्येच्या आसपासच्या काळात काही त्रास संभवतो. दक्षता बाळगा. खरेदीत फसू नका. नोकरीत वरिष्ठांची मर्जी सांभाळा.
दैवी प्रचीती येईल
सिंह : ग्रहांचं फील्डिंग अतिशय काटेकोर राहील. धावबाद होऊ नका. सिग्नल तोडू नका. बाकी, बुधाची विशिष्ट स्थिती तरुणांना चांगला वाव देणारी. ओळखी-मध्यस्थीतून नोकरीचा लाभ. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ चा गुरुपुष्यामृत योग दैवी प्रचीतीचा. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यवसायात मोठा लाभ. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात स्नायुदुखीचा त्रास शक्य.
प्रत्येक कामात यश
कन्या : या सप्ताहात जोरदार फलंदाजी राहील. भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवा. ता. २३ ते २५ या दिवशी प्रत्येक कामात यश येईल. हस्त आणि चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यवसायात अपवादात्मक लाभ होतील. पगारवाढीची चाहूल. सरकारी कामं होतील. एखादा भूखंड मिळेल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना अमावास्येच्या आसपासच्या काळात जागरण घडेल. गर्भवतीची चिंता.
मनासारखी नोकरी मिळेल
तूळ : हा सप्ताह अमावास्येकडे झुकणारा. मंगळाच्या पार्श्वभूमीवर फलंदाजीचं फील्ड नाहीच! बाकी, नोकरीत विशिष्ट परिस्थितीजन्य लाभ होतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २५ च्या गुरुपुष्यामृतयोगावर मनासारखी नोकरी मिळेल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना गॉडफादर भेटेल. कलाकारांचा भाग्योदय. अमावास्येच्या आसपासच्या काळात वादग्रस्त गाठी-भेटी टाळा.
उधार-उसनवारी टाळा
वृश्चिक : हा सप्ताह सद्भक्तांना छानच. मात्र, मंगळभ्रमणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय व्यक्तींपासून जरा जपूनच. कागदोपत्री काही घोळ होऊ देऊ नका. उधार-उसनवारी टाळा. बाकी, सप्ताहात शुभग्रहांची ऊर्जा प्रभावीच राहील. अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींच्या भोवती गुरुकृपेचं वलय राहील. ता. २५ चा गुरुपुष्यामृतयोग हा एक दुर्मिळ मुहूर्त असेल. अमावास्येच्या रात्री कुणाशीही वाद घालू नका. निरांजन लावा!
ओळखी-मध्यस्थीतून लाभ
धनू : अमावास्येचा हा सप्ताह उपद्रवमूल्य असलेलाच. अन्न-पाण्यातील व हवेतील संसर्ग टाळा. काटेकोर दक्षता घ्या. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी गर्दीची ठिकाणं टाळावीत. बाकी, सप्ताहातील बुधाची विशिष्ट स्थिती आणि गुरुभ्रमणाची पार्श्वभूमी तरुणांना निश्चितच आश्वासक. ओळखी-मध्यस्थीतून लाभ. संकटविमोचन होईल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक लाभ. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा अमावास्येच्या दिवशी विचित्र कारणासाठी खर्च होईल.
योग्य ठिकाणी बदली
मकर : या सप्ताहात शुभग्रहांची कॅबिनेट्स प्रभावी राहतीलच! ता. २४ व २५ हे दिवस सर्व कामांतून सुसंगत. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत लाभ. योग्य ठिकाणी बदली. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना पुत्रोत्कर्षानं धन्यतेचा अनुभव येईल. प्रेमिकांची वाटचाल उत्तम! अमावास्येचं आवर्त घनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना वादात ओढणारं. मध्यस्थी टाळा.
खरेदी-विक्रीतून लाभ
कुंभ : बुधाची विशिष्ट स्थिती आणि शुभग्रहांची स्पंदनं खेचून उत्तम मार्गक्रमणा कराल. मात्र, सहवासात येणाऱ्या अतिरेकी स्वभावाच्या माणसांचं भान ठेवा. शततारका नक्षत्राच्या कलावंतांचा भाग्योदय. विवाहेच्छूंना अनुरूप स्थळं येतील. व्यावसायिकांचं उत्तम मार्केटिंग होईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीतून लाभ. अमावास्येच्या दिवशी कामगारांना यंत्रपीडेची शक्यता. दक्षता बाळगा.
आनंदोत्सवाचे दिवस
मीन : सप्ताहात राशीचा गुरू ता. २५ रोजी गुरुपुष्यामृत योग साजरा करणार आहे. त्यामुळेच त्याच्या आजूबाजूचे दिवसही विशिष्ट यशाच्या आनंदोत्सवाचे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती ‘मॅन ऑफ द मॅच’ होतील. सामाजिक पतप्रतिष्ठेचा लाभ. वास्तुयोग. पूर्वा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचा अमावास्येच्या आसपास इतरांशी वाद होऊ शकतो. काळजी घ्या. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहात उत्तम नोकरी लाभेल. अमावास्येच्या आसपासच्या काळात पोटाची काळजी घ्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.