आकुर्डीमध्ये जिवंत देखाव्यांवर भर

Thursday, 20 September 2018

वाल्हेकरवाडी - आकुर्डी, वाल्हेकरवाडीमधील गणेश मंडळांनी जिवंत सामाजिक देखाव्यांबरोबर, जिवंत भक्ती देखावेही साकारले आहेत. 

वाल्हेकरवाडी - आकुर्डी, वाल्हेकरवाडीमधील गणेश मंडळांनी जिवंत सामाजिक देखाव्यांबरोबर, जिवंत भक्ती देखावेही साकारले आहेत. 

आकुर्डी गावठाण येथील नागेश्वर मित्र मंडळाने ‘मरावे परी अवयवरूपी उरावे’ या सामाजिक प्रबोधनपर जिवंत देखाव्याचे सादरीकरण केले आहे. मंडळाचे २८वे वर्ष आहे. मंडळाने विविध सामाजिक संदेश देणारे फलक लावले आहेत. मंडळाचे अध्यक्ष शिवराज पाटील आहेत. खंडोबा माळ आकुर्डी येथील तरुण मित्र मंडळाने तिरूपती बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. 
फुलांची आरास, भव्य गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. प्राधिकरणातील दुर्गेश्वर मित्र मंडळाची अतिशय सुंदर अशी मंगलमूर्ती आहे. विश्वेश्वर मित्र मंडळाचा नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. यांनी सूर्यचक्रात विविध रंगांची आरास साकारली आहे. म्हाळसाकांत चौक येथील जयहिंद मित्र मंडळाने ‘पांडुरंग माझा सखा’ हा हलता देखावा सादर केला. शिवशक्ती मित्र मंडळाने ‘स्वराज्य ते सुराज्य चालवू’ हा व्यवस्थेवर भाष्य करणारा जिवंत देखावा सादर केला आहे. आकुर्डीतील मानाचा गणपती भैरवनाथ मित्र मंडळाने श्रींच्या मूर्तीशेजारी फुलांची आरास केली आहे. श्रीकृष्ण-क्रांती मित्र मंडळाने मराठा आरक्षणावर आधारित शक्ती आणि सहनशक्ती हा हलता देखावा सादर केला आहे. अखिल अष्टविनायक मित्र मंडळाने आकर्षक फुलांची आरास करून सर्व बाजूंनी श्रींच्या मूर्तीला सुशोभित केले आहे. भाजी मंडई येथील खंडेराया भाजी मंडई मित्र मंडळाने होलिका दहनाचा हलता देखावा सादर केला आहे. श्री तुळजामाता मित्र मंडळाने सद्यपरिस्थितीवर आधारित ‘हीच का श्रींची इच्छा’ हा शिवाजी महाराजांनी स्थापिलेले स्वराज्य आणि आताचे सुराज्य यावर आधारित देखावा सादर केला आहे. 

वाल्हेकरवाडीतील चिंचवडेनगर येथील जय गुरुदत्त मित्र मंडळाने ‘मरावे परी अवयावरूपी उरावे’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. श्रींच्या मूर्तीसमोर सुंदररीत्या देखावा सादर केला आहे. बिजलीनगर प्रतिष्ठानने फुलांची आरास केली आहे. अखिल खानदेश मित्र मंडळाने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. रजनीगंधा मित्र मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.