गणेशोत्सव2019 : कोथरूड, कर्वेनगर, एरंडवणे भागांत पौराणिक देखावे

Monday, 9 September 2019

गणेशोत्सव2019 : कोथरूड - कोथरूड, कर्वेनगर आणि एरंडवणे भागांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या वर्षी पौराणिक, वैज्ञानिक तसेच जिवंत देखाव्यांवर भर दिलेला आहे. सायंकाळनंतर देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. काही सोसायट्यांमध्ये महिलांनीच गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या आनंददायी वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटादेखील तैनात आहे.

गणेशोत्सव2019 : कोथरूड - कोथरूड, कर्वेनगर आणि एरंडवणे भागांतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या वर्षी पौराणिक, वैज्ञानिक तसेच जिवंत देखाव्यांवर भर दिलेला आहे. सायंकाळनंतर देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. काही सोसायट्यांमध्ये महिलांनीच गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. या आनंददायी वातावरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटादेखील तैनात आहे.

रामबाग कॉलनीत दरवळला ‘स्वरगंध’ 
वारजे - रामबाग कॉलनीतील अध्यक्ष व पदाधिकारी यांच्या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने डॉ. अनघा राजवाडे प्रस्तुत ‘स्वरगंध’ हा हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम झाला. 
‘गणनायकाय गणदेवताय या गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरवात झाली. ‘सुंदर ते ध्यान, खेळ मांडियेला, तेरे सूर और मेरे गीत, चाफा बोलेना’ या गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. परितोष अघोर व राजवाडे यांनी ये रात भिगी भिगी, छोड दो आंचल, या जन्मावर या जगण्यावर आदी गीत सादर केले. ‘ज्योतसे ज्योत जगाते चलो’ या भैरवीने सांगता झाली. आमदार मेधा कुलकर्णी याप्रसंगी उपस्थित होत्या. अनिता तलाठी व नीलिमा कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व संयोजन केले.

विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात गणेश दर्शनासाठी गर्दी
पुणे - कर्वेनगरमधील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात वेगवेगळ्या देवांची चार मंदिरे आहेत. त्यापैकी गणेश मंदिरातील सुबक गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. राजाराम पुलाजवळच्या रस्त्याने कर्वेनगरमध्ये प्रवेश केल्यावर सुरवातीलाच विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे भव्य आवार लागते. विठ्ठलाच्या मुख्य मंदिराजवळ दत्त, मारुती व गणपती या देवांची स्वतंत्र मंदिरे आहेत. गणपती मंदिरातील शुभ्र पांढऱ्या रंगाची, संगमरवरी गणेशमूर्ती लक्ष वेधून घेते. परिसरातील भाविक गणेशोत्सवाच्या काळात, गणेश चतुर्थीला व गणेश जयंतीनिमित्त या ठिकाणी मोठ्या संख्येने येथे येतात. यंदाच्या गणेशोत्सवातही भाविकांची गर्दी गजाननाच्या दर्शनासाठी होते आहे. भाविक या मूर्तीसमोर खिळून उभे राहतात. अनेक जण भजन-कीर्तनात सहभागी होतात.

जनवाडीत जिवंत देखाव्यांवर भर 
गोखलेनगर - जनवाडी मंडळाने या वर्षी ‘कन्यारत्न रडायचं नाही, तिला घडवायचं’ हा जिवंत देखावा सादर केला आहे. १६ कलाकार हा देखावा सादर करत आहेत. सुलोचना चव्हाण यांनी आईची भूमिका, तर संतोष जाधव यांनी मुलाची भूमिका साकारून सर्वांचे लक्ष वेधले. यात किलबिल शाळेतील अथर्व डिंबळे, सिद्धार्थ पवार, रूनाल धोत्रे, सूर्यप्रकाश लाहाडे आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या देखाव्याची संकल्पना नयना वाघ यांची आहे. अध्यक्ष विनोद सकट आहेत. मुलगा व मुलगी भेद नको, असा संदेश देखाव्याद्वारे दिला आहे.